एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग ६ - मराठी प्रेम कथा

एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग ६, मराठी प्रेम कथा - [Ektarphi Premachi Karanmimansa Part 6, Marathi Prem Katha] मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज त

मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणाऱ्या एका अपूर्ण प्रेमकथेचा सहावा आणि अखेरचा भाग

अमित तडक आपल्या मित्रांकडे जातो व त्यांना मोहित गोडबोलेचा पत्ता विचारतो त्यातील एकटा मित्र अमितला त्याचा पत्ता देतो. पण अचानक आज तुला त्याचा पत्ता कशाला पाहिजे. यावर अमित त्याला सगळा प्रकार सांगतो. कि तो त्यांच्या वहिनीच्या मागे लागला आहे व तिला त्रास देत आहे; आज त्याला धडा शिकवायचा आहे. अमित आपल्या दोन तीन मित्रांसोबत मोहितच्या घरी जायला निघतो.

मोहितच्या घरी पोहोचतो पण त्याच्या घराला कुलूप असते. शिऽऽऽट! अमित रागाच्या भरात म्हणतो. तेवढ्यात एक लहान मुलगा बाहेर येतो; अमितचा एक मित्र त्या मुलाला “मोहित कुठं आहे?” हे विचारतो. “तो काय मोहितदादा समोरच्या कॅफेत बसला आहे”. मोहित आपल्या मित्रांसोबत एका कॅफेत बसला असतो. अमित त्या कॅफेच्या दिशेने निघतो. यावेळी ५ वर्षांनंतर अमित आणि मोहित एकमेकांच्या समोर येणार असतात. मोहित आपल्या मित्रांना वैष्णवीबद्दल सांगत असतो. कि मी एका मुलीला प्रपोज केलो आहे. वैष्णवी ती दिसायला खूप मादक आहे. हे बोल अमितच्या कानावर पडतात. त्या बोलण्यावरून अमित मोहितला ओळखतो. तसा अमितला खूप राग येतो. तो तडक मोहितच्या जवळ जाऊन त्याची कॉलर धरतो. “तूच काय मोहित गोडबोले; साल्या तुझी हिम्मत कशी झाली माझ्या वैष्णवीबद्दल असं बोलायची?”. अचानक झालेल्या या घटनेमुळे कॅफेतील इतर तरूण तरूणी त्यांच्याकडे पाहू लागतात. यावर मोहित त्याला म्हणतो कि “ए अक्षय कुमार हिरो बनायला आलास का इथे”, कॉलर सोड म्हणून त्याचे दोन्ही हात झिडकारून टाकतो. दोघेही एकमेकांकडे खुन्नसने पाहू लागतात आणि “तुझी वैष्णवी म्हणजे काय रे तुझी बायको आहे का ती?”. मोहित अमितच्या खांद्यावर हात ठेवून पुढील वाक्ये म्हणतो. “शिज् ओन्ली माय लव्ह, तिच्यासोबत मी लव्हमॅरेज करणार आहे. आता तू समोर आला आहेस म्हणून सांगतोय कि ही काय स्कूलमधील फूटबॉल मॅच नाही; कि इथे जिंकणे हारणे महत्त्वाचे नाही. हा माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे आणि इथेही मीच जिंकणार”.

त्याच हे बोलणं एकूण अमितचा संयम हळूहळू सुटू लागतो. “ती मॅच जिंकल्यावर कसं मी ट्रॉफीला तुझ्यासमोर किस केला होता. तसंच काहीसं इथं होणार आहे; तुझ्यासमोर मी वैष्णवीला किस करून घेऊन जाईन”. मोहितच्या या बोलण्यावर मोहितचे मित्र अमितकडे बघून हसू लागतात पण अमितचा मात्र संयम पूर्ण सुटतो व तो मोहितला एक जोरदार ठोसा लगावतो. मोहित कोलमडून खाली पडतो आणि परत उठून तो अमितला एक ठोसा लगावतो. या प्रकारानंतर दोघांचे मित्र आपापसात भिडतात व कॅफेत एकच गोंधळ उडतो. त्यांच्या हाणामारीत कॅफेचे खूप नुकसान होते. कॅफेतले कर्मचारी त्यांची भांडणे सोडावायला मध्ये पडतात पण त्यांची संख्या जास्त असते. म्हणून लवकर कोणीही मागे हटत नाही. अचानक झालेल्या या दंग्यामुळे कॅफेचा मालक गोंधळून जातो व आपल्या कॅफेचे झालेले नुकसान पाहून तो पोलिसांना फोन करतो. काही वेळातच तिथे पोलिस दाखल होतात. पोलिसांना पाहून अमित व मोहितचे मित्र तिथून पळ काढू पाहतात. पण मोहित आणि अमित मात्र एकमेकांची कॉलर धरून उभे असतात. पोलिस त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे करतात व कॅफेचे झालेले नुकसान पाहून आणि कॅफेच्या मालकाच्या तक्रारीवरुन पोलिस त्या दोघांना अटक करतात.

