त्या कोळशाचा आज चारकोल झाला आहे, अनुभव कथन - [Tya Kolshyacha Aaj Charcoal Jhala Aahe, Anubhav Kathan] माझ्या चारकोल चित्रांबद्दल एक आठवण.
हरीकाकांची मनाला हुरहूर लावणारी आठवण येते...
सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. त्या वेळी मी पाच - सहा वर्षाचा असेन, आम्ही यावलला मठात राहत होतो. मठात पाच - सहा खोल्यात दोन - तीन परिवार राहत होते. आमच्या खोली बाहेर एक आड आणि मोरी होती. पुढे अंगण व अंगणातून बाहेर पडायला समोर मोठा दरवाजा होता. त्या बाहेर पायऱ्या. पायऱ्याच्या दोन्ही बाजूला दगडी लांब ओटे, डाव्या बाजूच्या ओट्याजवळ डीझेलची मोठी टाकी ठेवली होती. टाकीत बैलगाडीच्या आसात घालण्याचं तेल होतं.त्या टाकीवर दीपक आणि मी कोळशाने रेघोट्या ओढत असू, चित्र काढत असू. तो आमचा आवडता छंद होता. रेघोट्या, चित्र केवळ टाकीवरच काय पण कोळशानं गिरगीटणं भिंतीवर वा इतर कुठेही सुरुचं असायचं. दिपकनं त्यासाठी अनेक वेळा मार खाल्याचे मला आठवतं. ती पत्री टाकी आमच्या साठी लहानपणी खेळणं होती. दगडाने ताल धरून तिला वाजवणं किवां कोळशाने तिच्यावर चित्रं काढत बसणं हा आमचा शाळा सुटल्यावर रोजचा उद्योग. कोळशाने काळे झालेले हातपाय, शाळेचा पांढरा शर्ट, खाकी पँट याचं आम्हाला कधीही वाईट वाटले नाही. आजूबाजूच्या मोठ्यांच्या संस्कारात ते बसत नव्ह्तं. त्यामुळे आम्ही त्यांना अस्वच्छ, असभ्य वाटत असू. अश्या सभ्य असलेल्यांची अनेक वेळा बोलणी खावी लागत असे. आम्ही त्यांना भीत असू. एके दिवशी गल्लीतला गोवर्धन वैतागून आम्हाला बदडण्यासाठी दीपक व माझ्यावर धावून आला. कारण ताल, तोल, लय, कोळसा, रेघोट्या आदी.
तसं आम्ही दोघे त्याच्या हाती थोडीच लागणार होतो. चावडी वरील अंधाऱ्या खोलीत दीड तास लपून बसलो, नंतर काळोखातील वळणदार रस्त्यावरून घरी जातांना रस्त्यावरील दिव्यांचा उजेड चुकवत होतो. कोळशासारख्या घट्ट काळोखाचं पांघरून गोवर्धनाच्या नजरे पासून सुरक्षित ठेवील, अशी आमची धारणा होती.
इथं मला हरी काकांची आठवण येते. साठी - सत्तरीतल्या हरी काकांचं मठासमोर लोखंडकामाचं दुकान होत. हरी काका सर्वाना माया लावत असतं. त्यांनी गोवर्धनला दुसऱ्या दिवशी बोलावून घेतलं आणि लेकरांना का त्रास देतो म्हणून, झापझाप झापलं. हरी काकांना आमची चित्रे, रेघोट्या आवडत असे. ते का ? हे आम्हाला तेव्हा कळत नव्हतं व ते तसं का असा विचार करण्याचं आमचं वयही नव्हतं. पाच - सहा फुट उंचीचे, सडपातळ, सावळे हरीकाका हरहुन्नरी होते. त्यांना काय येत नव्हतं ? सगळं येत होतं. म्हणजे लोहारकाम, मोटार, चक्की, इंजिन दुरुस्ती पासून तर पार बंदूक दुरुस्ती पर्यंत, सगळ्यात हरी काकांचं डोक चालत असे. शिवाय सुदर्शन चित्र मंदिरात हरी काका सिनेमाची मशीन ऑपरेट करीत असतं. एक दोन वेळा हरी काकांनी आम्हाला सिनेमाला देखील नेलं होतं. गल्लीतील इतर मुलांपेक्षा हरी काकांच दीपक आणि माझ्यावर अधिक प्रेम, कधीकधी ते आमच्यासाठी रावळगाव चॉकलेट किवां षटकोनी खारी बिस्कीट कोटाच्या खिश्यात घालून आणत असतं. डोक्यावरची काळी गोल टोपी खुंटीला टांगत असताना, “पोरा तुमचा खाऊ घे कोटाच्या खिश्यातून आणि त्याला पण दे.” असं दीपकला सांगत असतं. दीपक त्यांच्या दुसऱ्या मुलाचा मुलगा. परंतु दीपक व माझ्यात त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. जे दीपकला ते मलाही असे. काकांनी आमची चित्र नीट पहिल्याचे आम्हाला आठवत नाही. परंतु चित्रासाठी उर्जा मात्र दिली. दीपक व मला त्यांनी खडूचा डबा आणून दिल्याचं नीट स्मरणात आहे. त्यामुळे पांढरा, काळा, उजेड, काळोखातील लपंडाव कळत गेला. पांढऱ्याशुभ्र खडूच्या रेषा आम्हाला खूप भावल्या नाहीत. रेषा म्हटलं की, ती काळीच असते, असे नकळतं झालेले संस्कार आम्ही स्विकारले असावेत. परंतु काळ्या - पांढऱ्याचं नातं दिवस रात्री सारखं आहे असं उगाचच वाटत होतं.
