एका हातात तुझा हात - मराठी कविता

एका हातात तुझा हात, मराठी कविता - [Eka Hatat Tujha Haat, Marathi Kavita] एक धुंद संध्याकाळ, मी बसलेला.

एक धुंद संध्याकाळ, मी बसलेला

एक धुंद संध्याकाळ
मी बसलेला
समुद्रकिनाऱ्यावर,
एका हातात तुझा हात
आणि दुसऱ्या हातात ग्लास

तू नको नको म्हणत असतांना
मी घेतलेले दोनचार घोट
आणि काही अंशी
माझ्याच कर्तृत्वानं
वाढलेलं तुझं पोट

अंगाला झोंबणारा
तोच गार वारा
प्रेमासाठी आसुसलेली तू
नि माझ्या अश्रुधारा

उबग आलाय आता सगळ्याचा
नि प्रकर्षानं जाणवायला लागलंय
मला अलीकडे
माझ्यातला षंढपणा

काहीच मिळवता आलं नाही
आजवर आयुष्यात
गमावून बसलो सगळंच
सरसकट
अगदी तुलाही

आता भान आल्यावर
जाणवू लागल्यात वेदना
पण इलाज नाही

असच चालत राहायचं
तू, मी, समुद्राने,
आणि वाऱ्यानेही


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.