कालपुरूष - एक शोध एक रहस्य - भाग १

कालपुरूष - एक शोध एक रहस्य - भाग १ - [Kaalpurush - Ek Shodh Ek Rahasya - Part 1] जमीन, समुद्र आणि आता अंतराळात देखिल कचऱ्याच्या महासंकटाचा उलगडा करणारी रहस्य कथा.
कालपुरूष - एक शोध एक रहस्य - भाग १ - मराठी कथा | Kaalpurush - Ek Shodh Ek Rahasya - Part 1 - Marathi Katha

आता डिसेंबरमध्ये एवढा मोठा पाऊस ! कसं शक्य आहे ?

दिल्ली, डिसेंबर २०१७ - मध्यरात्र उलटून गेली होती. घड्याळाचे काटे पाठशिवनीचा खेळ खेळत होते. मला काही केल्या झोप लागत नव्हती. शेवटी मी हॉलमध्ये आलो. ‘जिजस’ समोर एक कँडल लावली व त्यांना माझ्या मनातील शंका विचारू लागलो. पण आज मला त्यांची मुद्रा काही वेगळेच सांगत होती; कि ‘आज मी फार थकलोय व मानवाची मदत करू शकत नाही.’ तिथून मी माझ्या लॅबमध्ये आलो व बाहेर अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. माझ्या मनातील प्रशांच्या यादीत आणखी एक प्रश्न निर्माण झाला कि आता डिसेंबरमध्ये एवढा मोठा पाऊस ! कसं शक्य आहे ?

या विचारातच मी कॉम्प्युटर सुरू केला व स्वतःलाच विचारू लागलो कि “मला पडणाऱ्या प्रश्नांची, शंकांची उत्तरे जरी अध्यात्माकडे नसली तरी विज्ञानाकडून मला ती अपेक्षित व समाधानकारकरित्या मिळतील. गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणांपासून माझा अस्वस्थपणा सुरू झाला होता. त्या ठिकाणांची छायाचित्रे मी कॉम्प्युटरवर पाहू लागलो. आम्हाला जागतिक हवामान संघटनेने एक प्रोजेक्ट दिला होता की समुद्राच्या तळाशी जो काही कचरा साचत आहे त्याचे वर्गीकरण करून इतंभूत माहिती पुढील संशोधनासाठी पाठवायची होती.

त्यानुसार आम्ही सर्वप्रथम दक्षिण चीन महासागराला भेट दिली. समुद्राच्या मध्यभागी एक तुकडी पाठवली व तिथून मिळणारी माहिती कॉम्प्युटरमध्ये संकलीत करुन घेतली. दोन दिवसानंतर आम्ही (पॅसिफिक महासागर) प्रशांत महासागरापाशी आलो. पण दक्षिण चीन महासागरापेक्षा हा महासागर कमी प्रदुषित आहे असे आम्हाला आढळले. नंतर आमची ‘व्हिजीट’ कॅलिफोर्नियातील एका म्युझियममध्ये होती. तिथे प्रख्यात चित्रकार ‘लिओनार्डो दा विंची’ त्यांनी रेखाटलेली दोन जगप्रसिद्ध पेंटिंग्ज ‘मोनालिसा’ व ‘येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांना उपदेश देत असलेले’ दोन्ही चित्रे आम्ही पाहत होतो. इतक्यात त्या म्युझियमचे संचालक व कर्मचारी तिथे आले. सोबत येताना ते दोन मोठ्या बॅगा घेऊन आले होते.

[next] आम्ही पाहत असलेली ती दोन्ही चित्रे भिंतीवरून काढायला सुरुवात केली. आम्ही विचारणा केली असता ही दोन चित्रे आता एथून लंडन विश्व विद्यालयात पाठवणार असल्याचे आम्हाला सांगितले. तसे राष्ट्रपतींच्या सहीचे ‘लेटर’ त्यांनी आम्हाला दाखविले. पण त्यावेळी मोनालिसाच्या गूढगंभीरतेमध्ये आणखी भर पडलेली होती त्याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

कॉम्प्युटरवरील छायाचित्रे बघण्यात मी इतका हरवून गेलो होतो की ‘वॉशिंग्टन, अमेरिकेहून ‘जॅक्सन’ या माझ्या शास्त्रज्ञ मित्राचे सात वेळा आलेले फोनदेखील मला माहित पडले नाहीत. आठव्यांदा रिंग वाजली आणि मी भानावर आलो. फोनमध्ये बघतो तर जॅक्सनने प्रत्येक तासाला मला रिंग केली होती. पहाटेचे सहा वाजून गेले होते. मी फोन उचलला.