रामपंचायतनाच्या छापील चित्रावर पंचेचाळीस वर्षापूर्वी हरी काकांनी काढलेलं हनुमानाचं चित्र पाहिल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. हरी काकांना चित्र काढता येत होतं, हे आम्हाला माहित पडलं तेव्हा फार उशीर झाला होता. त्यांना जाऊन आज बराच काळ लोटला. कल्याण मासिकात छापून आलेलं रंगीत रामपंचायतनाचं चित्र काकांनी फ्रेमवाल्याकडून मढवून आणलं आणि दुकानातील पलंगाच्या मागील भिंतीवर लटकवलं.
त्यांचा मित्र शिवरामनी ते बघितलं आणि त्यांना म्हणाला, “हरीभाऊ, रामाच्या पाया जवळ हनुमान पाहिजे होता, तेवढं एक कमी आहे चित्रात, नाहीतर चित्र एकदम मस्त आहे बघा.” झालं. हरी काका तेवढयाने अस्वस्थ झाले. हरी काका खरंतर देवदेव करणाऱ्यातील नव्हते. पंचवटीजवळ राहत असून त्यांना मी कधी राम मंदिरात जातांना बघितलं नव्हतं किवा एकदाशी, शिवरात्र धरल्याचं ऐकलं नव्हतं. परंतु कल्याण मासिकातील छापील चित्राची कलाकुसर काकांना भावली असावी.
पाच सहा दिवसांनी काकांनी फ्रेम मधून अलगद चित्र बाहेर काढलं आणि कोटाच्या खिश्यातील फाउंटनपेनाने रामाच्या पायाजवळ हनुमानाचं सुंदर चित्र रेखाटलं. पिळदार, केसाळ शरीर असलेल्या, भक्तीभावनेनं लीन, अश्या सेवक हनुमानाची लयदार शेपटी, आणि बाजूला जमिनीवर ठेवलेली अवजड गदा अश्या बारीकसारीक तपशिलांनी रामपंचायतनाचं चित्र पूर्ण झालं.
हरी काकांचं दीपक आणि माझ्यावर असलेल्या प्रेमाचं गमक हळूहळू उमगत होतं. अनेक दिवसांनी, नव्हे वर्षानी आज यावलला येण्याचा योग आला होता. तेव्हा त्या हनुमानाचं चित्र पाहण्याची तीव्र इच्छा झाली. दुकानाच्या ओसरीतील रामपंचायतनाचा काचेत मढवलेल्या फोटो जवळ गेलो. उदबत्तीच्या धुराने काळी झालेली काच खिश्यातील रुमालाने साफ केली. फाउंटनपेनच्या शाईत रेखाटलेला हनुमान आणि हरीकाकांच्या आठवणी पुसट झाल्या होत्या. पेनाच्या निबेची व्रण मात्र कल्याण मासिकातील छापील चित्राच्या आणि अंतःकरणाच्या कागदावर खोलवर रुजली होती.
हरी काकांनी माझ्या हातातील कोळसा शाबुत राहावा म्हणून स्वतः कुंपण झालेत. त्या कोळशाचा आज “चारकोल” झाला आहे.
हरीकाकांची मनाला हुरहूर लावणारी आठवण येते.
(खालील चित्रात हरीकाकांच्या आठवणी साकळल्या आहेत)
डॉक्टर तरतरे यांची लेखणी अगदीच त्यांच्या चित्रांसारखी आहे; व्यक्त होणारी. शिवाय तुम्ही लेखाची केलेली मांडणी अतिशय सुंदर आहे.
उत्तर द्याहटवाडॉक्टर गणेश तरतरे यांचे आणखी लेख वाचायला नक्की आवडतील.