मिश्कील हास्ये किल्मिष झाली, जसा चालतो पुढल्या गावी
मिश्कील हास्ये किल्मिष झालीजसा चालतो पुढल्या गावी
तूर्त पुराणे चाळत बसतो
येशू नि अल्लाह तुझ्याच नावी
आडंबर मग माथी माझ्या
कुंपण रुतते तळपायात
धावत सुटतो करतो गोंधळ
शोध निराळा स्वर्णबनात
विचार करतो सांगून द्यावे
उघडो कप्पा गुप्तघडीचा
शब्दही त्यांसी अवघड पडती
मुखी बसविती अलगच साचा
वयात आलो रांगत धावत
पडला मागे शोध स्वतःचा
कारण नसता रडणे हसणे
बोबडबोली प्रेमळ भाषा
अर्थ मला हो उमगत नाही
जरीच साध्या सोप्या संज्ञा
करीत जा तू कविता वेड्या
हीच कदाचित प्रभूची आज्ञा