मोकळा श्वास - मराठी कथा

मोकळा श्वास, मराठी कथा - [Mokala Shwas, Marathi Katha] गुदमरलेल्या सहजीवनातील नाजुक हळूवार अशा नात्याची गोष्ट.
मोकळा श्वास - मराठी कथा | Mokala Shwas - Marathi Katha

सहजीवनातील हातातून सुटून गेलेले क्षण पुन्हा कधीच परत येत नसतात; म्हणुन...

‘काय हो, एक महिना मी इथे नव्हती तर कपाट किती अस्ताव्यस्त करून ठेवलंय.’ कपाट आवरता आवरता वीणा, सुधीरला म्हणाली आणि इकडे सुधीर मात्र आपल्याच तंद्रीत होते. कपाट आवरून झाल्यावर वीणापण सुधीरच्या बाजूला येऊन बसली आणि एक महिना मुलीकडे जून आली होती तर तिकडच्या गोष्टी सांगत होती. ‘आपल्या लेकीच्या सासरचे सर्व लोक खुप चांगले आहेत. जावई तर लेकीला, जुईलीला फुलासारखे जपतात. तिच्या सासुबाई तर आईसारखी माया करतात. मी त्या आल्यावर लगेच येणार होती, पण त्यांनी मला निघूच दिले नाही.

त्या मला म्हणाल्या कि, तुम्ही आमच्या सुनेचे करायला एवढे दिवस थांबलात आता तुम्ही ३ - ४ दिवस अगदी आराम करा आणि मगच जा. जावईपण ऐकेनात मग माझा अगदीच नाईलाज झाला.’ ‘अहो सॉरी, पण काय करू. मला त्यांचा इतका आग्रह मोडवेनाच. तुम्हाला खुप कामाचा त्रास झाला असेल. जेवणाचे पण हाल झाले तुमचे. अहो, मी काय म्हणते आहे ते ऐकताय ना?’ ‘हो ऐकतोय. मला काही त्रास झाला नाही.’ ‘थांबा, मी आता तुमच्या आवडीची कडक कॉफी करून आणते.’ ‘नाही, नकोय मला; आणि आता मी कडक कॉफी नाही पित. मला कोल्ड कॉफी आवडते.’ ‘काय? हा बदल कसा काय झाला. तुमच्या ऑफिसच्या कॅन्टीनला तर कडक कॉफी मिळते.’ ‘हो. बदलल्या काही आवडी माझ्या एक महिन्यात.

ऑफीसच्या कॅन्टिनला कडक कॉफी मिळत असली तरी ऑफीस समोरच्या कॉफी शॉपमध्ये मिळते कोल्ड कॉफी. मी आता बाहेर जात आहे. जेवणाच्या वेळेपर्यंत येतो आणि सारखा सारखा फोन नको करू.’ ‘अहो, पण तुम्ही आता यावेळी कुठे निघालात?’ पण वीणाचे बोलणे ऐकण्यासाठी सुधीर होतेच कुठे? ते तर केव्हाच निघून गेले होते. वीणा कितीतरी वेळ सुधीर गेले त्या दिशेकडे सुन्नपणे बघत राहिली. तिला कळतच नव्हते की काय झाले. सुधीर यापुर्वी असे कधीच वागत नव्हते.

आपण लेकीकडे गेलो याचा राग आला असेल का? पण आपली लेक अडचणीत असतांना आपण नाही मदत करणार तर कोण करेल. शेवटी आई आहे आपण आणि एका स्त्रीची अडचण अत्रीच ओळखू शकते. शेवटी तिने एकटीसाठी कॉफी केली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. सुधीरला आठ वाजता जेवायला लागते म्हणून तिने सर्व स्वयंपाक आठ वाजेपर्यंत तयार ठेवला. साडेआठ वाजले तरी सुधीरचा पत्ता नव्हता. शेवटी नऊ वाजता स्वारी घरी आली. ‘अहो, हे काय? मी केव्हाची वाट बघतेय तुमची. पटकन कपडे बदलून या. मी जेवायला वाढते.’ ‘नाही, नको मला. माझे बाहेर खाणे झालेय. मला भुक नाहीये. तू जेवून घे.’

सुधीरचे असे वारंवार वागणे वीणासाठी गुढ होत चालले होते. ती आपले मनही कोणाजवळ मोकळे करु शकत नव्हती. शेवटी एके दिवशी तिने सुधीरलाच विचारले, ‘तुमच्या मनात काय चालले आहे मला समजेल का? तुमचे दिवसेंदिवस वागणे तिऱ्हाईतासारखे होत चालले आहे.’ ‘वीणा, खरे तर हे मला कधीपासून सांगायचे होते, पण कुठून सुरुवात करायची हेच कळत नव्हते. आज तुच विषय काढला बरे झाले. तुला माझ्या ऑफिसमधील श्रद्धा माहित आहे ना?’ ‘काय, तुम्ही तिच्यात गुंतला आहात?’ ‘एक मिनीट. तू आधी माझे पुर्ण बोलणे ऐकून घे नाहीतर अर्धवट माहितीने तुझा गैरसमज व्हायचा.

