वारसा भाग ३ (भूतकाळाचा मागोवा) - मराठी कथा

वारसा भाग ३,भूतकाळाचा मागोवा,मराठी कथा - [Varsa Part 3 Magova,Marathi Katha] मातीशी ऋणानुबंध ठेवुन दिलेल्या संस्कारांचा,परंपरेचा व माणुसकीचा वारसा.
वारसा भाग ३ (भूतकाळाचा मागोवा) - मराठी कथा | Varsa - Part 3 (Bhutkalacha Magova) - Marathi Katha

आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवुन शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा


स्थळ: त्र्यंबकेश्वर (नाशिक जिल्हा)

गजेंद्र स्वामींच्या तोंडून शाप हा शब्द ऐकून अनिरुद्धची कानशिला गरम झाली. आता काहीतरी पूजा-अर्चा, नाहीतर मंत्र-तंत्र अनुष्ठान करुन हा आपल्याकडून पैसे उकळणार हे अनिरुद्धच्या मनात येऊन त्यांच्या कपाळावर सूक्ष्म आठी आली. गजेंद्र स्वामींच्या तीक्ष्ण नजरेतुन हे बदल सुटले नाहीत.

“क्षमा करा! पण शाप-उःशाप, पाप-पुण्य हे मी मानत नाही स्वामी! मला एवढेच माहीत आहे की मी कींवा माझ्या वडिलांनी कोणाचेही वाईट केलेले नाही. माझ्या मुलाने ही नाही. माझे कर्तव्य मी करतो आणि जमेल तेवढे समाजाला मदत होईल असे करतो. कोणाला त्रास होईल असे मी वागत नाही. त्यामुळे या गोष्टींवर माझा विश्वास नाही. आणि सुख दुःखाचं म्हणायचं तर ती आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. सुखी असताना तो काळ सहज संपतो म्हणून विस्मरणात जातो. दुःख असतांना प्रत्येक क्षण आपण मोजत बसतो. माझ्याच वाट्याला हे दुःख का आलं हा प्रश्न विचारत बसतो!” अनिरुद्ध मोकळं आणि स्पष्ट बोलले.

“शाप हा शब्द ऐकून वैतागलात का अनिरुद्ध?” गजेंद्र स्वामीं म्हणाले. सहाजिक आहे तुमचं. तुम्ही वैज्ञानिक आहात. त्यामुळे मी तुम्हाला थोडं वेगळ्या पध्दतीने समजावून सांगतो!

“भूतकाळात एखादी घटना घडलेली असते. माणसं एखादी गोष्ट करतात. काही निर्णय घेतात, कृती करतात. प्रत्येक कृतीचे परिणाम होत असतात. Every action has a reaction and every decision has repercussions आणि आपल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी ही आपली असते. काही वेळा ती अ‍ॅक्शन कींवा रीअॅक्शन त्वरीत घडणारी असते काही वेळेस त्या घटनेचे परिणाम दूरगामी असतात. ते त्यावेळेस जाणवत नाहीत पण नंतर जाणवत राहतात.”

“आपल्या महाभारतातील उदाहरण घेऊया. इंद्रप्रस्थ वसवताना अर्जुनाने खांडववन जाळले. कीत्येक पशुपक्षी, झाडे, सर्पकुळं जळाली, जे आगीतून वाचले त्यांना अर्जुनाने टीपून मारले. त्या प्राण्यांचे, सर्पांचे तळतळाट अर्जुनाला नाही तर त्याच्या नातवाला भोवले. तक्षकाने सर्पकुळाचा सूड अर्जुनाचा नातू परिक्षीतावर उगवला. परीक्षित सर्पदंशाने गेला. त्याच्या मुलाने, जनमेजयाने समस्त सर्प कुळाविरुध्द युध्द पुकारलं. आस्तिक ऋषिंनी मधे येऊन निराकरण केलं नसतं तर हे असच चाललं असतं...

