दुधीवरे रॅपलिंग - प्रवास वर्णन

दुधीवरे रॅपलिंग, प्रवास वर्णन - [Dudhiware Rapling, Pravas Varnan] सकाळी आमचे डोळे उघडले ते हिरवागार गालीच्या पांघरलेल्या निसर्गाच्या कुशीतच.
दुधीवरे रॅपलिंग - प्रवास वर्णन | Dudhiware Rapling - Pravas Varnan

सकाळी आमचे डोळे उघडले ते हिरवागार गालीच्या पांघरलेल्या निसर्गाच्या कुशीतच

१४ सप्टेंबर चा रविवार उजाडला आणि साहस अ‍ॅडव्हेंचर ग्रुप नवीन ३० चेहर्‍यांना एका नव्या आणि धाडसी विश्वाची ओळख करून देण्यास सज्ज झाला. या वेळेस ‘दुधीवरे’ येथे ‘वॅाटरफॅाल रॅपलिंग’ करायचे ठरले. याचे विशेष म्हणजे उंची जवळपास १५० फुट.

वेळापत्रकाप्रमाणे आम्ही बारामतीकरांनी शनिवारी रात्रीच १२:३० वाजता प्रवास सुरु केला. पुण्याला जाताना रात्री २:०० वाजता सासवड ला पिलेल्या मसालेदार चहा ची चव अजूनही मला आठवतेय. हडपसर आणि स्वारगेट वरून काही सदस्यांना सोबत घेतल्यानंतर आम्ही दुधीवरेच्या दिशेने प्रवास सुरु केला.

रात्रभर प्रवास करून साधारण ६.०० वाजता आम्ही दुधीवरेला पोचलो. सकाळी आमचे डोळे उघडले ते हिरवागार गालीच्या पांघरलेल्या निसर्गाच्या कुशीतच. सर्वांनी लगेचच फ्रेश होवून शेजारील हॉटेल मध्ये मिळणाऱ्या गरम गरम कांद्यापोह्यावर मस्त ताव मारला. तासाभरात सगळे आटपून आम्ही ७:०० वाजता धबधब्याच्या दिशेने निघालो.

सकाळची वेळ होती, हिरवागार निसर्ग होता, आजूबाजूला उथळ पाण्याचे झरे वाहत होते तसेच झाडांवर वेगवेगळे पक्षी दिसत होते. हे सर्व टिपून घेण्यासाठी आम्हा सर्वांचेच कॅमेरे सज्ज झाले होते.

खेळीमेळीच्या वातावरणात मनसोक्त फोटो काढत आम्ही सर्वजण ८:०० वाजता धबधब्याच्या ठिकाणी पोचलो. वॅाटरफॅाल रॅपलिंग करण्यासाठी लागणारा सर्व सेटअप होईपर्यंत आम्ही सर्वांनी धबधब्याखाली भरपूर मस्ती - मजा आणि आरडा-ओरडा करत धिंगाणा घातला.

वॅाटरफॅाल रॅपलिंग सुरक्षितरीत्या करण्यासाठी महत्वाच्या सर्व सुचना सर्व सदस्यांना देण्यात आल्या तसेच harness, carabiner, descender, hand gloves, helmate या आणि इतर सर्व साहित्यांची माहिती सर्वांना देण्यात आली. १५० फुट धबधब्यामधून खाली उतरायचे म्हटल्यावर जराशी भीती ही वाटतच होती. मी अनुभवलेला आनंद आणि भीती दोन्हीही एकत्र वाटणारा हाच तो क्षण. पण अनुभव आणि सांगितलेल्या सर्व सुचनांचे पालन केल्याने माझे हे वॅाटरफॅाल रॅपलिंग सुद्धा अविस्मरणीय आणि सुरक्षित झाले.

वॅाटरफॅाल रॅपलिंग करण्याआधी विचारांचे थैमान घालणारे डोके रॅपलिंग करताना एकदम निर्विकार होते. मला वाटते हाच होता तो खरा आनंदाचा परमोच्च क्षण ज्या साठी आम्ही हा सारा खटाटोप केला होता.

साधारण ५ वाजता आम्ही रॅपलिंग करून खाली येताना एक साहसी उपक्रम यशस्वी रीत्या पार पाडल्याचा अभिमान सर्वांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता आणि हेच साहस ग्रुपचे खरे यश आहे.

जीवनातील अनेक आगळ्यावेगळ्या अनुभवांपैकी हा एक होता. रॅपलिंग हा प्रकारच माझ्यासाठी नवीन होता. पण अचुक आणि योग्य नियोजनामुळेच या उपक्रमाचा आनंद मिळवता आला.

राहुल सर, सागर सर, सचिन सर, अजित सर आणि फैयाज सर यांनी सर्वांनाच दिलेले प्रोत्साहन आणि त्यांचे उत्तम व्यवस्थापन कौशल्य तसेच हा उपक्रम यशस्वी आणि सुरक्षितरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार मानतो.

- प्रतिक बळी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.