“गुड मॉर्निंग, विल्यम्स!”

“मॉर्निंग जॅक्सन. रात्री एक वाजल्यापासून मी तूला फोन करत आहे यार. माझा अस्वस्थपणा वाढतच आहे. लवकरच मानवजातीला जे अपेक्षित नाही असे काहीतरी भयानक घडणार आहे याची जाणीव मला होत आहे.” विल्यम्सचा हा भावूक सुर ऐकून जॅक्सन त्याला म्हणतो, “यार, तू नेहमी असे कुठलेतरी मुद्दे शोधून काढतोस आणि अप्सेट होतोस. बरं ऐक आता, वॉशिंग्टनला ये. उद्या होणार्‍या जागतिक परिषदेत हा विषय डिस्कस करुया.”

एवढे बोलून फोन बंद होतो व विल्यम्स अ‍ॅंडरसन भिंतीवरील एका रहस्यमय पेंटींगकडे बघत म्हणतो की उद्या होणार्‍या ‘जागतिक हवामान परिषदेत’ सर्व देशांच्या राष्ट्रपतींसमोर हा विषय मांडायलाच हवा.

भारतीय प्रमाणवेळेनुसार विल्यम्स अमेरिकेत पोहोचतो. एअरपोर्टवर जॅक्सन हा कार घेऊन आलेला असतो व ते दोघे ‘दि फ्रॅंसिक स्कॉट के’ या ब्रीजवरून जॅक्सनच्या घरी जात असतात.

“बोल विल्यम्स, असा कोणता शोध (रिसर्च) तुला अस्वस्थ करत आहे.” विल्यम्स जॅक्सनला सर्व घटना सांगू लागतो. जॅक्सन, दोन आठवड्यांपूर्वी आपण दोन महासागरांना भेट दिली, त्यांचा डेटा तर आहेच माझ्याजवळ पण काही दिवसांपूर्वी जी माहिती माझ्या समोर आली आहे माझी रात्रीची झोप उडून गेली आहे. जॅक्सन त्याला कुतूहुलाने विचारतो, कोणती माहिती? लगेच विल्यम्स आपल्या बॅगेतून लॅपटॉप काढतो व एंटर (Enter) हे बटण प्रेस करुन लॅपटॉप डॅशबोर्डवर ठेवतो. लॅपटॉपच्या स्क्रिनवर अंतराळात सुर्यावर होणारे ‘सौर विस्फोट’ जॅक्सनच्या नजरेस पडतात. नंतर अटलांटिका खंडाचे चित्र येते. त्या चित्रात तीन पर्वत, शिखरे व वातावरणातील ओझोनच्या थराला भगदाड पडून सुर्याची अतिनील किरणे थेट जमिनीवर येत असतात.

[next] लॅपटॉपवरील चित्रे पाहून जॅक्सन आपली कार साईडला घेतो. त्याच्या तोंडून ‘Oh My God’, असे काळजीचे उद्गार येताच. ‘येस येस जॅक्सन ! मी देखील असाच शॉक झालो होतो.’ आपण चुकीचे होतो. ‘We are wrong’ आपले निष्कर्ष चुकीचे होते. ज्या पद्धतीने हे सौरविस्फोट घडत आहेत त्यानुसार पृथ्वीवरील वातावरणात फार मोठे बदल घडत आहेत व हे मानवजातीच्या हिताचे नाही आणि म्हणूनच उद्या होणाऱ्या जागतिक हवामान परिषदेत हा मुद्दा जगातला सर्व देशांच्या राष्ट्रपतींसमोर मांडणे फार गरजेचे आहे.

जॅक्सन या काळजीतच कार त्याच्या घराकडे घेतो; थोड्या वेळात ते घरी पोहोचतात. जॅकसनच्या घरी त्याची वयस्क आजी ‘ऐडेविना’ राहत असते.

ती त्या दोघांना पाहून खुश होते. अरे किती उशीर ? गेल्यावर्षी इंडियाला गेलास ते तिकडेच विल्यम्सला पाहून ती विचारते विल्यम्स आपल्या चेहऱ्यावरील डिप्रेशनचे हावभाव हटवून त्याजागी आनंदी वातावरणाचे हावभाव आणतो. ‘नाही ग्रॅन्डमा; एका रिसर्चमध्ये व्यस्त होतो. ऐडविना आजीला विल्यम्स उत्तर देतो.