पोलिस त्या दोघांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन येतात तेथील इन्स्पेक्टर त्या दोघांना खडेबोल सुनावतात व त्या दोघांकडे त्यांच्या आईवडीलांचे कॉन्टॅक्ट नंबर मागतात आणि दोघांच्याही घरी फोन करून या घटनेची कल्पना देतात. प्रथम अमितचे आईवडील पोलिस स्टेशन मध्ये येतात. पोलिस त्यांना या हानामारीच्या घटनेची कल्पना देतात. अमितचे वडील एक प्रतिष्ठित व्यक्ती असतात पोलिस अमितला त्याच्या वडिलांच्या समोर ताकीद देऊन सोडून देतात. नंतर मोहितचे वडील पोलिस स्टेशन मध्ये येतात. आपल्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे हे कळल्यावर त्यांना थोडा धक्का बसलेला असतो ते पोलिसांना म्हणतात कि “नमस्कार साहेब मी आत्माराम गोडबोले; मोहित गोडबोले माझाचं मुलगा. त्यांचे बोलणे ऐकून पोलिस इन्स्पेक्टर “घेऊन या रे त्याला” असे म्हणतात. एक हावालदार मोहितला घेऊन येतो. पोलिस इन्स्पेक्टर मोहितला त्याच्या वडिलांसमोर मोठ्या आवाजात ताकीद देऊ लागतात. मोहितचे वडील पेशाने एक पुरोहित असतात व स्वभावाने देखील ते खूप हळवे असतात. आपल्या मुलाला आपल्या समोर अशा पध्दतीने कोणी पोलिस ऑफीसर बोलत आहे. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटते. नंतर दोघेही आपल्या घरी येतात. आपल्या मुलाचा हा प्रताप पाहून त्यांना खूप वाईट वाटते. त्यांच्या परीवारातील कोणीतरी पहिल्यांदाच असे पोलिस स्टेशन मध्ये गेलेले असते. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागलेली असते. मोहित त्यांना काही सांगणार इतक्यात ते तिथून निघून जातात. त्या दिवसापासून ते मोहितशी बोलणे सोडून देतात.

इकडे अमितच्या घरी पण हाच विषय सुरू असतो कि तो असा गावगुंड का बनला? जेलमध्ये का गेला? काय झालं अस? त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतात. शेवटी अमित घरच्यांना सरळ सांगून टाकतो की माझं वैष्णवीवर प्रेम आहे व तिचं ही माझ्यावर प्रेम आहे. आम्ही दोघे लग्न करणार आहोत पण माझा बालपणीचा मित्रही तिच्यावर प्रेम करतोय पण तिचे फक्त माझ्यावर प्रेम आहे. आई बाबा तुम्ही तिच्या घरच्यांशी बोलणी करून घ्या. अमित हे सगळं एका पटक्यात बोलून टाकतो की त्यावर अमितचे आई-वडील एकमेकांकडे पाहू लागतात. तू थोडावेळ तुझ्या खोलीत जा अमित अमितची आई त्याला म्हणते. तसा अमित आपल्या खोलीत जातो. अमित जे काही आता बोलला होता त्यावर त्याचे आई-वडील एकमेकांशी खूप वेळ चर्चा करतात व त्यानंतर ते अमितशी बोलतात कि अमित आम्हाला तुझं म्हणणे पटलं आहे पण अजून तुम्ही दोघं किशोरवयीन आहात कॉलेजमध्ये शिकत आहात. अजून तुला स्थिरस्थावर व्हायचे आहे आणि राहता राहिला प्रश्न वैष्णवीचा तर तिची देखील काही स्वप्नं असतील. यावर अमित म्हणतो कि आमच्या दोघांच्यात या गोष्टीवरून बोलणं झालं आहे फक्त तुम्ही तिच्या घरच्यांशी थोडं बोलून घ्या. आपल्या मुलाची इतकी तयारी पाहून त्याचे आई-वडीलही आता तयार होतात. अमितचे वडील म्हणतात की आपला मुलगा दिसायला देखणा आहे स्मार्ट आहे. इतके चांगले स्थळ शोधून ही कोणाला मिळणार नाही. आपण वैष्णवीच्या कुटुंबियांसोबत बोलून घेऊयात. आपल्या वडिलांचे असे सकारात्मक बोलणे ऐकून अमितला खूप आनंद होतो. तो दुसऱ्या दिवशी वैष्णवीला फोन करतो. “हॅलो डियर कुठे आहेस तू पिल्लू” अमित वैष्णवीला म्हणतो. वैष्णवी “घरी आहे; तू तीन दिवसांनी आज कॉल केला आहेस मला”. “जा तुझ्याशी बोलायचं नाही मला”. “अरे असं नको करू प्लीज; मला बरचं काही सांगायचं आहे तुला, एक गुड न्यूज द्यायची आहे”. वैष्णवी म्हणते कोणती गुड न्यूज? आंऽऽऽ असं नाही; भेटून सांगणार तीन दिवस झाले मी भेटलो नाही माझ्या angel ला”. “तू ठिक अकरा वाजता ब्लू गार्डन मध्ये ये”. वैष्णवी त्याला हासत ओके असे म्हणते.

