यंदा कर्तव्य (खरोखरच) आहे का?! - मराठी लेख

यंदा कर्तव्य(खरोखरच)आहे का?,मराठी लेख - [Yanda Kartavya Aahe Ka?,Marathi Article] आपल्या मुलांचं शुभमंगल व्हावं ही तर प्रत्येक पालकांची इच्छा असते पण.
यंदा कर्तव्य (खरोखरच) आहे का?! - मराठी लेख | Yanda Kartavya Aahe Ka?! - Marathi Article

आपल्या मुलांचं शुभमंगल व्हावं ही तर प्रत्येक पालकांची इच्छा असते पण...

“मावशी! Just tell me one thing, why do people marry?”

“हि शहाणीसुरती माणसं मुळी लग्नचं का करतात?” ह्या गाण्याची आठवण करुन देत, हताश स्वरात सौरभ ने (माझ्या मुलीच्या बालमित्राने) विचारलेल्या प्रश्नांचं खरंखुरं उत्तर शोधायला लागले आणि विचारात पडले.
पंधराच दिवसांपूर्वी सौरभच्या आईची आणि माझी झालेली चर्चा मला आठवली.

“अगं, आमच्या सौरभचं लग्न करतेय या वर्षी.” सुलभाने चहा पिताना एकदम सरप्राईज दीलं.
“अरे वा! अभिनंदन सासुबाईंचं! काय करते मुलगी?” माझी चौकशी सुरू झाली.
“अगं, मुलगी कुठली... आता बघायला सुरवात करतेय, तुझ्या ओळखीत असेल तर सांग नक्की!”
“सुलभा, पण त्याला विचारलेस का? त्याने कोणाला पसंत केलं असेल तर?”
“अगं स्वाती विचारलं! कोणी नाही असं म्हणाला पण मुळात तो मला आत्ता लग्नच करायचं नाही म्हणत होता. तुला माहीत्ये ना आजकालच्या मुलांना त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आलेली अजिबात आवडत नाही!”
“सुलभा, मग थांब की थोडं, तो का असं म्हणतोय ते तर विचार.” मी आपला समजूतीचा सल्ला दिला.

“हे बघ! २७ वर्षांचा आहे तो आता. आत्ता बघायला सुरुवात केली तर वर्ष जाईल मुलगी शोधण्यात. मग खरेदी, तयारीत वर्षभर लागेल. हल्ली हॉल पण वर्षभर आधीच बुक करायला लागतो, माहीत्ये ना?”
“लग्नानंतर ते दोन वर्षे तरी वेळ घेणार! म्हणजे, पहिलं पोर होईपर्यंत तीशी निघून जाईल! सगळ्याच गोष्टींना लेट होईल गं मग! आणि अगं, जेवढा उशीर होतो ना, तेवढ्या चांगल्या मुली मिळत नाहीत हो! त्यांची लग्न पटकन ठरतात! नुसता जूना माल, थोराड आणि आडमुठ्या मुली येतील त्याच्या वाट्याला!”
“तुला काय कळणार माझं टेन्शन बाई? तुझ्या मुलीचं लग्न करुन तु छान निवांत झाली आहेस, पण मला सून आणायची आहे!” असं म्हटल्यावर मला पुढे बोलायला स्कोपच नव्हता.
“मावशी! प्लीज जरा आईला समजाव यार! She has made it as her mission! ती म्हणजे माझ्या लग्नाची एवढी घाई करतेय, जसा काय जगाचा अंत जवळ आलाय!” सौरभ वैतागून बोलत होता.

“OK! So you don't want to get married? Why don't you talk to your parents then?” मी सौरभचं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागले.

“अगं मावशी! मी असं कुठं म्हणतोय की मी अजिबात लग्न करणार नाही म्हणून?! पण मला पुढचे चार-पाच वर्षे तरी लग्न करायचं नाहीये. आठवी पासून मी अभ्यास, करिअर, competitive exams, IIT preparation मग IIT मधला अभ्यास, प्रोजेक्टस, submissions, MBA entrance नंतर job interview. सतत बिझी आहे! अगं गेले दहा वर्षे नुसतं धावतोय या रेस मधे मी घोड्यासारखा. आता जरा मनासारखा जॉब लागला आहे. तर थोडा वेळ द्या ना यार एन्जॉय करायला! काय लगेच लग्न लग्न?”

“गेल्या काही वर्षांत मला मोकळा वेळच मिळाला नाही. आता माझा मस्त ग्रुप जमलाय कंपनीत, पुढच्या चार पाच वर्षांत आम्ही कमीतकमी १० countries visit करणार आहोत. मस्त backpack जर्नी करत युरोपभर फीरणार आहोत. I really want to enjoy, relax and have fun before I get married! What's wrong in that?” सौरभचं म्हणणं अगदी रास्त होतं.

