आठवतात का तुला, आपले लहानपणाचे खेळ, दुपारनंतर संध्याकाळची, बावरलेली सांजवेळ
आठवतात का तुलाआपले लहानपणाचे खेळ
दुपारनंतर संध्याकाळची
बावरलेली सांजवेळ
शाळेच्या शेवटच्या तासाला
मनात असायची घरची ओढ
बापडं घरच्या अंगणात आणि
त्याला सवंगड्यांची जोड
शाळेतून घरी पोचायचो
कसेबसे धावतपळत
आजच्यासारख्या तेव्हा
रिक्षा कुठे होत्या मिळत?
मधल्या सुट्टीतली उरलेली
खिशात दोनचार चणे बोरं
खेळताना नेमकी टपलेली
त्याच्यावर आजूबाजूची पोरं
पडलो लागलं म्हंटल्यावर
त्यावर लावायची माती
डेटॉल, सॅव्हलॉन वापरायची
कुणाचीच नव्हती छाती
खेळून घरी आल्यावर
संध्याकाळचा परवचा
सुटका नव्हती म्हटल्याशिवाय
भरवसा नव्हता जेवणाचा
रात्री मात्र बिछान्यावर
आजीच्या मऊमऊ गोष्टी
मग हळूच जायचं झोपी
होती दृष्टीआड सृष्टी
सगळं विरून गेलं आता
खिशात पैसे पुष्कळ आहेत
वाहवाह होते तोंडदेखल्या
संबंध मात्र फुटकळ आहेत