इकडे मोहित आपल्या मित्रांना भेटतो “काय झालं मोहित तू असा उदास का आहेस?” जय नावाचा मित्र मोहितला विचारतो. यावर मोहित त्याच्या मित्रांना घडलेला सगळा प्रकार सांगतो; नंतर खूप भावनिक होऊन मोहितच्या डोळ्यांत पाणी येते. तो म्हणतो की मला ती वैष्णवी हवी आहे रे माझं खूप मनापासून प्रेम आहे तिच्यावर प्लीज मला मदत करा तो त्याच्या मित्रांना हात जोडून विनंती करतो. आपल्या मित्राला असे हातबल झालेला पाहून त्याच्या मित्रांना वाईट वाटते. थोडावेळ विचार करून जय मोहितला म्हणतो की तू तिला पुन्हा एकदा भेटून ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगत. यावर मोहित त्याला म्हणतो की अरे पण आता मला ती कशी भेटेल मी याअधीही तिला एकदा भेटलो होतो. पण. यावर जय त्याला म्हणतो की तू तिचे अपहरण कर यावर मोहित थोडावेळ शांत राहतो. नाही खरचं तू तिचे अपहरण कर तू तिच्याशी काही वाईट तरी वागणार नाही आहेस फक्त एकांतात तिला तुझ्या मनातील गोष्ट एकदा समजावून सांग; पूर्ण भावनिक होऊन तिला मनापासून तुझं प्लानिंग सांग बघ तिला नक्कीच समजेल.

थोडे धीराचे बोल ऐकून मोहितला हायसं वाटतं. काही तरी खटपट करून मोहित वैष्णवीचा मागं काढतो. वैष्णवी छान आवरून अमितला भेटायला जात असते. ती रस्त्यावरून जात असते इतक्यात तिच्यासमोर एक पांढऱ्या रंगाची व्हॅन येते. त्या व्हॅनमध्ये मोहित आपल्या एकदोन मित्रांसोबत बसलेला असतो तो क्षणार्धात वैष्णवीला आपल्या गाडीत ओढून घेतो आणि तिला शहरबाहेरील एका ठिकाणी घेऊन जातो. इकडे अमित वैष्णवीची वाट पाहत असतो. मोहित वैष्णवीला एका निर्मणूष्य ठिकाणी घेऊन येतो. तो तिला एका खुर्चीवर बांधून ठेवतो. थोडा वेळ दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. नंतर मोहित वैष्णवीला सांगतो की “तू का असे माझ्याशी वागत आहेस? मी तुझ्यावर प्रेम करायला कुठे कमी पडलो”. “मी तुला किती इमोशनल होऊन प्रपोज केले होतो”. “तू प्लीज मला समजून घे मी खरचं खूप प्रेम करतोय तुझ्यावर आपण खूप खूश राहू मला तुला राणीसारखं ठेवायचं आहे आणि फक्त याच जन्मी नाही तर पुढील सात जन्म तू मला माझी लाईफ पार्टनर म्हणून हवी आहेस आणि नक्कीच मी त्या अमितपेक्षा तुला खूप खूश आणि सुखी ठेवेन”. बोलत बोलत तो त्याच्याजवळ असणारी आयटी इंजिनियर ची डिग्री बाहेर काढतो. हे बघ मी एक प्रोफेशनल आयटी इंजिनियर आहे. ह्या डिग्रीच्या जोरावर मला कुठेही भरगच्च पगाराची नोकरी मिळेल. सो तू प्लीज माझा विचार कर ती काहीतरी बोलत असते. पण तिच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते. मोहित लगेच ती पट्टी बाजूला करतो. वैष्णवी त्याला म्हणते की अरे बाबा तुला समजत कसं नाही माझं फक्त अमितवर प्रेम आहे आणि मी एकावेळी दोघांचा विचार नाही करू शकत आणि मी अमितला धोकाही नाही देऊ शकत. मी फार तर तुझा एक मित्र म्हणून स्विकार करू शकते; पण लाईफ पार्टनर म्हणून मी केवळ अमितलाच पाहिले आहे आणि मला अमितच खूप आवडतो. तू मला नाही आवडत तू माझ्या मागे लागू नको. मला अमित आवडतो, तू मला आवडत नाहीस व तू माझ्या मागे लागू नको. नको, नाही हे शब्द ऐकून मोहितला खूप राग येतो.