“अरे हो ना! मी अगदी समजूच शकते तुझं म्हणणं, पण लग्नानंतर एकत्र एन्जॉय करता येणार नाही असं वाटतयं का तुला? कदाचित तुझ्या बायकोला देखील प्रवास आवडत असेल की! आणि कदाचित तुझ्या नवीन मीत्र-मंडळातलीच आवडेल की तुला एखादी!

“हो ना, मावशी, कदाचित तीला प्रवास आवडत असेल... नसेल... ह्या सगळ्या future probability आहेत. उद्या तिच्या डीमांड काही वेगळ्या निघाल्या तर मी काय करु? त्याकरता मी माझी आत्ताची शांती का घालवू? आणि first of all, मला लग्न करायची mental, physical, emotional need, गरज तर वाटली पाहिजे ना?”

“अरे यार, आपण गरज वाटल्याशिवाय शॉपिंग पण करत नाही कींवा भूक लागल्या शिवाय खात नाही मग मला जर आत्ता लाईफ पार्टनरच्या सोबतीची गरज वाटत नाही तर मी का लग्न करु?

मला सहा महिन्यांपूर्वी, आमच्या एका फॅमिली फ्रेंडच्या मुलीशी, काव्याशी झालेली भेट आठवली. काव्या सुध्दा अतिशय गुणी, हुशार आणि स्वरूपवान मुलगी. उच्च मध्यमवर्गीय आणि उत्तम करिअरची स्वप्न बघणारी. काव्या एका मल्टीनॅशनल कंपनीत उत्तम पदावर काम करत होती. पंचविशी ओलांडलेल्या काव्याने आता लग्न करावं अशी आई बाबांची इच्छा, पण ती ऐकायला तयार नाही.

“काकू, मुलीच्या आयुष्याची ईतीकर्तव्यता काय लग्न आणि मुलांमधे असते का गं? तुच सांग? Just because I am women, म्हणजे मला घर, संसार, मुलं बाळं हेच आणि अशाच सगळ्या गरजा असायला हव्यात का?” काव्या अगदी मनापासून आणि सिन्सिअरली बोलत होती.

“मला आई बाबांनी अगदी मुलासारखं वाढवलं, आमची मुलगी म्हणजे आमचा मुलगाच आहे असं कायम म्हणायचे ना?! मी पठडीतला विचार करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, इतरांप्रमाणे सरधोपट मार्गाने न जाता वेगळ करिअर करावं हि त्यांचीच इच्छा होती ना? त्या करताच तर एवढा खर्च करुन मला परदेशात सुध्दा पाठवलं त्यांनी! मग आता सडनली मी चार चौघींसारखीच वागावं ही का अपेक्षा करावी त्यांनी?!?”

“काकू, माझ्या जोडीदाराबद्दल काही अपेक्षा आहेत, माझ्या मनात त्या अगदी स्पष्ट आहेत. माझ्या पार्टनरने मला एक बायको म्हणून बघण्यापेक्षा एक स्त्री म्हणून, व्यक्ती म्हणून स्विकारावे, प्रेम करावं आणि माझ्या कामाबद्दल, बुध्दीबद्दल त्याला आदर असावा, अशी अपेक्षा आहे माझी. त्याला घरकाम आणि स्वयंपाक यायला हवा. जसा मला थोडाफार येतो, निदान स्वतःच पोट भरण्यासाठी तरी!”

“लग्न केल्यावर आम्ही दोघांनी वेगळ्या घरात राहावं असं वाटतं मला. नाही, मला आई वडीलांबद्दल अजिबात अनादर नाही. मी माझ्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना प्रेमाने स्विकारेन...”
“पण मला असं वाटतं की जोपर्यंत मुलगा आणि मुलगी स्वतःच्या आई वडीलांच्या घराची ऊब सोडून, स्वतःचं नविन विश्व उभं करत नाहीत तो पर्यंत संसारातल्या येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी यांबद्दल स्त्री-पुरुष समानता होतच नाही!”
शिवाय, माझ्या होणाऱ्या सासूने एका पध्दतीने घराचे नियम बनवलेले असणार, तिची विचार करायची, काम करायची पध्दत वेगळी. तिने, माझ्या करता, या वयात स्वतःत बदल का करावा? कींवा आम्हाला एकमेकींच खटकत असलं तरी आम्ही मन का मारावं? आणि आमचं पटत नाही म्हणून माझ्या नवर्‍याला,” “आता आई ची बाजू घेऊ की बायकोला समजवू? अश्या दंद्वांमधे कशाला पाडावं?”

