आज चप्पल दुरुस्त करुन घ्यायला या सातपुते काकांकडे गेले होते...
आज चप्पल दुरुस्त करुन घ्यायला या सातपुते काकांकडे गेले होते; बाजूलाच एक लहानसं झाड होतं. त्या झाडाला एक कॅरीबॅग अडकवलेली दिसली, जवळ जाऊन पाहिलं तर ती पीशवी पाण्याने भरलेली होती. तिच्या तळाशी एक बारीकसं छिद्र होतं आणि त्यातून थेंब-थेंब पाणी झाडाच्या मुळाशी जात होतं. काकांना विचारलं “काका ही कॅरीबॅग तुम्ही लावली आहे का?”. काका म्हणाले “हो, पानी जातंय ना त्या झाडाला. मी कोरडं पडूच देत न्हाई.” “छानच की! त्यामूळे तर तग धरुन आहे ते असल्या उन्हाळ्यात.” “व्हय आता आपल्याला इथं बसायचंय तर काळजी घेतली म्हणून बिघडलं कुटं.” ते काम करता करता बोलत होते.“आता यंदाला किती गरमी होती. कमी करायची आसल तर आपणच झाडं लावायला पायजेत. व्रिक्श (वृक्ष) नाय तर काय नाय.”
“हो ना. आज पर्यावरण दिन आहे काका. बरं वाटलं तुम्ही झाड दत्तक घेतलंय बघून. तुम्हीच लावलंय का हे?” “नाही; नगरपरिषदेनं लावलंय. मी आपलं घालतूय पानी. एका काटीनं जरा सपोर्ट पन दिला. काय म्हणतावं आज हाय का पर्यावरण दिन?” “हो‘, ५ जून ला असतो जागतिक पर्यावरण दिन.” “हा मंग त्यामुळंच मला व्हॉट्सअॅपवर झाडाचा विडीओ आलाय. दमा दाखवतो तुमास्नी.” असं म्हणून त्यांनी आपल्या जिओ फोनवर व्हिडिओ लावून दिला. “तुम से हे हवा, तुम से हे पाणी असं सांगितलंय त्यात. म्हणजे व्रिक्श आहेय तर स्वच्छ हवाय... पाणीये.” पर्यावरण संवर्धनाबद्दल एक छान व्हिडिओ होता तो; काका बोलत होते. “प्रत्येकाने एक तरी झाड लावयला पायजे; लावन्यापेक्षा पण ते जगवायला पायजे.” “खरंय काका!”
WhatsApp वर आज अनेकांनी पर्यावरण विषयक पोस्ट शेअर केल्या, स्टेटस ठेवले. पण `पर्यावरण दिन’ असा दिवस असतो हे माहित नसणारे हे काका मला खरे पर्यावरणप्रेमी वाटले. फार जागतिक गप्पांची गरज नसते.
आपण आपल्यापुरता `कृतीतून’ खारीचा वाटा उचलला की झाला पर्यावरण दिन साजरा...!