तो रागाच्या भरात तिला म्हणतो की मी का नाही आवडत तुला. काय कमी आहे माझ्यात मी त्या अमितपेक्षा तुला खूप खूश ठेवेन; मी त्याच्यापेक्षा उच्चपदस्थ आहे. तरीही वैष्णवी आपली मान नकारार्थी पद्धतीने हालवत असते. हे पाहून तर मोहितला आणखी राग येतो. पण तो रागावर नियंत्रण ठेवत तो वैष्णवीला म्हणतो की मी तुझ्यावर हात नाही उगारू शकत आणि मला तुझा गैरफायदा ही नाही घ्यायचा. तो आणखी भावनिक होऊन तिला म्हणतो. की मला लहानपणापासून केवळ त्रास आणि अन्यायच मिळाला आहे. माझी आई मी सहा वर्षांचा असतानाच निघून गेली. आणि आता बाबांनी देखील माझ्याशी बोलणं सोडलं आहे. निदान तू तरी मला समजून घे हे बोलत असताना मोहितच्या डोळ्यांतून अश्रू येतात. पण वैष्णवीवर त्याच्या या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. पण त्या वेळेत इथून निसटण्याची कल्पना तिच्या डोक्यात येते. ती मोहितला म्हणते की बरं I can understand मोहित तू मला विचार करायला एक दहा मिनिटे वेळ दे वैष्णवीच्या तोंडून हे बोल ऐकून मोहितला थोडे हायसे वाटते. तो आपले डोळे पुसत वैष्णवीचे हात मोकळे करतो. आणि तिला दहा मिनिटे विचार करायला वेळ देतो. आनंदात मोहित बाहेर थांबलेल्या दोन मित्रांना ही बातमी सांगतो की तुमची होणारी वहिणी मला आता लवकरच होकार देणार आहे. तुम्ही काहीतरी तिला खायला घेऊन या असे सांगून त्या दोघांना पाठवून देतो. इकडे अमित वैष्णवीची वाट पाहून अगदी वैतागून जातो. तो वैष्णवीला बऱ्याचवेळा कॉल करत असतो. पण नेटवर्क प्रॉब्लेममुळे वैष्णवीला कॉल लागत नाही. शेवटी तो वैष्णवीच्या घरी जातो. घरी जाऊन सौरभला विचारतो कि “वैष्णवी कुठे आहे ताई? तर सकाळी लवकर बाहेर गेली आहे का काय झाल?” सौरभ त्याला विचारतो. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन वैष्णवी अमितला मेसेज पाठविते कि मला त्या मोहितने किडनॅप केले आहे.

अमित सौरभला काही सांगणार इतक्यात त्याला वैष्णवीचा मेसेज मिळतो. वैष्णवीचा हा मेसेज अमितला लगेच मिळतो. त्याला या गोष्टीचा राग येतो. तो तिला काय कुठे तुला किडनॅप केले आहे. हे तिला विचारतो. वैष्णवी लगेच अमितला त्या ठिकाणाचे लोकेशन पाठविते तसा अमित लगेच आपल्या बाईकवरून पोलिस स्टेशनला जातो. अमित पोलिसांना भेटून घडलेला सगळा प्रकार सांगतो. पोलिसही तातडीने अमितसोबत त्या ठिकाणी जायला निघतात. इकडे अमितचे आईवडील वैष्णवीच्या घरी अमितच्या लग्नाची बोलणी करायला येतात. काही वेळातच पोलिस त्या लोकेशनवर पोहोचतात. मोहितचे मित्र त्या दोघांसाठी खायला घेऊन जात असतात. अमित त्या दोघांना लगेच ओळखतो व पोलिसांना सांगतो की ही दोघं मोहितचे मित्र आहेत. पोलिस त्या दोघांना थांबवून त्यांची चौकशी करतात सुरूवातीला ते दोघे काहीच सांगत नाहीत पण पोलिसी खाक्या दाखवताच ते पोलिसांना सगळे सांगतात. पोलिस त्या दोघांना घेऊन त्याठिकाणी जातात. दहा मिनिटे विचार करून वैष्णवी मोहितसमोर उभी राहते. मोहित खूप उत्साहाने तिच्याकडे पाहत असतो. त्याला तिच्या तोंडून होकारार्थी उत्तर ऐकण्याची खूप इच्छा असते. मोहित काही बोलणार इतक्यात बाहेर दरवाज्यावर खटखट आवाज येतो मोहित आपले मित्र आले आहेत. या हेतूने दार उघडतो आणि समोर पोलिस आणि अमित या दोघांना पाहून त्याला मोठा धक्का बसतो.

