आज अचानक शाळेतला भेटला जुना फळा, भंगारवाल्याच्या कोपर्यातही उठून दिसला काळा
आज अचानक शाळेतला भेटला जुना फळाभंगारवाल्याच्या कोपर्यातही उठून दिसला काळा
मला पाहताच चेहर्यावर त्याच्या अष्टभाव दाटले
कुणास ठाऊक किती वर्षांनी जुने सवंगडी भेटले
म्हणाला पहिलीपासून दहावीपर्यंत धरलात माझा हात
खरं सांगा इमानदारीत सोडली का मी साथ?
कितीक शिकलात माझ्यासोबत विषय असे झोकात
माझ्याकडे यायला मात्र भीती तुमच्या डोक्यात
ओबडधोबड दिसत होतो रंग माझा काळा
तुमच्या अज्ञानाचा काही अंशी केला चोळामोळा
शाळा संपली ऐटीत गेलात महाविद्यालयात
फार लांब नाही, माझ्या भावाच्याच घरात
पदवी घेऊन पुढे गेलात मोठ्या कार्यालयात
तिथेही साथ बा ची माझ्या तुमच्या पसार्यात
खडूपासून मार्करपर्यंत तुमचा खडतर प्रवास
काळिमा मिरवत आणलं तुम्हाला नावारूपास
एवढं करून मला मात्र भंगारवाल्याचं दार
जागा ठेवा मनाच्या कोपर्यात, अपेक्षा नाही फार