‘ऐनी वे तु आज येणार म्हणून तुझ्या आवडीचे बटर चिकन केले आहे.’ फ्रेश हो मी लगेच सर्व्ह करते. तो दिवस कंप्यूटरमधिल माहिती संकलीत करणे व व्हाईट हाऊसशी संपर्क साधन्यात जातो. डिसेंबर २०१७ रोजी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक तापमान वाढ संबंधी सर्व देशांच्या राष्ट्रपतींसोबत एक शिखर परिषद सुरू होते. कॅनडा, इटली, भारत तसेच रशिया, जपान, जर्मनी आदी देशांचे राष्ट्रपती व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे या शिखर परिषदेत उपस्थित असतात. त्या सर्वांशी शास्त्रज्ञ विल्यम्स अ‍ॅडरसन चर्चा करत असतात. इटलीचे राष्ट्रपती त्यांना हा प्रश्न विचारतात की ‘आपणा कोणत्या माहितीच्या जोरावर जगाच्या विनाशाची बतावनी करत आहात ?’ मि.विल्यम्स त्यांच्या जोडीला जपानचे राष्ट्रपती हा प्रश्न उपस्थित करतात कि निर्माण होणारा लाखो - करोडो टन कचरा आम्ही ठेवायचा कुठे ? आणखी कोणती पर्यायी व्यवस्था आहे का ?

तेव्हढ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सर व्हिस्टन चर्चिल हे त्या ठिकाणी येतात. विल्यम्स अ‍ॅंडरसन दोन्ही देशाच्या राष्ट्रपतींना उत्तर देतात की, “माफ करा, राष्ट्रपती महोदय. कारण हे सर्व घडत आहे त्यापासून मानवजातीला व या ग्रहाला फार मोठा धोका आहे. कारण सुरुवातीपासून आपण साक्षीदार आहोत की. जेव्हा जेव्हा मानवाने आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत तेव्हा विनाश उद्भवला आहे व सध्या देखील हेच घडत आहे.” “आपल्याला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला.” जर्मनीचे राष्ट्रपती विल्यम्सला म्हणतात.

[next] “हा त्या महासागरांचा रिपोर्ट आहे ज्यावर आम्ही रिसर्च करत होतो,” असे म्हणून विल्यम्स प्रोजेक्ट स्क्रीनवर त्याला मिळालेला डेटा सर्व राष्ट्रपतींना दाखवितो व सांगतो की “गेल्या वर्षभरात महासागरातील कचर्‍याचे प्रमाण सात हजार कोटी टनांपेक्षा अधिक वाढले आहे. जगातील सर्व महासागर एकमेकांना जोडलेली आहेत. त्यामुळे हा कचरादेखील एकमेकांत मिसळत आहे. आपण आत्ताच खबरदारीची पावले उचलली नाही तर येणारा काळ खूप महाभयानक असेल.”

इटलीचे राष्ट्रपती विल्यम्सला विचारतात की, “पण या कचर्‍यामुळे असं काय निर्माण होईल ज्याची तुम्हाला एवढी भिती वाटत आहे. शेवटी हा निर्जीव कचराच तर आहे?” यावर विल्यम्स अ‍ॅंडरसनचे उत्तर अर्थपूर्ण असते की, “माननीय राष्ट्रपती महोदय, प्रश्न केवळ कचर्‍याचा नाही तर त्यामुळे निर्माण होणार्‍या ग्लोबल वॉर्मिंगचा आहे. ग्लोबल वॉर्मिंगची कक्षा पृथ्वीची सीमा ओलांडून अंतराळात पसरत आहे. ही दोन दिवसापूर्वीची सुर्यावरील परिस्थिती आहे. समोरील सौरविस्फोटांचा व्हिडीओ पाहून उपस्थित सर्व राष्ट्रपतींची पक्की खात्री होते की शास्त्रज्ञ विल्यम्स अ‍ॅंडरसन यांना आलेली शंका चुकीची नाही.