पोलिस इन्स्पेक्टर मोहितला धक्का देऊन बाजूला करतो. अमितला पाहून वैष्णवीला खूप आनंद होतो. ती धावत जाऊन अमितला मिठी मारते व पोलिस मोहितला एक दोन कानाशिलात लगावतात व तेथून त्याला वा त्याच्या दोन मित्रांना पोलिस स्टेशनात घेऊन जातात झालेल्या घटनेचा मोहितला खूप म्हणजे खूप वाईट वाटते. तो स्वतःला व स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतो. पोलिस त्या तिघांना जेलमध्ये टाकतात. इकडे अमित वैष्णवीला तिच्या घरी घेऊन येतो अमितचे आई-वडील आणि वैष्णवीचे आई-वडील आधीच एकमेकांसोबत त्या दोघांविषयी बोलत असतात. तेव्हा तिथे नीलम आणि कविता या दोघी देखील आलेल्या असतात. वैष्णवीची अशी स्थिती पाहून तिची आई तिच्या जवळ जाते व तिला विचारते कि वैषू तू कुठे होतीस आणि तुझ्या चेहऱ्यावर हे डाग कसले. त्या अमितला देखील हेच विचारतात. वैष्णवीचे वडील अमितला म्हणतात कि अमित तुझे आई-वडील तुझ्या लग्नाचे प्रपोजल घेऊन आम्हाला भेटायला आले आहेत तुझं माझ्या मुलीवर प्रेम आहे का? त्यांचा हा प्रश्न ऐकून अमित त्याच्या आणि वैष्णवीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्यांचा उलगडा करू लागतो. तिथे त्याच्या सोबतीला नीलम आणि कविता देखील असतात. तो तिथे उपस्थित सर्वांना सुरूवातीपासून सगळ्या गोष्टी सांगू लागतो. कि त्या दोघांचे भेटणे, तो तिच्या प्रेमात पडणे, त्याच तिला प्रेमासाठी विचारणे. मग मोहितचे प्रकरण त्यांची भांडणे हानामारी आणि आत्ता वैष्णवीचे झालेलं अपहरण या सगळ्या गोष्टी तो तिथे उपस्थित सर्वांना सांगतो. दोघांच्याही आई-वडीलांना हे सर्व ऐकून आश्चर्य वाटते कि आपल्या मुलांच्या आयुष्यात हे सगळं काय घडत आहे. अमितचे वडील वैष्णवीच्या वडिलांकडे आपल्या मुलासाठी त्यांच्या मुलीचा हात मागतात. यावर वैष्णवीचे वडील म्हणतात की तुम्ही खूप मोठी गोष्ट करत आहात. आम्ही एक सर्वसामान्य लोक आहोत तुम्ही खूप श्रीमंत आहात आपली बरोबरी कशी होईल?

यावार अमितची आई त्यांना म्हणते की भाऊजी नात्यामध्ये बरोबरी कधीच महत्त्वाची नसते. तर त्या जागी विश्वास व आपलेपणा हा महत्वाचा असतो आणि तशीही तुमची लेक आम्हाला पसंद आहे. तिला आमच्या घरची सून करवून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. पण अजून या दोघांचे शिक्षण पूर्ण झालेलं नाही आणि अमित पुढे होऊन काय होणार आहे. आमच्या वैष्णवीला तर रेडिओ जॉकी (RJ) व्हायचं आहे. आणि लग्नानंतर हे दोघे राहतील कुठे? हे सगळे प्रश्न तर आहेतच वैष्णवीची आई अमित व अमितच्या आईवडीलांना विचारते. यावर अमितचे वडील सांगतात की मी अमितचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला दिल्लीला पाठविणार आहे. तिथे हा त्याच्या काकाजवळ राहिल आणि वैष्णवीला रेडिओ जॉकीसाठी देखील तिथे तिला आम्ही व्यवस्था करून देऊ.

वैष्णवीचे आई-वडील विचार करण्यासाठी अमितच्या परीवाराकडे दोन दिवसांचा वेळ मागून घेतात. इकडे मोहितच्या वडिलांना पोलिस स्टेशनहून फोन येतो. हॅलो आत्माराम गोडबोले? हां बोलतोय! मी पोलिस ठाण्यातून सब इन्स्पेक्टर जाधव बोलतोय आम्ही तुमच्या मुलाला एका मुलीच्या अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली आहे. तुम्ही ताबडतोब पोलिस ठाण्यात या. हे ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. थोड्या वेळानंतर ते एका वकीलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये येतात. मोहित त्याच पोलिस ठाण्यातील तुरूंगात बसलेला असतो. आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोहितला जामीन मिळतो. पोलिस आत्माराम गोडबोले यांना सांगतात की काका तुम्ही पेश्याने पुरोहित आहात; तुम्ही तुमच्या मुलाला काही संस्कार दिले नाहीत का? थोडे लक्ष द्या त्याच्याकडे. ते मोहित सोबत पोलिस स्टेशनमधून बाहेर पडत असतात तोच ते अचानक खाली जमिनीवर कोसळतात. मोहित अचानक आरडा-ओरडा करतो. तेथील काही पोलिस कर्मचारी त्यांना शासकीय रूग्णालयात नेतात.