“आधी उगाच खोटं बोलायचं की मी अ‍ॅडजस्ट करीन आणि नंतर काही महिन्यांत वाद घालायचा, चडफडत बसायचं, कटकट करायची हे मला मान्य नाही. लोकं म्हणतात की मी एकुलती एक आहे, उच्च शिक्षित आहे, म्हणून मी माज करते. पण तसं नाही गं काकू. मी माझ्या मतांशी स्पष्ट आहे इतकचं आणि मी ती मोकळेपणे बोलायला घाबरत नाही.”

“काकू, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मुल नकोय!” मी माझं काम आणि जॉब खुप एन्जॉय करतेय आणि मला मुलांकरता, स्वतःच्या करिअरमधे, कामामधे अपेक्षित वेळ नाही देता येणार. मला कल्पना आहे की मुल होणं हे अगदी निसर्ग नियमानुसार आहे, मात्रृत्वाची भावना अगदी उच्च असते. सगळं खरं असलं तरी जन्म दिलेल्या मुलांकरता मी जर माझ्या रुटीनमधे बदल नाही करु शकले, त्याग नाही करू शकले तर तो त्याच्यावरती अन्याय नाही होणार का? कींवा मग सतत पार्टनर कडून अपेक्षा करत बसायचं, की त्याने अ‍ॅडजस्ट करावं, मग वादविवाद, अपेक्षाभंग!”

“सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशात इतकी प्रचंड लोकसंख्या असताना, रोज शेकडो मुलं अनाथ वाढताना, मला स्वतःला मुल असलचं पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?”

“मला अगदीच वाटलं तर एखाद्या मुलाला दत्तक घेऊ की! नाहीतर दहा गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च करुन त्यांना पायावर उभं करेन! आणि आता प्रश्न, आई बाबांना म्हातारपणी आधार द्यायचा; तर मी चांगली भक्कम आहे की त्यांची काळजी घ्यायला! त्याकरता जावई कशाला पाहिजे त्यांना? मी मुलासारखीच आहे ना!”

काव्या आणि सौरभ ह्या अगदी प्रातिनिधिक केस आहेत आजच्या पिढीला रीप्रेझेंट करणार्‍या. त्याचे आणि त्या वयातल्या अनेकांचे विचार ऐकून मला पुन्हा एकदा समजलं आहे की “जमाना बदल रहा है”, मुलं खरोखरच वेगळा विचार करतायत आणि आता आपल्या सगळ्यांनी खरोखरच लग्न या प्रक्रियेकडे थोड्या वेगळ्या पध्दतीने बघायची गरज निर्माण झाली आहे. काही प्रश्न स्वतःला, स्वताच्या मुलांना विचारायला हवेत. त्यांचं म्हणणं, विचार समजून घ्यायला हवेत!

  • आपल्या मुलांच लग्न जमवणे आणि त्यांना पार्टनर शोधणे हे खरोखरच आई वडीलांच कर्तव्य आहे का? आपण आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवलं असेल तर हा निर्णय देखील ते योग्य वयात घेतील यावर विश्वास ठेवणं आवश्यक नाही का?
  • आपल्याला लग्न का करायचं आहे? शरीरसुखाकरता, एक निसर्गनियम म्हणून की आयुष्यात एक समजून घेणारा, आपल्याला स्विकारणारा जोडीदार असावा म्हणून? का आर्थिक स्थैर्य असावं म्हणून? का म्हातारपणी आईवडीलांची काळजी घ्यायला असावी म्हणून? आपली मतं स्पष्ट आहेत का? आणि ती आपण आपल्या आई वडीलांशी आणि होणाऱ्या जोडीदाराशी मोकळे पणाने शेअर केली आहेत का?
  • लग्नानंतर आपण आपल्या सवयी बदलायला तयार आहोत का? जोडीदाराच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा आपण समजून घेतल्या आहेत का? आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत का?
  • घरकाम, नोकरी, आर्थिक जबाबदारी याबद्दल आपण मोकळेपणाने जोडीदाराशी बोललो आहोत का? आपल्या adjustments च्या मर्यादा आपण शेअर केल्या आहेत का?
  • मुलं हवी आहेत का? मुलं झाल्यावर त्यांच्या करता वेळ कोणी काढायचा, नोकरी कोणी सोडायची ही चर्चा केली आहे का?
या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या मनात शोधायला हवी आणि एकमेकांना विचारायला हवी. कदाचित ह्याने, आपण वाढत्या घटस्फोटाच्या घटना आणि दुरावत जाणाऱ्या नात्याला वेळीच सावरु कींवा एका सुंदर नात्यातली दोन मनांची ओढाताण आणि त्यांच्या कुटुंबियांची घालमेल तरी कमी होईल!
आपल्या मुलांचं शुभमंगल व्हावं ही तर प्रत्येक पालकांची इच्छा असते पण त्या करता आपण आणि आपली मुलं खरोखरच “सावधान” आहोत का हे नको का समजून घ्यायला?
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.