अजून तुम्हाला कोणतं उदाहरण देऊ?! “ओके, आता साधं ग्लोबल वॉर्मिंगचं उदाहरण घेऊ या! (do not be surprised Mr. Sarnobat, I have done my Msc. In Biochemistry) आपल्या पृथ्वीच्या बदललेल्या पर्यावरणाचं उदाहरण घ्या. शेकडो वर्षे माणसाने वृक्षतोड केली, टेकड्या तोडल्या, पाणी हवे तसे वापरले, नद्यांची काळजी घेतली नाही, प्रदुषण वाढले, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले नाही..., ह्या सगळ्याचे वाईट परिणाम झाले / होत आहेत आणि आपली पुढची पिढी ते भोगणार आहे! म्हणजेच आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची कींमत आपल्या पुढच्या पिढीला चुकवावी लागणार आहे. अगदी आपल्या इतिहासातलं उदाहरण घ्या! इंग्रजांविरुद्ध आपल्याकडील सगळे राजे, सगळी राज्ये, पहिल्यांदाच एकत्र आली असती तर? 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात प्रत्येक राजाने फक्त स्वतःच्या गादिचा विचार न करता अखंड हिंदुस्थानाचा विचार केला असता तर? देश गुलामगिरीत गेला नसता! आपल्याला, त्यांच्या पुढच्या पिढीला जे भोगावे लागले ते लागले नसते. भारताचा इतिहास बदलला असता! याचाच अर्थ, आपल्या पूर्वजांनी जी चूक केली त्याची फळं त्यांनी आणि त्यांच्या पुढच्या चार पिढ्यांनी भोगली. हिंदुस्थानाची फाळणी झाली. एका क्षणात देशाचे तुकडे पाडले... शेकडो घरं, शेकडो कुटुंब देशोधडीला लागली. माणसं मेली... त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचा, अन्यायाच्या कडवटपणा पुढच्या पिढीत आलाच नां? अखंड देशाचं विभाजन झालं, लोकांची मानसिकता बदलली, देशात-धर्मात कायमची तेढ आली. आज त्याची कींमत पुढच्या पिढ्या मोजत आहेत ना?” आज त्याच सीमेवर हजारो जवान मृत्यूमुखी पडत आहेत.

एक लक्षात घ्या, सर्व सामान्य माणसांच्या चुकांचा परीणाम तो स्वतः व त्याची मुलं भोगतात. पण ज्यांच्या हाती सत्ता असते, ताकद असते, जे नेते असतात त्यांच्या चुकांचे, कृतींचे परिणाम आणि शाप ते स्वतः, त्यांची प्रजा आणि पुढच्या अनेक पिढ्या भोगतात. कारण “With Great Power Comes Great Responsibility! म्हणून तर सत्ता असणाऱ्या नेत्यांकडे दूरद्रुष्टी असावी लागते, व्हीजन असावे लागते. आपण घेतलेल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम वाईट होऊ शकतात हे जाणण्याची दूरद्रुष्टी असावी लागते! सत्ताधाऱ्यांनी केवळ तात्कालिक फायदा बघून चालत नाही तर दूरगामी परिणामांचा विचार करावा लागतो. शिवाजी महाराजांना ती दूरद्रुष्टी होती. आपल्याकडच्या काही समाज सुधारकांना, संत, वैज्ञानिक यांच्याकडे ती समज होती. त्यांनी त्यावेळेस केलेल्या सुधारणांचे, संस्कारांचे, निर्णयांचे, बदलांचे फायदे आपली पिढी आजही उपभोगत आहेच ना?

हे सर्व जर तुम्हाला पटत असेल तर मागच्या पिढीतल्या माणसांच्या एखाद्या चुकीच्या कृतीने दुसऱ्याला शरिराला, मनाला, आत्म्याला झालेल्या वेदनेचे तळतळाट नाहीतर शाप हे द्रुष्य वा अद्रुष्य परीणाम आपल्या आत्ताच्या पिढीला भोगायला लागु शकत नाही का? शेवटी वारसा म्हणजे तरी काय? आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या वाईट गोष्टींच्या परिणामांचं उत्तरदायित्व! वारसा म्हणजे केवळ स्थावरजंगम मालमत्ता नाही. तो जसा आर्थिक तसाच सांस्कृतिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक, बौध्दीक आणि इहलौकिक सुध्दा!