दोन दिवसांनी वैष्णवीचे वडील आणि तिचे मामा, काका इत्यादी नातेवाईक अमितच्या घरी येतात. अमितची आई त्यांचा यथेच्च्य पाहूनचार करते. पुन्हा त्यांच्यात त्या दोघांच्या लग्नाचा विषय निघतो. सर्व सकारात्मक बोलणी झाल्यावर एक योग्य मुहूर्त पाहून त्या दोघांचा साखरपुडा निश्चित होतो. दोघेही खूप आनंदात असतात. सगळं त्यांच्या मनासारखं आणि चांगलं घडत असतं. ठरलेल्या दिवशी त्यांचा साखरपुडा होतो व ठिक तीन महिन्यांनी २ मे २०२० वैषाख शु. ९ नक्षत्र मघा या दिवशी वैष्णवी व अमित यांचा शुभ प्रेमविवाह (Love with arrange marriage) ठरते. इकडे स्थानिक पेपरमध्ये मोहितने जे कांड केलेले असते त्याची बातमी प्रसिद्ध झालेली असते. ह्या बातमीमुळे आत्माराम गोडबोले यांची समाजात खूप नाच्चकी होते. त्यांना कोणी पौरोहित्य किंवा आणखी कोणत्याही शुभकार्याला बोलवले जात नाही. त्यांचे सहकारी ही त्यांची साथ सोडून देतात. सतत समाजात त्यांना अपमान सहन करावा लागत असतो. हे सर्व पाहून त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात. आपल्या पोरग्याने हे काय केले. हे त्यांना सहन होत नाही व रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना ह्रद्यविकाराचा झटका येतो व त्यात त्यांची प्राणज्योत मालवते. ही बातमी मोहितला समजताच तो खूप मोठ्याने आक्रोश करतो. त्याचे वडील त्याला सोडून गेलेले असतात. त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतो. वडिलांचा दहनविधी करायला देखील त्याला कोणी मदत करत नाही. त्याला वैष्णवीचा खूप राग येतो. तो मनात ठाम निश्चय करतो की ह्या मुलगीमुळे माझ आयुष्य उध्वस्त झालं मी हिला सोडणार नाही. ही माझी झाली नाही. तर कोणाचीच होणार नाही.

ही बदला घेण्याची भावना त्याच्या मनात येते. इकडे अमित व वैष्णवी यांचे प्रेम फुलत असते दोघेही लग्नानंतरचे आपले सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवू लागतात. मोबाईलवर बोलणे चॅटिंग करणे कधी, कधी भेटणे. रोमॅन्टिक गोष्टी बोलणे इत्यादी प्रकार सुरू असतात. या सर्व गोष्टींमध्ये तीन महिन्यांचा कालावधी निघून जातो. हळूहळू त्या दोघांच्या लग्नाची तारीख जवळ येते. दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू असते हळदी समारंभ, संगीत मुहुर्तमेढ, एकमेकांच्या घरी नातेवाईकांचे येणे जाणे ईत्यादी घटना सुरू होऊ लागतात. नीलम व कविता या स्वतः आगत्याने वैष्णवी व अमितच्या लग्नाची तयारी करत असतात. ३० एप्रिल २०२० च्या सकाळी म्हणजे वैष्णवीच्या लग्नाच्या दोन दिवस आधी तिला एका स्थानिक रेडिओ सेंटरमधून रेडिओ जॉकी च्या जॉबसाठी मुलाखत घेण्यासाठी कॉल येतो. “हॅलो! वैष्णवी बोलत आहात का?” फोनवरील लेडीज तिला विचारते. “येस हू इज धीस”, वैष्णवी त्यांना विचारते गुड मॉर्निंग मॅडम मी शिवानी ठाकूर बोलतेय “मुंबई मेरी जान, या लोकल रेडिओ सेंटरमधून तुम्ही रेडिओ जॉकी आर जे या जॉबसाठी अर्ज केला होतात ना?” वैष्णवी म्हणते “हो केला होता”. “तर मॅडम आज इंटरव्यूज आहेत मग तुम्ही ठिक अकरा वाजता ऑफिसवर याल का?”. ही न्यूज ऐकून वैष्णवी खूप खूश होते. ती म्हणते की हां मी ठिक अकरा वाजता आपल्या ऑफिसवर येते. असं बोलून फोन कट होतो.

