वारसा भाग २ (शापित) - मराठी कथा

वारसा भाग २,शापित,मराठी कथा - [Varsa Part 2,Shapit,Marathi Katha] मातीशी ऋणानुबंध ठेवुन दिलेल्या संस्कारांचा,परंपरेचा व माणुसकीचा वारसा.
वारसा भाग २ (शापित) - मराठी कथा | Varsa - Part 2 (Shapit) - Marathi Katha

आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवुन शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा


६/०४/२०२०
स्थळ: New Jersey (USA)

सकाळचे ५:३० वाजले होते. एप्रिल महिन्यातला सोमवार होता. तसाही कडक लॉकडाउन असल्याने ऑफीसला जायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे मोबाईल थरथरला आणि वाजला तेव्हा आदित्य धडपडत उठला. आत्ता फोन?! त्याला एकदम काळजी वाटली. नक्की अप्पांचा फोन. त्याचा अंदाज खरा होता. फोन अप्पांच्याच नंबर वरुन आला होता पण आवाज शेजारच्या काकांचा होता.

“आदीत्य! बेटा आम्हाला फोनवर तुला सांगायला फार वाईट वाटतय रे, पण अप्पांना आज सकाळी हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट केलं होत. ते घरीच बेशुद्ध पडले होते. त्यांना ICU मधे ठेवलं. आम्ही तुला आधीच फोन करणार होतो पण तुझ्याकडे मध्यरात्र असेल म्हणून वाटलं थोड्यावेळाने करावा. पण ईतक्यात हॉस्पिटलचा फोन आला. ते कोमात गेले ते गेलेच! तुला तर माहितीच असेल ना की ब्रेन कॅन्सर मधून ते वाचणं अशक्य होतं!

आदित्यला क्षणभर काय ऐकतोय यावर विश्वास बसेना. त्याचं दर आठवड्याला एक स्काईप कींवा व्हिडीओ चॅट व्हायचं. याच वेळी दहा बारा दिवसात जमलं नव्हतं कारण लॉकडाउनच्या गडबडीत तो आणि रॅचेल (त्याची बायको) तीच्या आई बाबांकडे गेलेल्या त्यांच्या मुलाला, अनिशला आणायला गेले होते आणि घरात ग्रोसरी आणण्यासाठी त्यांचा शनिवार रविवार व्यस्त झाला होता.

पण अप्पांना ब्रेन कॅन्सर होता? कधीपासून? आपल्याला काहीही का बोलले नाहीत अप्पा? आदित्यचं डोकं भणाणलं. त्याने रॅचेलला उठवलं आणि तिला अप्पांच्या मृत्यूबद्दल सांगताना आदित्यचा स्वतःच्या भावनांवरचा बांध सुटला!


१२/०४/२०२०
स्थळ: New Jersey (USA)

आदित्यच्या घरी रविवारी भेटायला जायचं असं आम्हा मित्रांच ठरलं होतं. जर्सी मधे कोविडच्या केसेसचा उद्रेक झाला होता. त्यामुळे चार ते पाच जणांपेक्षा कोणीही एकत्र जमायचे नाही, बाकिच्या मित्रांनी झुम वरच बोलायचं हे ठरवूनच मी त्याच्या घरी पोहोचलो होतो.

काही दिवसांपूर्वी, त्याच्या वडलांची, अनिरुद्ध सरनोबतांची म्हणजेच अप्पांच्या मृत्यूची बातमी सांगताना आदित्य चांगलाच अपसेट झालेला जाणवत होता. अगदी सहाजिक होतं ते. दोन वर्षांपूर्वी त्याची आई गेली होती. नशिबाने त्यावेळेस तो भारतातच होता म्हणून शेवटची भेट तरी झाली होती. या वेळी कोविड पॅनडेमिकमुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केले होते. कुठल्याही परिस्थितीत भारतात जाणं शक्यच नव्हतं. अप्पा या स्थितीत गेल्याचं मलाही फार वाईट वाटत होतं.

