प्रेम हे नावावर नसतं - भाग १ - मराठी कथा

प्रेम हे नावावर नसतं - भाग १, मराठी कथा - [Prem He Navavar Nasata - Part 1, Marathi Katha] ती संध्याकाळ, ती तिथेच उभी होती शांत, स्तब्ध.
प्रेम हे नावावर नसतं - भाग १ - मराठी कथा | Prem He Navavar Nasata - Part 1 - Marathi Katha

ती संध्याकाळ

ती तिथेच उभी होती शांत, स्तब्ध त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत. तिला कळतच नव्हतं काय खरं आणि काय खोटं. तो जे आता बोलून गेला कि ते जे आजवर तो बोलत होता. ती स्वप्ने जी दोघांनी एकत्र बघितली, कि आजचे हे सत्य जे ती जगत होती.

अचानक त्याच्या बोलण्याने तिच्या मनातले वादळ शांत झाले होते कि आणखीनच उधाणले होते. काही कळत नव्हतं. तरी ती तशीच स्तब्ध उभी होती, तिला बोलायचे होते, ओरडायचे होते पण शब्द जणू हरवले होते तिच्या ओठांवरून. तिचा कंठ दाटून आले होते, डोळे पाणावले होते. प्रशांतची पाठमोरी प्रतिमा सुद्धा अंधुक आणि धूसर दिसत होती. नकळत तिच्या डोळ्यातील अश्रुंना वाट मिळाली आणि तिच्या आकांताचा दाह फुटला व ती जमिनीवर कोसळली जणू तिच्या पायातील त्राण नाहीसे झाले होते. ती तशीच काही तास जमिनीवर पडून होती.

मग स्वतःला सावरत हलक्या शरीराने व मोडक्या मनाने ती खिडकीतून बाहेर डोकावते तर बाहेर ना दिवस होता ना पूर्ण रात्र झाली होती. एक विचित्रशी वेळ दाटून आली होती, आभाळ नारंगी रंगाचा व त्यावर काळसर छटा दिसत होत्या तर पाखरे सुद्धा परतीच्या मार्गावर होती. कितीतरी वेळ आकाशाकडे ती तशीच टक लावून बघत उभी होती. अचानक अंधाराचा प्रभाव वाढला आभाळ काळंभोर दिसायला लागलं, रस्त्याकडे बघता त्यावरची रहदारी सुद्धा कमी झाली होती. बघता बघता सगळ शांत - स्तब्ध झाले होते. अगदी तिच्या मनासारखं.

ती खिडकी जवळ तशीच उभी होती. एकटक शून्यात बघत. रात्र कशी बुडाली व दिवस कसा उजाडला काही कळलेच नाही. सूर्याची एक तिरीप तिच्या चेहऱ्यावर पडताच ती भानावर आली.

स्वतःला सावरत ती स्वयंपाकघरात जाते कशीबशी घरातली आवराआवर आटोपून तयारी करते व ऑफिसच्या मार्गावर लागते. जेव्हा ऑफीसला पोहोचते तेव्हा तिच्या लक्षात येत कि ती वेळेच्या बऱ्याच आधी पोहोचलेली आहे. ती ऑफिसच्या शेजारच्या बाकावर बसते, तसे परत काल संध्याकाळचे सगळे तिला आठवू लागते व परत ती त्या विचारात भान हरवून शून्यात जाते. अचानक तिला आवाज येतो, तिला कुणी हाक मारीत असतं. ती भानावर येते मान वर उचलून बघते तिथे तिचा ऑफिस बॉय असतो.

“मॅडम आज तुम्ही ऑफिसला इतक्या लवकर कशा?” ऑफिसबॉयने विचारले.

“अरे ऑफिसचे महत्वाचे काम होते”, असे म्हणत अर्पिता आत आपल्या डेस्कवर जाऊन बसते.

ती कॉम्पुटर ऑन करते व हातात काही फाईल्स घेऊन चाळत बसते. खरं तर तिला काहीच काम नसते पण चुकून ती ऑफिसला लवकर येते. या आधी तीचे कधीच असे झालेले नसते. पण आता आल्याने तिला ऑफिस बॉयला कामाचा व्याप दाखवायचा असतो म्हणून ती कामात गुंग झाल्याचे दर्शवते. तिला कामात गुंतलेले बघून ऑफिस बॉय आपल्या कामाला लागतो.

काहीच वेळात ऑफिस इतर कर्मचाऱ्यांनी भरतं, सगळे ऑफिसमध्ये येताच आपापल्या कामात गुंततात. अचानक अर्पिताची सहकर्मी व जवळची मैत्रीण अनघा तिच्या जवळ येते, “अर्पिता आज तू इतक्या लवकर कशी काय?, कुठला नवीन प्रोजेक्ट मिळालाय का? मला कसकाय नाही कळलं.”

“नाही गं! जुन्या काही फाईल्स पेंडिंग होत्या त्याच पूर्ण करायला म्हणून आले” असं म्हणत अर्पिताने अनघाला बघितले.

त्यावर अनघा तिच्याकडे बघताच “अर्पिता तू बरी आहेस ना, तुझे डोळे का सुजलेले आहेत? घरी सगळे बरे आहे ना? आजी तर ठीक आहे ना?” अनघा जरा घाबरत आणि काळजीने तिला विचारते.

