आता वाटते पुन्हा नव्याने, धडे शिकावे बालपणीचे
आता वाटते पुन्हा नव्यानेधडे शिकावे बालपणीचे
अक्षर ओळख सुरुवातीला
क्षण वेचावे आठवणींचे
शाळा सुटता सैरावैरा
धावावे घरच्या ओढीने
अन् विहरावे मैदानावर
सवंगड्यांसह मग जोडीने
चला खेळुनी पाहू एकदा
भातुकलीचा खेळ जरासा
लुटुपुटूचा डाव मांडुनी
बघू कुणाचा पडतो फासा
सुट्टी लागता प्रशालेस मग
जाऊ मामाच्या गावा या
चिंचा, बोरे, करवंदांनी
झोळी अपुली भरुनी घ्याया
आठवणींच्या रम्य शलाका
थोड्या उरल्या, थोड्या सरल्या
स्मृतीपटलावर सागरलहरी
कितीक आल्या, निघून गेल्या