आदित्य आणि मी शाळेपासून एकत्र. तो कायम पहील्या क्रमांकावर, मी मात्र साठ टक्के वाला. तो गणित सायन्स मधे टॉपवर तर मी आपला समाजशास्त्र, इतिहासात रमलेलो. मला सायन्स समजायला जडं जाई. पण अप्पा ते आम्हाला अगदी सोप्प करून शिकवत असतं. अप्पा अत्यंत बुद्धिमान आणि कट्टर विज्ञानवादी. भौतिकशास्त्रात Phd करुन अप्पा BARC मधे काम करतं होते. आदित्य करता चांगली मराठी शाळा हवी म्हणून देवनारला त्याच्या अलिशान फ्लॅटमधे न राहता दादरला शिवाजी पार्क जवळच्या आमच्या छोटेखानी इमारतीतल्या साध्या फ्लॅटमधे ते रहात असत. माझी आणि आदित्यची मैत्री तेव्हा पासूनच. माझं नाव शशी म्हणून काकू मला आणि आदित्यला गमतीने “आले का सूर्य चंद्र खेळून” असं म्हणतं! आदित्य हुशार असला तरी त्यांना माझंही तेवढच कौतुक. माझं ड्रॉईंग, माझा खेळ, माझे ट्रेकिंग वैगरे मधल्या ट्रॉफीजचं त्या खुल्या दिलाने कौतुक करायच्या. पुढे आदित्य, IIT, करुन MS करायला अमेरिकेत आला आणि इथेच एका मेडीकल कंपनीने त्याला उच्च पदावर सन्मानाने नियुक्त केले. त्याचे लग्न देखील अमेरिकेन मुलीशी झाले होते. दोघांना अनिश नावाचा गोड मुलगा होता. माझा ट्रॅक थोडा वेगळा. मी इतिहास व राज्यशास्त्र मधे ग्रॅज्युएशन करुन मग archaeology घेऊन माझी वेगळी वाट धरली. त्यात Phd करुन विविध सरकारी प्रोजेक्ट वर काम करायला लागलो. बायकोला अमेरिकेत अॅनिमेशन मधे उत्तम संधी मिळाली आणि मी देखील तीच्या बरोबर अमेरिकेत येऊन University of Newark मधे Archaeology शिकवायला लागलो होतो. माझ्या आणि आदित्यच्या गाठीभेटी इथेही सुरू झाल्या होत्या. आम्ही मीत्र घरी पोहोचलो तो आदित्यचा चेहरा पार उतरलेला होता. अप्पांची शेवटची भेट होऊ शकली नाही ह्याचं दुखः होतं पण त्यापेक्षाही अप्पांनी ब्रेन कॅन्सरबद्दल काहीही सांगितले नाही याचं जास्त. काहीतरी त्यांच्या डोक्यात घोळत होतं येवढं नक्की. सांत्वनपर बोलणं होऊन आम्ही जायला निघालो तेव्हा आदित्यने मला खुणेनेच, जरा थांब असे सांगितले. बाकीचे गेल्यावरती तो मला त्याच्या स्टडीत घेउन गेला आणि माझ्या हातात त्याने एक जाडजूड लखोटा ठेवला. “हे बघं! हे वाच. आप्पांचं शेवटचं पत्र आहे हे! ज्या दिवशी अप्पा गेल्याचा फोन आला त्याच दिवशी दुपारी कुरिअरने आलं आहे. अप्पांनी मुद्दामहून माझ्या पासून ब्रेन कॅन्सरची बातमी का लपवून ठेवली ते लिहिले आहे त्यात. त्यांच विल आहे... आणि... बरंच काही आहे...”

अरे!! आदित्य, ही तुमच्या मधली खासगी बाब आहे रे. तु मला कशाला दाखवतोस? मी पटकन अवघडून म्हणालो.

“नाही...! आदित्य मला थांबवत म्हणाला. त्यात अजूनही बरचं काही लिहिले आहे जे मला वाटतंय की तु वाचावसं. मला देखील समजावून सांगावसं आणि कुठेतरी डॉक्युमेंट करावसं!! उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या अनिशला तुच हे सांगावसं असं मला वाटतं. प्लीज एवढं वाच. You are the only person I trust completely and you are an expert in history. म्हणून सांगतोय तुला मी.

