पसारा - मराठी कविता

पसारा, मराठी कविता - [Pasara, Marathi Kavita] आठवणींचा पसारा आवरावा, म्हणतेय अनेक दिवस, द्याव्यात टाकून जून्या पुराण्या स्मृती.
पसारा - मराठी कविता | Pasara - Marathi Kavita

आठवणींचा पसारा आवरावा, म्हणतेय अनेक दिवस, द्याव्यात टाकून जून्या पुराण्या स्मृती

आठवणींचा पसारा आवरावा
म्हणतेय अनेक दिवस
द्याव्यात टाकून जून्या पुराण्या स्मृती
झटकून टाकावीत कटू आठवणींची कोळीष्टकं

ऐकेक आठवण घेऊन बसले आहे
ठेवावी जपून की पुसून टाकावी?
निवडीच्या या बुचकळ्यात
कायम पडलेली मी

जराजीर्ण झालेल्या काही आठवणी
पण आजीच्या गोधडी सारख्या
ऊब देतात अजून
कशा टाकून देऊ मी त्या?

काही आहेत अगदी अनोख्या
मनाला कातर करणाऱ्या
ठेवणीतल्याच म्हणाव्या अशा
त्या सोडवत नाहीत गं
असं वाटतं त्याच्या बरोबर
माझं मी पण कुठेतरी जाईल हरवून!

काही आठवणी मला घडवणाऱ्या
काही पुन्हा पुन्हा नव्याने
जगायला शिकवणाऱ्या
काही उमेद देणाऱ्या

काही जपून ठेवलेल्या
अगदी मनाच्या तळाशी
फक्त स्वतःशिवाय कोणालाही
न सांगता येणार्‍या

आठवणींचा पसारा
आवरायचा एकदा असं ठरवते मनाशी
आणि आवरता आवरता
गुंतून जाते त्याच पसार्‍यात
शोधत राहते... मला सापडलेली मी
आणि न सापडलेली सुध्दा!
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.