पानगळ - मराठी कविता

पानगळ, मराठी कविता - [Paangal, Marathi Kavita] निपचित उघडे लाकडी डोळे पापण्यांशी, नि हाडांना पडतोय पिळ.
पानगळ - मराठी कविता | Paangal - Marathi Kavita

निपचित उघडे लाकडी डोळे पापण्यांशी, नि हाडांना पडतोय पिळ


ती गोड हासायची दिसायलाही देखणी; आता शुन्यात बघत सैरभर होत चाचपडत असते अंगात साल, लगीन ठरलं होतं पसंतीच्या मुलाशी पण एक वादळ आलं तिला ओरबाडुन निघुन गेलं; कागदी होडी सारखं हबकत - दबकत पाण्याला चिटकुन आहे कशीबशी न केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेचं ओझं वागवत.

निपचित उघडे लाकडी डोळे पापण्यांशी
नि हाडांना पडतोय पिळ
धुळ उडवित आले असुरी घोडे
ग्रहणच झाला जणु गालीचा तिळ

हसण्याची झाली लुट, कायेला ओरखडे
अन् गात्रास मिळाले लांछन
पंख तुटले वैरीन त्या वेळेला
अंग चोरटे, रडणारे मुके पैंजन

मायबापाची नवरी त्यांची लेकुरवाळी आशा
मी उध्वस्थ बनाची राणी
मी रुसणारी साजणी तो साजण
ताई सांगते, लोकांनी विकलाय धनी

शोकाचा डोह नि अवेळी पानगळ
कशी सिद्ध होऊ जन्मठेप भोगाया
देवळातले देव उडाले, उरले
निष्प्राण शिल्प उघडे, कुणा बघाया?

- अमोल वाघमारे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.