गणित कुठं चुकतंय - मराठी कविता

गणित कुठं चुकतंय, मराठी कविता - [Ganit Kutha Chukatay, Marathi Kavita] गणित कुठं चुकतंय, खरंच काही कळत नाही.

गणित कुठं चुकतंय, खरंच काही कळत नाही

गणित कुठं चुकतंय
खरंच काही कळत नाही
अन्‌ सरतेशेवटी आयुष्याचा
हिशेब काही जुळत नाही

लहानपणी वाटायचं
मोठेपण बरं असतं
भाबड्या आयुष्यापेक्षा
खोटेपण शोभून दिसतं

वळचणीचं पाणी काही
आढ्याकडे वळत नाही
अन्‌ सरतेशेवटी आयुष्याचा
हिशेब काही जुळत नाही

लहानाचा मोठा झालो
असाच हिशेब करत करत
पानावर पान लिहीत,
एकेक वही भरत भरत

पण भरलेल्या वह्या आता
रद्दीवाला घेत नाही
अन सरतेशेवटी आयुष्याचा
हिशेब काही जुळत नाही

जगण्यासाठी खातो,
की खाण्यासाठी जगतो
हाच एक सवाल आता
माझ्या मनात सलतो

दिवेकर दीक्षित करून सुद्धा
पोट कमी होत नाही
अन्‌ सरतेशेवटी आयुष्याचा
हिशेब काही जुळत नाही


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

1 टिप्पणी

  1. खरंच खूप छान आहे
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.