या परिस्थितीवर रशियाचे राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मत विचारतात. “मिस्टर प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, यासर्व बाबतीत आपलं काय मत आहे? हा सर्व रिपोर्ट (अहवाल) पाहता आपल्या काबील शास्त्रज्ञांना एवढी चिंता वाटत असेल तर त्या घटनांकडे आपल्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही.” “मि. विल्यम्स सर, आपल्याला या गोष्टीत कोणती मदत घ्यावी लागेल व आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे?” अमेरिकेचे राष्ट्रपती विल्यम्सला विचारतात. विल्यम्स त्यांना सांगतो की सर, सद्यपरिस्थिती पाहता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे व या अवधीत आपण एक असा उपग्रह तयार करु शकलो की जो सौरविस्फोट व महासागरातील हालचालींवर लक्ष ठेवून आपल्याला क्षणोक्षणी ‘अपडेट्स’ पाठवत राहील जेणेकरुन आपण येणार्‍या परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकू.

विल्यम्सची ही कल्पना सर्वांना पटते. अमेरिकेचे राष्ट्रपती सर विस्टन चर्चिल, हे उपग्रह निर्मितीची जबाबदारी अमेरिकेची अमेरिकेची अंतराळ संशोधन कंपनी ‘नासा’ हिच्याकडे सोपवतात. सर्व देशांचे उच्च तंत्रज्ञान व आर्थिक सहाय्य या महान कार्यास मिळते. उपग्रहाचे कार्य अचूक चालावे यासाठी विल्यम्स अ‍ॅंडरसन यांच्या सल्ल्याने उपग्रहाचे पार्ट्स निर्माण हित असतात. नासाच्या उपग्रह निर्मिती विभागात एक अनिवासी भारतीय युवक कार्यरत असतो, त्याचे नाव विक्रम शर्मा असते.

[next] या उपग्रहाकडे मानवजातीच्या रक्षणाची जबाबदारी असल्याने त्याचा नकाशा स्वतः विल्यम्स अ‍ॅंडरसन बनवतात. हा नकाशा विक्रम शर्मा याला मिळतो. नकाशा पाहूनच तो अचंबित होतो. ‘हा असा उपग्रह तर आपण पहिल्यांदाच बनवत आहोत, हुज मेड फॉर धिस अ‍ॅप? व त्याला खाली नाव दिसते. ‘विल्यम्स अ‍ॅंडरसन, स्पेस साइंटिस्ट’. तो स्वतःला म्हणतो, विल्यम्स सरांनी बनवला आहे. आय वॉंट टू मीट देम, असे म्हणून तो लॅबच्या बाहेर येतो. समोर विल्यम्स व जॅक्सन चर्चा करत उभे असतात.

विक्रम त्यांच्या जवळ जातो व आपली ओळख त्यांना सांगतो, एक्सक्युझ मी सर! हाय! आय अ‍ॅम विक्रम शर्मा. ‘शर्मा मिन्स यु आर इंडियन?’ जॅक्सन विक्रमशी हातमिळवणी करत विचारतो. ‘येस सर, कोलकता फ्रॉम इंडिया’ विक्रम हसत त्यांना उत्तर देतो. इतक्यात जॅक्सनला एक कॉल येतो व तो कॉल रिसिव्ह करण्यासाठी त्या दोघांची परवानगी घेऊन तिथून निघून जातो. ‘हाय! आय अ‍ॅम विल्यम्स अ‍ॅंडरसन.’ ‘सर, आय नो यू’ विक्रम विल्यम्सला आदरपूर्वक शब्दात म्हणतो. ‘सर मी आपला व आपल्या पुस्तकांचा चाहता आहे.’ ‘ओह!’ विल्यम्स आनंदाने म्हणतो. ‘येस सर. आता मी आपले ‘The Invention of Earth’ (शोध पृथ्वीचा) हे पुस्तक वाचत आहे व या पेजपर्यंत आलो आहे की आता आदिमानवास पृथ्वी राहण्यायोग्य बनली आहे. सर, तुम्ही तेथे एक प्रश्न विचारला आहात त्या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही त्या प्रश्नासारखाच हा ‘मॅप’ देखील. सर, हा असा उपग्रह बनवण्यामागचे कारण?