वैष्णवी ही आनंदाची बातमी घरी सगळ्यांना सांगते. तिच्या घरी सगळे आनंदी होतात वैषू देवासमोर पेढे ठेव व आशीर्वाद घे वैष्णवीची आई वैष्णवीला म्हणते. तशी वैष्णवी देवासमोर पेढे ठेवून देवाचा आशीर्वाद घेते. आई बाबा मी निघते इंटरव्यू देऊन लगेच येते असे बोलून ती आपल्या खोलीत जाते. तिच्या मनात येते की आपण अमितला सोबत घेऊन जावं कारण नीलम आणि कविता या दोघी मेहंदी काढण्याच्या कार्यक्रमात व्यस्त असतात. वैष्णवी अमितला फोन करते. अमित अजून झोपलेला असतो. हॅलो हां बोल वैष्णवी अमित म्हणतो. वैष्णवी त्याला ही गूड न्यूज देते. अमितलाही खूप आनंद होतो. तो म्हणतो ग्रेट “Congratulations my wife” वैष्णवी म्हणते थँक्स बरं ऐक ना तु माझ्यासोबत येशील का? तिथे अमित यावर म्हणतो की वैषू... तू ये ना जाऊन अजून माझी आंघोळ व्हायची आहे. कालारात्रीची बॅचलर पार्टी खूप उशिरा संपली वाटलेस तर मी तुला पिकअप करायला येतो. यावर वैष्णवी म्हणते बर ठीक आहे. मी जाते तशीच तू मला न्यायला मात्र आठवणीने ये एवढे बोलून फोन कट होतो. वैष्णवी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करते. मुंबई मेरी जान हे रेडिओ सेंटर मुंबईच्या आंधेरी या इलाक्यात असते. ती मुंबईच्या लोकलमधून त्याठिकाणी जाते. एक दोन उमेदवारांच्या नंतर तिचा नंबर असतो. मुलाखत देण्यासाठी ती पारंपारिक साडी व तिला लग्नासाठी भरलेला चुडा आणि हाताला लावलेली मेहंदी या वेशभूषेत ती आलेली असते. मुलाखतीसाठी तिचा नंबर येतो. तशी ती केबीनमध्ये जाते. मुलाखत घेण्यासाठी एक तिच्याच वयाची एक यंग मुलगी आणि दोन प्रौढ पुरूष असतात. वैष्णवी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची सकारात्मक उत्तरे त्यांना देते. तिचा आत्मविश्वास आणि स्मार्टनेस मुलाखतकारांच्या पसंतीस उतरतो आणि जागेवर ते तिचे सिलेक्शन करतात.

तिची वेशभूषा पाहून ती मुलाखत घेणारी मुलगी वैष्णवीला विचारते की “तुमचं लग्न ठरल आहे का? वैष्णवी तिला हसून हो असं म्हणते येत्या दोन दिवसात माझ लग्न आहे. आरे वा! काँग्रेच्यूलेशन तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. हे तुमचं जॉयनिंग लेटर आहे”. ते जॉयनिंग लेटर पाहून वैष्णवीला खूप आनंद होतो. ती त्या तिघांचे आभारा मानून तिथून हास्यमुद्रेने बाहेर पडते. वैष्णवी आंधेरीच्या लोकल रेल्वे स्टेशनवर येते अमितला फोन करण्यासाठी आपला फोन बाहेर काढते. ती अमितला फोन लावून सांगणार असते कि आता मला लवकरच हवा तसा जॉब मिळनार आहे व आपले लग्नही होणार आहे सगळं कस आपल्या मनासारखे आणि चांगले घडणार आहे. तसा अचानक मोहित तिच्या मागे येऊन उभा राहतो. त्याची अवस्था खूप बेकार झालेली असते तो वैष्णवीच्या खांद्यावर दोनदा हात मारतो तशी ती मागे वळून पाहते. आणि क्षणार्धात मोहित वैष्णवीला जोरात ढकलून देतो बरोबर उजव्या बाजूने वेगात एक लोकल ट्रेन तिचा सायरन वाजवत येत असते. वैष्णवी बेसावध असल्याने ती रेल्वे रुळावर कोसळते.आणि भरवेगात येणारी लोकल ट्रेन वैष्णवीच्या अंगावरून जाते. अचानक घडलेल्या प्रकारामुळे स्टेशनवर एकच गडबड उडते एक महिला मोठ्याने किंचाळते त्या प्लॅटफॉमवरील दोन तीन माणसे मोहितला पकडण्यासाठी त्याच्याकडे धावतात. तसा मोहित स्वतःच्या हाताने स्वतःची मान मोडून घेतो. व खाली जमिनीवर एका विचित्र पध्दतीने कोसळतो. त्यात त्याचा मृत्यू होतो. या प्रकारानंतर स्टेशन मास्तर रेल्वे पोलिसांना तातडीने फोन करतो रेल्वे पोलिस लगेच घटनास्थळी पोहचतात.