तुम्ही वैज्ञानिक आहात. प्रत्येक गोष्टीची कारण मिमांसा, लॉजिक, कार्यकारण भाव हे तुम्ही शोधायचा प्रयत्न करता. पण आपल्या व इतरांच्या आयुष्यात काही घटना घडत असतात ज्यांची कारणमीमांसा आपल्याला करता येते का? आपल्या भोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा कार्यकारण भाव आपल्या बुध्दीच्या आवाक्यात असतो का? मग आपण त्या घटनांना, आपल्याला समजतील आणि मानवातील अशी लेबलं देत असतो.

“आता तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला काहीतरी पूजाअर्चा, विधी, मंत्र-तंत्र, अघोरी उपाय, अनुष्ठानं वैगरे करायला सांगेन जेणे करुन ह्या शापावर कींवा परीणामांवर उपाय कींवा उतारा होइल. पण मी आत्ता तरी तसं काहीच सांगणार नाही अनिरुद्ध! याचं कारण, जी काही चुकीची क्रृती घडली ती पूर्वीच घडून गेली आहे. काळ निघून गेला आहे. झालेल्या परीणामांच निराकारण आणि प्रायश्चित्त हे ज्यांनी कृती केली त्यांनी, नाहीतर त्यांच्या पुढच्या पिढीला करणं आवश्यक असतं. तसेच या शापाचा प्रभाव कमी व्हायला एखादं व्रत, अनुष्ठानं असेल तर ते देखील पुढच्या पिढीला करावं लागतं. तुमच्या बाबतीत हे दोन्ही केले गेले आहे का ह्याची कुणालाही कल्पना नाही. त्यामुळे ते तुम्हालाच शोधायचं आहे. तुमच्या अगोदरच्या पिढीने काय भोगलं आहे?, काय उपाय योजना केल्या आहेत?, याचा शोध तुम्ही घेतलात तरच हे शक्य आहे आणि तो प्रवास तुमचा आहे. तुम्ही तो करायचा ठरवला तर माझ्याकडून होईल ती मदत मी करायला तयार आहे!”

गजेंद्र स्वामींनी बोलणं संपल्यावर एक आश्वासक हात अनिरुद्धच्या पाठीवर ठेवला आणि ते म्हणाले... “अनिरुद्ध, तुम्ही एक सज्जन व्यक्ती आहात. अंतर्बाह्य सज्जन. विचारी आहात. देव तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच दाखवेल! माझा विश्वास आहे. या आता!”

नाशिक मधून परतीच्या वाटेवर अनिरुद्ध काही न बोलता शांत बसून होते पण त्यांच्या मनात विचारांच दंद्व चालू होतं. हॉटेलवरती परत आल्यावर भार्गवीने त्यांना खोदून खोदून प्रश्न विचारले पण अनिरुद्धने त्यांची मोघम उत्तरे दिली होती. “काही नाही गं!” आपल्या आदित्यची पत्रिका उत्तम आहे. काही होणार नाही त्याला. असं सांगून तीला तात्पुरतं शांत केलं होतं. मुख्य म्हणजे भार्गवीला हे सर्व सांगायचा त्यांचा आत्ता तरी विचार नव्हता. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना शाप उशाःप वैगरेवर विश्वास ठेऊ देत नव्हता. पण स्वामींनी दिलेली लॉजिकल उदाहरणं मनाला पटत देखील होती. अनिरुद्ध स्वतःच्या तत्त्वांशी एकनिष्ठ असले तरी हटवादी नव्हते. ते स्वतः ज्ञानयोग आणि कर्मयोगात श्रध्दा ठेवणारे असले तरी आपल्या बायकोचा आस्तिक आणि श्रध्दाळु स्वभाव आणि सात्विक भक्ती यांचा त्यांनी कायम आदर केला होता. मनातल्या मनात द्वंद्व सुरु होतं. शेवटी त्यांनी एक अखेरचा प्रश्न स्वतःला विचारला. तुझ्या करता तुझी तत्वं महत्वाची की तुझं मुल आणि बायको? आणि त्याच उत्तर त्यांना मिळालेलं होतं. शाप उशाःप कींवा आणखी काही चुका असोत, त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक होतं, निराकरण करणं आवश्यक होतं! भूतकाळात जाऊन ह्या सर्वांची उत्तरे शोधणं आवश्यक होतं!

गाडी मुंबईला पोहोचेपर्यंत अनिरुद्धचा निर्णय झालेला होता!

क्रमशः


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.