आपण माझ्या केबीनमध्ये हा विषय डिस्कस करुया, असे म्हणून विल्यम्स विक्रमला घेऊन आपल्या केबीनमध्ये जातो. विल्यम्स फोन करुन दोन कॉफी मागवतो आणि विक्रमला सांगायला सुरुवात करतो, ‘एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट सुरु झाला आहे व जवळपास सर्व देशांनी त्यासाठी आर्थिक मदत दिली आहे. हा पहिला आणि एकमेव असा प्रकल्प आहे की ज्यात सर्व देशांनी आपली भाषा, आपला प्रांत विसरुन एकत्र काम करत आहेत.’ तेवढ्यात केबीनमध्ये कॉफी येते. ‘आणि राहता राहिला प्रश्न त्या उपग्रहाचा तर त्याचे उत्तर या चीपमध्ये आहे.’ असे म्हणून एक चीप विल्यम्स विक्रमसमोर ठेवतो. विक्रम ती चीप हातात घेऊन पाहतो.

[next] कॉफी घेत घेत ते दोघे त्या विषयावर आणखी चर्चा करतात. दुसर्‍या दिवसापासून उपग्रह निर्मितीचे काम सुरु होते. एक दिवस रात्री उशीरा विक्रम आपल्या घरी येतो व डॉ. हेम्स्ली यांना आपल्या घरी आलेले पाहून चकीत होतो. विक्रम हॉलमध्ये जाऊन आपली बॅग ठेवतो. त्याला वरच्या बेडरुमची लाईट चालू आहे हे दिसते. तो बेडरुमकडे जातो. दार उघडून पाहतो तर काय त्याची पत्नी श्रेया ही अस्मीच्या डोक्यावर हात ठेवून तिला झोपवत असते. दारात उभा राहिलेला विक्रम तिला काही विचारणार इतक्यात ती त्याला ‘आपण बाहेर बोलूया’ असे खुणेने सांगते. अस्मीला गाढ झोपलेली पाहून श्रेया रुमचे दार लॉक करते. ‘काय झाल? अस्मी बरी आहे ना?’ विक्रम काळजीने विचारतो. ‘तूही कमाल करतोस विक्रम, आज तू लवकर घरी येऊन आपला हॉलिवूडला जायचा प्लॅन होता ना? तू लवकर आला नाहीस म्हणून अस्मीने अख्खं घर डोक्यावर घेतलं. कशीबशी तिला खायला घालून झोपवली व मी किचनमध्ये आले. थोड्या वेळानंतर तिची किंचाळी मला ऐकू आली. बेडरुममध्ये आले तर ती घाबरुन उठून बसली होती. तिच्या अंगाला हात लावलाअसता तिला अचानक खूप ताप आला होता. तिला विचारले तर ती काही बोलत नव्हती. मी फार घाबरले, लगेच डॉ. हेम्स्ली यांना फोन केला. त्यांनी तिला मेडिसीन दिली आहेत. आता ती ठिक आहे.’

श्रेया विक्रमला घडलेला सर्व प्रसंग सांगते व त्याला उशिरा येण्याचे कारण विचारते. विक्रम तिला सांगतो की एक नवीन उपग्रह बनविण्याचे काम हाती आले आहे. आज त्याचे पार्ट्स चेक करायचे होते म्हणून उशीर झाला. ते दोघेही फार थकलेले असल्यामुळे तिथेच सोफ्यावर झोपी जातात. सकाळ उजाडते! अमेरिकन वेळेप्रमाणे सकाळचे सात वाजलेले असतात. श्रेया नाष्टा बनवत असते. विक्रम कॉम्प्युटरवर डाटा चेक करत असतो. अस्मी जिना उतरत खाली येते. विक्रमला पाहून ‘डॅडी’ असे ओरडत येऊन त्याला मिठी मारते. ‘हे माय प्रिन्सेस! हाऊ आर यू? रात्री बरं नव्हतं ना माझ्या बेबीला?’ ‘हो डॅडी, बट आय अ‍ॅम ओके.’ ‘पण अचानक काय झालं होतं माझ्या बाळाला?’ श्रेया अस्मीला जवळ घेत विचारते. तेव्हा अस्मी त्यांना सांगू लागते की ‘धिस वॉज व्हेरी बॅड ड्रिम.’ ‘अ ड्रिम!’ श्रेया काळजीने विचारते. ‘येस मम्मा. मला समुद्रासारखं काही दिसत होतं. उंच लाटा येते होत्या लाईक त्सुनामी, अ‍ॅंड...’ ती अ‍ॅंड या शब्दावर काही सेकंद थांबते. तिला थांबलेले पाहून विक्रम विचारतो की अ‍ॅंड व्हॉट हॅपन अस्मी? विक्रमकडे पाहून ती म्हणते ‘डॅड मला एक मोठा आवाज ऐकू आला.’ ती इतकी घाबरलेली असते की बोलताना देखील अडखळत असते. ‘लाईक अ डेव्हील वॉईस.’ तिचं बोलणं पूर्ण झाल्यावर विक्रम अचानक हसू लागतो. त्याला अचानक हसू आलेलं पाहून श्रेया अस्मीकडे पाहते तेव्हा अस्मी कपाळ्यावर आठ्या व भुवया आकसून विक्रमकडे पाहत असते.