वैष्णवीच्या देहाचे तुकडे तुकडे झालेले असतात पोलिसांना त्याठिकाणी वैष्णवीचा फोन सापडतो फोनसोबत त्यांना तिथे वैष्णवीची पर्स ही सापडते त्या पर्समध्ये तिचे आधार कार्ड त्यांना सापडते. पोलिस ऑफिसर तो फोन घेतात. त्यावर वैष्णवीने अमितला फोन केलेला असतो. पोलिस अमितच्या नंबरवर फोन लावतात. अमितचे वडील तो फोन घेतात. तेव्हा अमितला त्याचे मित्र हळद लावत असतात. हॅलो अमितचे वडील म्हणतात. हॅलो मी आंधेरी लोकल रेल्वे येथून पोलिस इन्स्पेक्टर देसाई बोलतोय. हां बोला. अमितचे वडील त्यांना म्हणतात. इथे आंधेरी रेल्वे स्टेशनवर आम्हाला एका तरूणीचे आधार कार्ड मिळाले आहे नाव वैष्णवी अशोक आहे. तिचा अपघाती मृत्यू झाला आहे. हे ऐकताच क्षणी अमितचे वडील अवसान गळून खुर्चीवर कोसळतात. अमित त्यांच्याकडे धावत जाऊन विचारतो बाबा काय झालं. ते हब्की खात अमितला म्हणतात. “आरे आंधेरी रेल्वे स्थानकमधून फोन आहे तिथे वैष्णवीचा अपघाती मृत्यू झाला आहे”. अशी बातमी फोनवर पोलिस सांगत आहेत. अमित लगेच फोन आपल्या हातात घेतो. हॅलो सर अमित बोलतोय काय झालं तो अगदी आगतिकतेने पोलिसांना विचारतो. पोलिस इन्स्पेक्टर अमितला म्हणतो की ही वैष्णवी तुमची कोण आहे? सर ती माझी होणारी बायको आहे. अमित त्यांना म्हणतो. तुम्ही तातडीने आंधेरी रेल्वे स्टेशनवर या इथे त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे.

अमितच्या हातून फोन खाली पडतो काहीवेळ वातावरण सुन्न पडते अमित आहे त्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटतो त्याच्या अंगाला हळद आहे तशीच लागलेली आसते. त्याच्यामागे त्याचे आई-वडील व मित्रही धावतात वैष्णवीच्या घरीही ही बातमी कळते. ही बातमी ऐकून तिच्या घरचे देखील घराबाहेर पडतात. एका गाडीतून त्या दोन्हीही परीवारातील सदस्य आंधेरी रेल्वे स्टेशनवर पोहचतात. पोलिस तेथील उपस्थित प्रवाशांकडून घटनेची माहिती घेत असतात. अमित पडत धडपडत अपघात झालेल्या ठिकाणी पोहचतो. पोलिसांनी ती जागा सिल केलेली असते. तिथे एकेठिकाणी वाकडी मान झालेला मोहित खाली पडलेला असतो पोलिसांनी त्याच्या मृतदेहाच्या बाजूने पांढऱ्या रंगाच्या खडूने रेषा मारलेली असते तर रेल्वे रूळावर वैष्णवीच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे पडलेले असतात वैष्णवीची आई वैषू... असे म्हणून मोठ्याने आक्रोश करते कविता व नीलम यांना देखील खूप मोठे रडू कोसळते. आपल्या होणाऱ्या बायकोची अशी हालत पाहून अमितची दातखिळी बसते व त्याला वेडाचा जबरदस्त मोठा झटका येतो आणि वेडाच्याभरात पोलिसांनी लावलेले सिल तोडून तो वैष्णवीच्या मृतदेहाकडे जातो आणि स्वतःचे डोके त्या रेल्वे रूळावर आपटू लागतो. पोलिस आणि अमितचे मित्र त्याला धरायला जातात. घटनास्थळीचे दृश्य फार भयंकर असते.

मोहित आत्महत्या करून घेतो. वैष्णवीचा अपघाती खून होतो तर अमितचं दोनच दिवसांनी ज्या मुलीशी माझं लग्न होणार होतं तिचा असा खून झाला ही गोष्ट सहन होत नाही व तो आयुष्यभरासाठी वेडा होऊन जातो. प्रेम नावाच्या अडीच अक्षरामुळे या तीन कॉलेज वयातील मुलांचे आयुष्य उध्वस्त होते.

शेवटी पडलेला एक प्रश्न?

Love is born in the heaven or the hell?
प्रेमाचा जन्म हा स्वर्गात होतो कि नरकात?

समाप्त!


इंद्रजित नाझरे | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.