दान - मराठी कविता

दान, मराठी कविता - [Daan, Marathi Kavita] आता सगळंच आटलयं, नाती आटली, माया आटली, प्रेम ही आटू लागले.

आता सगळंच आटलयं, नाती आटली, माया आटली, प्रेम ही आटू लागले

आता सगळंच आटलयं
नाती आटली, माया आटली
प्रेम ही आटू लागले
सगळं बंदिस्त होताना
मनातलं अंतर मिटलं
चार भिंती हवेची पोकळी
खिडकीतला निसर्ग पाहणे आले
स्पर्शाला मुकलो
हावभाव आवरणात दडलेले
डोळे सर्च करत तासंतास
गेल्याच्या श्रद्धांजली
रांगेत मृत्यूचा डेंजर झोन
गेल्याचं दुःख सोसत
बहिष्कृत, एकलकोंडे
सगेसोयरे, शेजारी
अंतर राखून
कोरडे आटलेले सर्व
निर्ढावलेल्या आशा,आकांक्षा
आता ही कळवळा नाही!
भरकटलेल्या अवस्थेतील
वणवण सुरू आहे
मतदान होईल हो!
तिकीट दलबदलू पाठीराखे
सत्तेचा आकडा बहुमत
घरचे, बाहेरचे, संधीसाधू
एकाच ताटाला भोक पडणारे लाचखोर
निदान तो पर्यंत तरी
अप्पलपोटी, षंढ, नपुसक, गैर मतलबी, स्वार्थी
धिंगाणा थांबवा आता
घराघरात संक्रमण सुरू आहे
हॉस्पिटल दवाखाने
हल्लाबोल होतायतं
श्वास काढून घेणे
घुसमट ही किती?
आता जागण्याचं
दान मागतायत
सर्व नाकपुडीत पुरेल इतका
श्वास हवा आहे सर्वांना
छातीच्या पिंजऱ्यात
हृदयाची घालमेल स्वीकारत
डोळ्यात प्राण आणून
नात्या गोतावळ्याच्या ऋणानुबंधात
जगायचं आहे सगळ्यांना...

- राजकुमार शिंगे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.