“हो गं! का काय झालं?, काल रात्री मला नीट झोप नाही आली त्यात किडा सुद्धा गेला डोळ्यात” म्हणत अर्पिता कॉम्पुटरकडे बघते व आपल्या कामाला लागते. जसा तसा दिवस पूर्ण करून ती ऑफिस सुटल्यानंतर पर्स घेऊन बाहेर पडते आणि थेट प्रशांतच्या घरी जायला निघते. प्रशांतच्या बंगल्या समोर येते आणि आत जाणार तोच तिची नजर बंगल्याच्या दाराबाहेर पडण्याऱ्या प्रशांतच्या घरातल्या नौकरावर पडते.

“काका प्रऽऽऽ प्रशांत आहे का घरी? ती जरा बिचकत विचारते.”

“मी त्याची कॉलेजची मैत्रीण अर्पिता”, अर्पिता जरा घाबरतच स्वतःची ओळख देते.

“नाही बेटा, तो तर एअरपोर्टला गेला आज रात्री तर त्याची फ्लाईट आहे, तो अमेरिकेला जातोय” नौकर सांगत आपल्या कामाने बाहेर निघून जातो.

आता मात्र अर्पिता पूरती तुटलेली असते. तिला काहीच कळत नाही प्रशांत तिला काहीच न सांगता निघून गेलेला असतो. त्याच्या अशाप्रकारे वागण्याचा आणि बोलण्याचा काहीच संदर्भ तिला लागत नाही. ती निराश आणि उदास मनाने तिथून काढता पाय घेते आणि आपल्या मार्गाला लागते.

घराच्या जवळ येताच तिला सगळं आठवायला लागतं. तिला त्या ठिकाणी राहायची ईच्छाच होत नसते. पण मग तिला आजीचा विचार येतो आणि ती आपसूकच घराच्या दिशेने वळते. दारावर पोहोचताच आजी दार उघडते आणि हसत हसत तीचं स्वागत करते.

“अगं अर्पिता किती हा उशीर, मला जरा एक कॉल तर करायचा तुला माहित आहे ना मला किती भीती असते, तू घरी येईस तोवर” असे म्हणत आजी अर्पिताला पाणी देते.

“आजीऽऽऽ आज ऑफिसचं थोडे काम होते, लक्षात नाही राहिले फोन करायचे”, म्हणत अर्पिता तिच्या खोलीत जाते. ती बेडवर थकून हताश बसते, तसेच काही तास ती विचारात बसलेली असते. खोलीत अंधार बघून आजी आत येते, “अगं अप्पू जरा लाईट तर लाव!” तो आवाज ऐकून अर्पिता भानावर येते. आजी तिच्या जवळ येत “तू खूप थकलीयस का आज?” आजी विचारत तिच्या डोक्यावरून हात फिरवत. तिच्या जवळ बसते ती हळूच आजीच्या मांडीत डोकं ठेवते.

आजी तिच्या केसात हात फिरवत “एवढ्यात काम खूप वाढलंय का गं?, स्वतःला बघ काय हाल केलेत ते.”
ती उगाचच “हमऽऽऽ, सहज गं आजी.”
“मला तुझी काळजी वाटते, अप्पू!”, आजी चिंतेने बोलते.
असेच काही दिवस जातात, अर्पिताचे खाणे पिणे कमी होते तिची रात्रीची झोप न होत असल्याने तिच्या डोळ्यांखाली काळं वर्तुळ येते. ती पूर्वीपेक्षा शांत झालेली असते. तिचे हसणे जणू कुठे हरवून गेलेले असते.

तिची हि अवस्था बघून आजी अधिक निराश आणि खिन्न मनाने चिंतेत असते. ह्याचा परिणाम आजीची तब्बेत खूप खालावते आणि ती सतत आजारी पडू लागते. एक रात्र अचानक आजीला हार्टअटॅक येऊन ती खाली पडते, अर्पिता तातडीने आजीला हॉस्पटिलमध्ये ऍडमिट करते.

“तुमच्या आजींची अवस्था फार नाजूक झाली आहे, त्यांना बायपास सर्जरीची नितांत आवश्यकता आहे”, इतके बोलून डॉक्टर दुसरे पेशंट बघायला लागतात. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून अर्पिता थोडी चिंतेतच असते तेवढ्यात पुढून एक बाई तिला येतांना दिसते, तो चेहरा अर्पिताच्या ओळखीचा असतो.

क्रमशः


ऋचा पिंपळसकर | Rucha Pimplaskar
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लेखनाची अत्यंत आवड असणाऱ्या ऋचा पिंपळसकर मुळात एक कम्युनिकेशन ट्रेनर म्हणुन कार्यरत आहेत यांची स्वतःची एक वेगळी लेखनशैली आहे.

२ टिप्पण्या

  1. दुसरा भाग केव्हा वाचता येईल?
    1. या कथेचा पुढील भाग उद्या दिनांक १४ डिसेंबर रोजी प्रकाशित होत आहे.
      या कथेचे एकुन ३६ भाग असुन रोज एक या प्रमाणे सर्व भाग प्रकशित होतील.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.