[next] श्रेया रागाने विक्रमला दटावत विक्रम प्लीज! असे म्हणते. विक्रम थोडा नॉर्मल होतो व अस्मीजवळ जाऊन तिच्या खांद्यावर आपले हात ठेवून तिला म्हणतो, ‘आय अ‍ॅम सॉरी अस्मी. पण तू असं काही सांगितलंस बेटा की मला हसू आवरलं नाही. यू नो, अस्मी. तुला असं स्वप्न का पडलं?’ अस्मी मान खाली घालून बसली होती. श्रेया त्या दोघांना एका नजरेने पाहत असते. विक्रम एकटाच बोलत असतो. ‘मी सांगतो. तू हे कॉमिक बुक्स वाचतेस ना सुपरहिरो, नॅचरल पॉवर्स ई. यांमुळे.’ विक्रमच्या अशा बोलण्याने अस्मी ओठ बाहेर काढून धुसमुसत एका खुर्चीवर जाऊन बसते. श्रेया विक्रमकडे पाहून ‘डिस्कस्टिंग’ असे म्हणत तिला सावरायला जाते.

विक्रमही लगेच तिच्याजवळ जातो. ‘हे अस्मी, आय अ‍ॅम सॉरी! मी असेच बोलून गेलो, बरं! आता तुझ्यासमोर कान धरु का?’ तरीही ती काही बोलत नसल्याचे पाहून विक्रम पुढे म्हणतो की बरं, मी आज ऑफिसवरून लवकर घरी येतो. मग आपण लॉस अ‍ॅंजोलिस व हॉलिवूड या दोन्ही ठिकाणी जाऊया. यावर अस्मीचा चेहरा खुलतो व ती विक्रमच्या गालाचे चुंबन घेऊन बेडरुमकडे धावत सुटते. थॅंक गॉड! म्हणत श्रेया एक दिर्घ श्वास घेते. ‘मग, अस्मीच्या स्टाईलची कॉपी - पेस्ट करुया?’ विक्रम श्रेयाकडे पाहून म्हणतो. तिला त्याच्या मनातील इरादा समजतो. ती त्याला नो, वे! म्हणून बाजूला ढकलून देते. विक्रम हसतच आपल्या कारमध्ये जाऊन बसतो व ऑफिसकडे रवाना होतो.

त्या दिवशी उपग्रहाचे काम ७५% पर्यंत पूर्ण झालेलं असतं, जवळजवळ दहा कुशल वैज्ञानिक त्या कामात रात्रंदिवस गुंतलेले असतात. विल्यम्स आपल्या केबीनमध्ये पृथ्वीवरील वाढत असलेल्या तापमानाची माहिती वृत्तपत्रे व इंटरनेटच्या सहाय्याने चेक करत असतो. ती माहिती चेक करत असताना त्याला काही जुन्या संस्कृतीविषयी माहिती मिळते. विक्रम त्याच्या केबीनमध्ये येतो. त्यांच्यात उपग्रह आणि विल्यम्सला मिळालेल्या माहितीवर चर्चा होते. ठरल्याप्रमाणे विक्रम आज लवकर घरी येऊन श्रेया व अस्मी सोबत लॉस अ‍ॅंजोलिस व हॉलिवूडमध्ये जाऊन एंजॉय करतो. हॉलिवूडमधील एक ठिकाण पाहत असताना त्याला विल्यम्सचा मेल येतो की उपग्रहाचे काम १००% झाले आहे. उपग्रह पूर्ण बनला असून उद्या सर्व देशांच्या राष्ट्रपतींसोबत होणार्‍या परिषदेत त्याचे नाव, तो कधी लॉंच करायचा आहे, त्याची तारीख ठरणार आहे.

