शब्दांचा गजरा - मराठी कविता

शब्दांचा गजरा, मराठी कविता - [Shabdancha Gajara, Marathi Kavita] कोऱ्या कागदाच्या शुभ्र बागेत, शब्दांचा मी गोवून गजरा, मटकत नटकत हाक लावून, माफक भावात विकतो जरा.
शब्दांचा गजरा - मराठी कविता | Shabdancha Gajara - Marathi Kavita
कोऱ्या कागदाच्या शुभ्र बागेत, शब्दांचा मी गोवून गजरा
मटकत नटकत हाक लावून, माफक भावात विकतो जरा

घ्या जी घ्या हव्या त्या किमतीला, ताजे शब्द आणले वेचून
रंगीत आहेत, सुगंधी आहेत, राहतील नाहीतर असेच साचून

हा बघा बालपणाच्या फुलांचा, वास सुंदर आईच्या मायेचा
गोष्टीतल्या सुंदर परिसारखं, माळून हा गजरा मनसोक्त नाचा

शाळेच्या फुलांचा हा गजरा, नेऊन जेव्हा वास घ्याल
लाकडी बाक, शिकवणाऱ्या बाई, सगळं काही सोबत न्याल

बरं हा घ्या मित्रांच्या फुलांचा, सुगंध ह्याचा खूप वेळ टिकेल
एकदा तरी घेऊन बघा, हरेक चिंता आपोआप मिटेल

हा एक अस्सल गजरा, प्रेम नावाच्या दुर्मिळ फुलांचा
नशीबवानच हा माळू शकतो, नाही कच्चा धागा ह्याचा

खूप खूप फुले वेगवेगळे वास, कागदाच्या पुडीबाहेर घमघमणारे वास
ज्याला जो हवा तसा, आठवणींच्या क्लिपने माळा तसा

एकतरी गजरा घ्या कोणी, फक्त घेता वास लांबून
मी तरी कसा ठेऊ, हा घमघमाट स्वतःकडे डांबून

दिवसा अखेर कमाई शून्य, शब्दांना माझ्या किंमत नाही
मी असो की अजून कोणी, कोरेच शब्द आणि कोरिच वही
रोहित साठे | Rohit Sathe
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.