नाही करता आलं तरी, करण्यासारखं बरंच आहे
नाही करता आलं तरीकरण्यासारखं बरंच आहे
तोडलेलं असलं तरी
जोडण्यासारखं बरंच आहे
प्रेम करा खुल्लम खुल्ला
बाळगु नका कसलीच भिस्त
आजी आजोबांच्याच काळात
शोभत होती त्यांची शिस्त
माणुसकीच्या बाजारात
घेण्यासारखं बरंच आहे
तोडलेलं असलं तरी
जोडण्यासारखं बरंच आहे
गोळा करून पुष्कळ धन
काय शेवटी फायदा होतो
चार खांदे एक तिरडी
इतकाच काय तो वायदा होतो
आलो एका थेंबातून
नि राखेमध्ये घरंच आहे
तोडलेलं असलं तरी
जोडण्यासारखं बरंच आहे
म्हणून म्हणतो जगता जगता
आयुष्याचं ठेवा भान
स्वतःबरोबर दुसऱ्याच्याही
अस्तित्वाचा राखा मान
व्यक्ती वल्ली लोप पावते
सगळं कीर्तीवरच आहे
तोडलेलं असलं तरी
जोडण्यासारखं बरंच आहे