वारसा भाग ४,शोध अस्तित्वाचा,मराठी कथा - [Varsa Part 4 Shodh Astitvacha] मातीशी ऋणानुबंध ठेवुन दिलेल्या संस्कारांचा,परंपरेचा व माणुसकीचा वारसा.
आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवुन शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा
स्थळ: मुंबई
एखादा निर्णय घेणं आणि तो आमलात आणणं यात खूप अंतर असतं. पण अनिरुद्धच्या बाबतीत हे अगदी विरुद्ध होतं. अनिरुद्ध मुळातच अतिशय निग्रही, कष्टाळू आणि जे ठरवतील ते पूर्णत्वास नेणारे होते. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांनी स्वकर्तृत्वाने त्यांचे सर्व शिक्षण स्कॉलरशिपवर पूर्ण केलं होतं आणि त्यांच्या संशोधनामुळे BARC मधे त्यांना मान होता.
पण इथे प्रश्न वेगळाच होता. या सर्व गोष्टींचा शोध घ्यायला अगोदरच्या पिढीतील माणसांना भेटणे आवश्यक होते. हयात असणाऱ्या सर्वांची नोंद करणे आवश्यक होते. त्यांच्याकडून जुने संदर्भ घेणे आवश्यक होते आणि या सर्वातून निष्पन्न होईल त्या निष्कर्षास पोहचवून नंतर त्याचे rectification म्हणजेच निराकारण करणे आवश्यक होते. या सगळ्याला प्रचंड मेहनत होती आणि वेळ लागणार होता. पण आव्हानाला घाबरुन जाणारी, अनिरुद्ध ही कमकुवत असामी नव्हतीच.
मुंबईला गेल्याबरोबर एका दिवसाचा ही विलंब न लावता अनिरुद्धने एखाद्या scientific research आणि experiments करता सुची बनवतात त्या प्रमाणे बनवायला सुरुवात केली.
- तात्यांच्या(अनिरुद्धचे वडील ‘रघुनाथराव सरनोबत’) आयुष्यातील घटनाक्रम लिहीणे त्यांनी केलेल्या नोंदी वाचणे.
- जिवंत असलेल्या सर्व सरनोबत कुटुंबाची यादी तयार करुन त्याना फोनवर कींवा प्रत्यक्ष भेटणे. त्यांच्या आयुष्यातील घटनांची नोंद करणे.
- सरनोबत कुटुंबातील हयात नसलेल्या परंतु वंशज असलेल्यांच्या शाखा पोटशाखा तपासणे.
- सरनोबत घराण्याचा मूळपुरुष व त्यांचे जूने संदर्भ व घटना यांचा शोध घेणे.
- ऐतिहासिक दाखले, संदर्भ, शिल्लक असल्यास त्यांचा शोध घेणे, सत्यता पडताळणे.
- या सर्वांतून निष्कर्ष काढणे व शक्य असल्यास त्यावर rectification अथवा निराकरण अथवा उपाय शोधणे.
- या सर्व घटनांची, प्रोसेसची नोंद करुन तीचा एक दस्तऐवज करुन त्याची प्रत पुढच्या पिढीला रेफरन्स म्हणून सहज उपलब्ध होईल असे करणे.
तात्यांच्या आईचा ते लहान असतानाच झालेला मृत्यू, मग सावत्र आईचा ग्रुहप्रवेश, मग तीला झालेली जुळी मुलं. तात्यांना, त्यांच्यापेक्षा वयाने लहान अशी जुळी भावंड होती. एक भाऊ - एक बहीण. भाऊ हुशार परंतु अपंग. बहिण शरिराने धडधाकट पण मतिमंद! तात्यांनी गरीबी असताना देखील आपल्या सावत्र आईचं, आपल्या अपंग भावंडाचं, आयुष्यभर केलं होतं. तात्यांचं लग्नानंतर सुद्धा आपल्या भावंडांची काळजी त्यांनी घेतली होती. लग्न झाल्यावर तात्यांना दोन मुलं, धाकटा अनिरुद्ध, मोठा भाऊ अनिकेत! अनिकेतचा १६ व्या वर्षी गिर्यारोहण करायला गेलेला असताना झालेला मृत्यू. त्याच्या मृत्यूमुळे अनिरुद्धच्या आईने धरलेलं अंथरुण आणि त्यानंतरच्या आजारपणात तीचा झालेला अंत! अनिरुद्धला १२ व्या वर्षीपासून आईच्या प्रेमाला वंचित व्हावं लागलं होतं. त्यानंतर तात्यांनी अनिरुद्धला शिक्षणासाठी मावशीकडे, कधी हॉस्टेलमधे ठेवले होते. Msc. Phd करताना देखील अनिरुद्ध बाहेर राहून शिकले होते. नंतर अनिरुद्धनी स्वकमाईवर तात्यांना चारधामला, ट्रीपला पाठवणं आणि त्याचवेळी तात्यांच्या धाकट्या भावंडांचा मृत्यू होणं! ज्यांना आयुष्यभर सांभाळलं त्यांच्या मृत्यू समयी तात्यांना त्यांचं शेवटचं दर्शन न होणं. पुन्हा तात्यांच्या मृत्यूच्या वेळीच, नेमकी अनिरुद्धची परदेशवारी आणि जर्मनी मधलं वास्तव्य?!