[next] दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर विक्रम ऑफिसमध्ये पोहोचतो. त्याची व विल्यम्सची भेट होते. थोड्याच वेळात परिषद सुरु होणार असते. ते दोघे उपग्रहाजवळ थांबलेले असतात. ‘सर, काय वाटतं तुम्हाला, काय नाव ठेवलं जाईल या उपग्रहाचे?’ विक्रम विल्यम्सकडे पाहून विचारतो. ‘मी गेस करू शकतो, पूर्ण कल्पना नाहीमला. या उपग्रहाकडे मानवजातीच्या रक्षणाची जबाबदारी असलेने ‘सुरक्षा’ या पॉईंटला धरुनच नाव ठेवलं जाईल.’ इतक्यात एक लेडीज असिस्टंट त्या दोघांना कॉन्फरन्स हॉलमध्ये यायला सांगते. ते दोघेही त्या हॉलमध्ये जातात.

त्या जागतिक परिषदेस भारत, इटली, रशिया, तसेच कॅनडा, जपान व जर्मनीचे राष्ट्रपती व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे उपस्थित असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील या परिषदेस उपस्थित असतात. विल्यम्स अ‍ॅंडरसन उपस्थित सर्वांना उपग्रहाचे छायाचित्र दाखवित त्याची माहिती सांगत असतात. या उपग्रहात किती पार्ट्स वापरले आहेत, याची क्षमता किती आहे, किती वर्षापर्यंत हा उपग्रह कार्यरत राहील ई. सर्व देशांच्या राष्ट्रपतींना ही माहिती समजते. सर्वानुमते त्या उपग्रहाचे नाव सिक्यॉर - १ (Secure - 1) हे नाव ठेवले जाते व प्रक्षेपणाची तारीख ५ जानेवारी २०१९ ही ठरते.

अमेरिकेसोबत संपूर्ण जगात ही बातमी पसरते तेव्हा सगळे लोक उत्साहित होऊन ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत असतात. पण तेव्हा भारतातील राजस्थान या राज्यातील रकाबगढ या गावात राजेंद्र शर्मा नावाचे प्रोफेसर राहात असतात. ते विक्रम शर्माचे वडील असतात. गावातील कोल त्यांना ‘वेडा प्रोफेसर’ म्हणून हिणवत असतात. त्यांचे घर एक जुन्या प्रयोगशाळेसारखे असते. आधुनिकतेला त्यांचा साफ विरोध असतो. त्या घरात इतिहासातील अशा नेत्यांची छायाचित्रे असतात ज्यांनी सत्कर्माने वागून समाजसेवा केली आहे पण अंत अत्यंत क्रुर पद्धतीने झाला आहे. वडिलांच्या अशा स्वभावाला कंटाळून विक्रमने त्यांना सोडून अमेरिका गाठलेली असते.

[next] राजेंद्र शर्मा हे आशियातील सिंधू संस्कृतीवर अभ्यास करत असतात. त्यांचे एक ठाम मत असते की, Every civilization is destroyed in a cruel manner. म्हणजेच की पृथ्वीवर जन्माला येणारी प्रत्येक सभ्यता अतिशय क्रुर पद्धतीने नष्ट झाली आह. अगदी डायनासॉर पासून सिंधू, ग्रीक व अरब संस्कृतीपर्यंत व आत्ता जी आपली संस्कृती आहे ती देखील अशाच क्रुर पद्धतीने नष्ट होणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर डायनासॉर हे भयंकर उल्कापातामुळे, ज्वालामुखीमुळे नष्ट झाले. निसर्ग नियमांचे पालन करुन राहणारी सिंधू संस्कृती तर दुष्काळात होरपळून नष्ट झाली. या मानव संस्कृतीस निसर्गाच्या प्रकोपाची गरज नाही तर त्यांच्या हातून निर्माण झालेला आधुनिक विज्ञानाचा ‘कालपुरुष’ पुरेसा आहे आहे, हे वाक्य लिहून राजेंद्र शर्मा वहीच्या पानावर पेन मोडतात व आपल्या गूढ विचारांमध्ये हरवून जातात.