तू जुईलीकडे गेल्यावर मी जास्तीत जास्त वेळ ऑफिसला असायचो. त्या दिवशीही मी श्रद्धाला दुसऱ्या दिवशी टाईप करण्याच्या लेटरचे डिटेक्शन दिले आणि माझे - माझे काम करत बसलो होतो. साधारण ७:३० - ८:०० वाजेच्या सुमारास वॉचमन धावतच आला, त्याने मला सांगितले की लिफ्टमध्ये श्रद्धा मॅडम बेशुद्ध पडल्या आहेत. वॉचमनच्या मदतीने त्यांना ऑफिसमध्ये आणले आणि समोरच्या डॉक्टरांना बोलावले. त्यांनी तपासून इंजेक्शन, गोळ्या दिल्या.

तिला खूप ताप असल्याने मी आपल्या गाडीतून तिला तिच्या घरी सोडले पण वाटेत तिच्यासाठी व माझ्यासाठी जेवणाचे पार्सल घेतले. तिला २ - ३ दिवस ऑफिसला येऊ नकोस व घरीच आराम करायला सांगितला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिचा मला फोन आला. तेव्हा तिने मला संगितले की, तिला आता खुप बरे वाटत आहे आणि मदत केल्याबद्दल आभार मानले. ३ - ४ दिवसानंतर ती ऑफिसला आली तेव्हा तिने मला संध्याकाळच्या जेवणाचे आमंत्रण दिले. जेवणानंतर आम्ही खुप गप्पा मारल्या. निघताना ती म्हणाली, सर खुप बरे वाटले तुमच्य़ाशी गप्पा मारुन. आम्ही एकमेकांशी खुप गप्पा करू लागलो. आमचे सुख - दुःख शेअर करू लागलो. त्यातून आमच्यात मैत्रीचे नातं निर्माण झालं. पण हे मैत्रीचे नातं अगदी निर्व्याज आहे. फिजिकल अट्रॅक्शन अजिबात नाही. मी तिच्याशी माझे सर्व प्रॉब्लेम शेअर करतो. ती देखील मला खुप सपोर्ट करते आणि आमच्या मैत्रीवर कोणी आक्षेप घेतलेला मला अजिबात चालणार नाही.’

‘बरोबर आहे तुमचे. मी तुमच्या मैत्रीवर आक्षेप घेत नाही. पण मला आधी सांगा मी कोणा पुरूषाशी मैत्री केली असती तर चालली असती का तुम्हाला? मी घरातील सर्व करत बसली, नातेवाईक संभाळत बसली, तुमच्या आई - वडीलांचे करत बसली त्यामुळे कदाचित आपल्यात फक्त व्यवहारीकच नाते निर्माण झाले. मला सुद्धा हे सर्व करताना मैत्रीचा हात हवा होता आणि तो तुमच्याकडून हवा होता. पण तुम्ही मात्र कायम नवऱ्याच्याच भुमिकेत राहिले. तुम्ही म्हणता तुमचे सुख - दुःख तिच्यासोबत शेअर करू शकता. पण मी तुमचे दुःखं जगली त्याचे काय? तुम्ही ऑफिसमधून आल्यावर घरी तुम्हाला कोणताच ताण नको म्हणून मी धडपडले आणि तुम्हाला बाहेरची मैत्री जास्त मोलाची वाटते. मी माझं वैयक्तिक आयुष्यच जगायची विसरून गेली.

मला काय आवडत होतं हेच मी विसरून गेली. हां, मला जुन्या काळातल्या बायकांसारखं उष्ट खरकटं काढण्याच्या चौकटीत नका बसवू. कोणी तरी आपली स्तुती करावी म्हणून मला हे करायचं नव्हतं, पण मी हे सर्व कोणासाठी केलं तर तुमच्यासाठी. शेवटी काय तर माझी ओंजळ रितीच राहिली. पण आता नाही. मी माझं आयुष्य जगणार कोणीचीही पर्वा न करता. हातातून सुटून गेलेले क्षण परत तर येणार नाही पण त्यांचा अनुभव नक्की घेणार?’

एवढे सगळे एका दमात बोलून वीणा रूमच्या बाहेर निघुन गेली, ‘मोकळा श्वास’ घ्यायला. सुधीर मात्र ती गेल्यावाटेकडे एकटक बघत बसला.

- वैशाली झोपे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.