मला हवा होता आनंद - मराठी कविता

मला हवा होता आनंद, मराठी कविता - [Mala Hava Hota Aanand, Marathi Kavita] एकदा खरेदीला निघालो, पण मला जे हवं होतं, ते कुठेच सापडेना.

एकदा खरेदीला निघालो, पण मला जे हवं होतं, ते कुठेच सापडेना

एकदा खरेदीला निघालो
पण
मला जे हवं होतं
ते कुठेच सापडेना

खूप दुकानं फिरलो
प्रत्येकाचं एकच उत्तर
स्टॉक संपलाय

मला हवा होता
आनंद
नाही मिळाला कुठेच
थोडासाही पुरला असता

एक दुकानदार म्हणाला
थोडं अंतरावर जा
देऊळ लागेल
पायरीवर एक
संन्यासी भेटेल
त्याच्याकडे आहे
तुम्हाला हवी असलेली गोष्ट

मग निघालो त्या रोखाने
गेलो देवळात
शोधून काढला संन्यासी
नि बसलो त्याच्या पायथ्याशी

निमग्न होता तो
निजानंदात
हात जोडले गेले
आपोआपच

म्हटलं,
महाराज, मलाही द्या ना
थोडासा आनंद
हसला फिदीफिदी

म्हणाला,
अरे, ते तुझ्याजवळच आहे
ते तुला पुन्हा कसं देऊ?
याच्यासाठी तुझी दुःख
कुठे गहाण ठेऊ?

बघ जरा डोकावून आत
नि सांभाळ स्वतःचा आत्मा
घरातच भेटेल तुला
निर्गुण परमात्मा


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.