५ जानेवारी २०१९ चा दिवस उजाडतो. नासाच्या उपग्रह प्रक्षेपण विभागात उपग्रह अवकाशात पाठवण्याची जोरदार तयारी सुरू असते. पुन्हा एकदा सर्व देशांचे राष्ट्रपती, वैज्ञानिक व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे तिथे उपस्थित असतात. स्थानिक वेळेनुसार रात्री बारा वाजता ‘सिक्यॉर १’ हा सर्व देशांनी बनवलेला उपग्रह मानवजातीच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन एक अतूट आत्मविश्वासाने अंतराळात झेपावतो, तसे सर्व शास्त्रज्ञ तो उपग्रह रडारवर आहे का नाही? त्याच्या प्रवासात कोणती अडचण तर नाही ना? हे पाहण्यात गुंततात. काही वेळातच तो उपग्रह त्याच्या कक्षेत स्थिरावतो व आपल्या कामाला लागतो. त्याची बनावट अश्या पद्धतीची असते की त्याचे एक भिंग सुर्यावर होणार्‍या सुक्ष्म हालचालींवर लक्ष्य ठेवून असते व दुसरे भिंग पृथ्वीवरील महासागरांच्या हालचालींवर बारीक लक्ष्य ठेवून असते व तो उपग्रह या दोघांचे अपडेट्स पृथ्वीवर नासांच्या शास्त्रज्ञांना पाठवत असतो. शास्त्रज्ञांची उपग्रहावर नजर असते. ते आपले काम चोख करत असतात.

एके दिवशी विक्रम विल्यम्सला आपल्या घरी घेऊन येतो. विल्यम्स व श्रेयाची ओळख होते. ती त्या दोघांसाठी खायला बनविण्यासाठी किचनमध्ये जाते तर विक्रम व विल्यम्स कॉम्प्युटरवर विल्यम्सच्या चीपमधील डेटा पाहत असतात. इतक्यात अस्मी तिथे येते. कॉम्प्युटर स्क्रीनवर खवळलेला समुद्र अशा अनेक गुढ घटना दिसत असतात ते पाहून अस्मीला तिला पडलेल्या स्वप्नांची आठवण होते.

[next] तिच्या स्वप्नातील दृष्ये व समोरील दृष्ये एकसारखी असतात. हे पाहून अस्मी फार घाबरते. तिला दरदरुन घाम फुटतो. त्या अवस्थेत ती मोठ्याने किंचाळते तसे ते दोघे घाबरतात. श्रेया किचनमधील काम सोडून धावत तिच्याजवळ येते व तिला घाबरण्याचे कारण विचारते. अस्मी घाबरतच श्रेयाला बिलगते. विक्रमही तिला घाबरण्याचे कारण विचारतो. ती घाबरतच सांगते की ‘मम्मा, ते कॉम्प्युटरवरील व्हिडीओज्‌ पाहून मी घाबरले. हे तेच व्हिडीओज्‌ आहेत जे मला त्या बॅड ड्रीममध्ये दिसले होते.’ ‘ए अस्मी, तू पुन्हा नको सुरु होऊ.’ विक्रम वैतागून तिला म्हणतो. ‘विक्रम प्लीझ! ती एवढं म्हणतेय तर तिचं ऐकून का घेत नाहीस तू?’ श्रेया त्याला उत्तर देते. समोरील वादाची परिस्थिती पाहून विल्यम्स त्या दोघांना शांत करतो वनेमका प्रकार त्यांना विचारतो.

विक्रम विल्यम्सला थोडक्यात घटनेची माहिती देतो. विल्यम्सच्या मनात विचार येतो हा नक्कीच योगायोग किंवा सहज घडणार्‍या घटना नाहीत. श्रेया विक्रमकडे रागाने बघत अस्मीला घेऊन निघून जाते. विल्यम्सही तिथून बाहेर पडतो. त्याच्या डोक्यात व मनात अस्मीला पडलेले स्वप्न आणि त्याला मिळालेली माहिती एक कशी असू शकते हा प्रश्न घोळत असतो.

...आणि इतक्यात भयाण शांतता असलेल्या अंतराळात पृथ्वीपासून काही मैल दूर एक - दोन लघूग्रहांची धडक होते व त्यातील एक तुकडा सिक्यॉर - १ या उपग्रहाकडे वेगाने येत असतो. तेव्हाच पृथ्वीवरील तापमान हळूहळू वाढू लागते. भारतात मुंबईसह कोकणातील अरबी समुद्रात उंचच्या उंच लाटा तयार होऊन किनार्‍यावर आदळू लागतात. अशी स्थिती हिंदी महासागरासोबत जगातील सर्व महासागरांची होते.

क्रमशः

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.