नकळत गजेंद्र स्वामींचे शब्द डोक्यात घुमले... प्रत्येक पिढीला शाप...! अनिरुद्धनी मनात आलेले विचार झटकले.
त्यांना पटकन लक्षात आलं की तात्यांना डायरी लिहायची सवय होती. काही महत्वपूर्ण घटना, मग त्या घरातल्या असोत कींवा अगदी राजकीय, तात्या नोंद करत असतं. आता या डायरी शोधणं आलं. म्हणजे भार्गवीला सांगणे भाग होते. शेवटी अनिरुद्धनी फार तपशीलवार न सांगता भार्गवीला समजावून सांगितले. तसेच ती आत्ता कोणाशी, मुख्य म्हणजे आदित्यशी काहीही बोलणार नाही याचं वचन घेतले. भार्गवीने तात्यांच्या सर्व डायरी आणि कागदपत्रे एका माळ्यावरच्या ट्रंकेत जपून ठेवली होती.
अनिरुद्धनी शिल्लक होत्या तेवढ्या सगळ्या डायऱ्या काढल्या. प्रत्येकाच्या जन्म, मृत्यूची नोंद त्यामधे केलेली होती. निवडणुकांचे निकाल, जमिनीच्या हक्कसोड वरती केलेली सही, अनिरुद्धच्या आईचे आजारपण, अनिरुद्धचे रिझल्ट्स, त्याने मिळवलेल्या यशाच्या नोंदी, अनिरुद्धच्या परदेशगमनाची माहिती. शेवटचं आजारपण... अनिरुद्धचे डोळे भरुन आले.
अखेरीस, अनिरुद्धच्या लग्नाला बोलावलेल्या सर्व सरनोबत मंडळींची नावं आणि यादी एका डायरीत मिळाली. त्यावेळेस फोन नव्हते त्यामुळे प्रत्येक नावाबरोबर त्यांचा पोस्टल अॅड्रेस लिहीलेला होता. ग्रेट!! आता पटकन होईल काम असे म्हणून अनिरुद्धने थोडा श्वास टाकला पण त्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला. या सर्वांशी बोलायचे तरी काय? काय विचारायचे? कोण स्वतःबद्दल अशी माहिती सांगणार आहे?! कशी पत्र लिहीणार यांना?? काय करावं? अनिरुद्धनी फोनची डीरेक्टरी काढली. प्रत्येक नावाच्या समोर आत्ता अस्तित्वात असलेला फोन नंबर लिहायला सुरुवात केली.
आता प्रत्येकाला खुशालीचा आणि चौकशीचा फोन करणे!
अनिरुद्धच्या परदेशी वास्तव्यामुळे त्याचा आणि ईतर नातेवाईकांचा फारसा संवाद नव्हता. पण आता भार्गवी त्याच्या मदतीला धावून आली. दोघांनी मिळून एकेकाला फोन करायला सुरवात केली, महत्वाच्या नोंदी, संदर्भ लिहून ठेवायला सुरुवात केली. जशी जशी माहिती मिळत गेली, पूर्वी न कळलेल्या काही गोष्टी कानावर आल्या... या सगळ्यातून जे काही सत्य समोर येत होते ते हादरवणारे होते!
क्रमशः
khup chan
उत्तर द्याहटवा