“ओके! आदित्य, don't worry! Anything for you and Appa, असं म्हणून त्याला आश्वस्त करत मी घरी निघालो. रात्री जेवणानंतर शांतपणे ते पत्र वाचले. एकदा, दोनदा... तीनदा वाचलं. हे सर्व वाचून मी देखील विचारात पडलो. आप्पांच्या लिखाणात बऱ्याच ठीकाणी खाडाखोड होती. बऱ्यापैकी चुका होत्या आणि ते अगदी सहाजिक होतं. त्याच्या मेंदुवर येणारा ताण बघता त्यांना लिहायला, आठवायला प्रचंड कष्ट पडले असणार हे अगदी स्वाभाविक होतं आणि तरी देखील वीस पानांच्या त्या पत्रात काय नव्हतं!? काही पिढ्यांचा प्रवास, अनुभव, विचारमंथन, त्यांच्या मनस्थितीचं दर्शन, ऐतिहासिक आणि भौगोलिक वर्णन आणि या प्रत्येक गोष्टीतली अप्पांची विचारी व्रृत्ती, प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करण्यासाठी केलेले प्रयत्न. मी थक्क झालो. मनातल्या मनात नतमस्तक झालो. केवळ आदित्यचा आग्रह म्हणून नाही किंवा केवळ मी अप्पांना ओळखत होतो म्हणून नाही पण त्यांच्या या संपूर्ण प्रवासातल्या कष्टांकरता त्या पत्रातली त्यांची कहाणी योग्य पध्दतीने डॉक्युमेंट करणं मला माझं कर्तव्य वाटलं. म्हणून मी ती आज माझ्या पध्दतीने एक कथानक म्हणून लिहीणार आहे आणि तुमच्या बरोबर शेअर करणार आहे!


स्थळ: त्र्यंबकेश्वर (नाशिक जिल्हा)
काळ: आजपासून ३० वर्षांपूर्वीचा

अनिरुद्ध सरनोबत आश्रमात गजेंद्र स्वामींच्या समोर बसले होते. गेले काही दिवसांपासून त्यांच्या बायकोचा आणि स्वामींचा पत्रव्यवहार सुरू होता. त्यांचा एकुलता एक मुलगा, आदित्य गेले काही दिवस आजारी होता. पत्रिका, कुंडली, राशीभविष्य वैगरे गोष्टींवरती अनिरुद्धचा विश्वास कधीच नव्हता. पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन ते वाढले होते. शिकले होते. प्रत्येक बाबतीत कारण मिमांसा, लॉजिक आणि त्याचा मूळापासुन करायचा विचार हा त्यांचा आत्तापर्यंतचा अभ्यासाचा पाया होता. स्वामींनी जेव्हा मुलाच्या वडीलांशीच बोलायची ईच्छा प्रदर्शित केली तेव्हा सुध्दा ते आपल्या बायकोवरच्या प्रेमाखातर नाशिकला आले होते. आज त्या दोघांना पांडव लेण्यांच्या ट्रीपला पाठवून ते एकटेच स्वामींच्या दर्शनासाठी आश्रमात आले होते. पहिलं कुशल मंगल विचारुन झाल्यावर स्वामींनी पत्रिकेवर एक नजर फिरवली आणि डोळे मिटून ते ध्यानात बसले. दहा - पंधरा मिनिटे झाली आणि गजेंद्र स्वामी ध्यानातून बाहेर आले. त्यांनी डोळे उघडले, शेजारी ठेवलेल्या तांब्यातील घोटभर पाणी पिऊन त्यांनी घसा ओला केला आणि आपल्या धीरगंभीर आवाजात अनिरुद्धशी बोलायला सुरुवात केली.

“तुम्हाला मी आज जे सांगणार आहे हे मला माझा आजवर जो काही अभ्यास आहे, माझ्या गुरुंनी मला जी काही विद्या आणि शक्ती प्रदान केली आहे आणि देवाने मला एक मार्गदर्शक म्हणून या कामात नियुक्त केले आहे त्या अधिकाराने सांगत आहे. त्यावर विश्वास ठेवणं वा न ठेवणं हे संपूर्णपणे तुमच्या हातात आहे. मी कोणालाही स्वतःच्या मनाविरुद्ध वा इच्छे विरुध्द वागायला भाग पाडत नाही. मी तुमची, तुमच्या पत्नीची आणि मुलाची अशा तीन्ही पत्रिका अभ्यासल्या. तुमच्या मुलाच्या पत्रिकेत दोष असा काही नाही. दोष असेलच तर तो तुमच्या पूर्वजांचा आहे! तुमच्या घराण्याचा आहे! तुमच्या संपूर्ण घराण्याला शाप आहे! तुमच्या घराण्यातल्या प्रत्येक वारसदाराचं आयुष्य शापित आहे सरनोबत!

क्रमशः


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.