प्रेमात हरवलेल्या प्रियकराची कल्पना आणि प्रेमाचं माधुर्य रेखाटणारी प्रेम कविता
हर भेट तुझी उबदार । सतत रमणार तुझ्या प्रेमात ।हर सांज लाजणे फार । पक्षी स्वच्छंद पुन्हा क्षितिजात ।
हर शब्द तुझा हृदयात । नक्षी खडकात सुबक कोरतो ।
हर हास्य तुझे ऐकता स्वर्ग भूतलावरी साठतो ।
स्वप्नांच्या नौकेवरी । धुंद मन प्रेमाच्या सागरी ।
हर स्पर्श तुझा वल्हवी । नाव जीवनाच्या लहरीवरी ।
दाट लाट केसांत तुझ्या मी सूर दूर मारतो ।
हर हास्य तुझे ऐकता स्वर्ग भूतलावरी साठतो ।
हे रम्य चित्र रंगीत । कुंचला दोहोंच्या आशांचा ।
तू इंद्रधनू मी रंग श्वेत । देखावा शत रंगांचा ।
तू नभ लाली मी इंद्र अमर । वृष्टी जगण्यास्तव करतो ।
हर हास्य तुझे ऐकता स्वर्ग भूतलावरी साठतो ।
मी सोडिन अवघे विश्व घेऊनी साथ तुझ्या आत्म्याची ।
मी जगविन अवघे विश्व जोडुनी तार तुझ्या हृदयाशी ।
मी ममत्व माझे माझ्यापासून तुजलागी काढतो ।
हर हास्य तुझे ऐकता स्वर्ग भूतलावरी साठतो ।