मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा, मराठी लेख - मन मारून जगु नका. कामात स्वतःला व्यस्त ठेवा पण लक्षात ठेवा टेन्शन घेऊ नका.

आयुष्य तसं म्हटलं तर खुप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो
मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा (मराठी लेख)
आयुष्यातील प्रत्येक स्टेजचा आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तसं म्हटलं तर खुप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो.
लोक काय म्हणतील या विचाराने आपणच आपल्या मार्गात आपणच स्पिड ब्रेकर घालून घेतो.
कोणाला भेटावेसे वाटले तर भेटा, बोलावेसे वाटले तर बोला. एखाद्या विषयी काही आवडले तर स्तुती करा, नाही आवडले तर स्पष्टपणे पण न दुखावता सांगा. हेच दिसण्याच्याही बाबतीत लागू होते.
पिकले केस आवडत नाहीत, कलर करावेसे वाटतात?
- तर करा.
वाढलेली ढेरी कमी करायची आहे?
- जिम सुरू करा, नसेल जमत तर रोज किमान तासभर चाला.
नव्या पिढी सोबत स्वतःला अपग्रेड करायचंय?
- तर लोकांचा विचार न करता खुश्शाल नव्या स्टाईलचे कपडे घाला.
लहान मुलांमध्ये मूल होऊन आपले शैषव पुन्हा जगावेसे वाटतंय?
- तर जागा ना! कुणी अडवलंय?
सर्वात आधी आरश्यात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसे स्विकारायला शिका...
वय वाढत चाललंय, हे स्वीकारलं तरच आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. वाढत्या वयासोबत येणारी वेगवेगळी फेज स्वतःसोबत नवनवीन क्षण घेऊन येते त्या त्या फेजचा मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे. कुमार वयातील आठवणीत हरवून बसलात तर प्रौढ वयात येणाऱ्या क्षणांना आणि आनंदाला मुकाल.
- कोणतही क्रिम किंवा फेसपॅक तुम्हाला गोरं करणार नाही
- कोणताही शँम्पु तुमची केस गळती रोखू शकणार नाही
- कोणतेही तेल टकलावर केस ऊगवु शकणार नाही
- कोणताही साबण बच्चो जैसी कोमल स्कीन देणार नाही
- लक्षात ठेवा, कोणत्याही टुथ पेस्टमध्ये नमक नसतं, व कोणत्याही साबणामध्ये निम नसतो.
सगळेच जण आपआपली दुकानं थाटुन तुम्हाला मुर्ख बनवायला बसलेत. तेव्हा दिखावे पर न जाओ, अपनी अकल लागाओ.
तुम्ही विसाव्या वर्षी जसे दिसत होतात तसेच चाळीशीत आणि साठीत दिसाल अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे. कोणत्याही वयात फिट राहणे मात्र महत्वाचे आहे.
पोट सुटलंय तर सुटू दे, त्यासाठी लाज वाटून घेऊ नका, आपलं शरीर वयोमानानुसार बदलत राहातं. वजन पण त्याप्रमाणे कमी जास्त होत राहतं. हे सगळं नैसर्गीक आहे.
आलेली परिस्थिती सर्वप्रथम स्विकारा आणि ती बदलण्यासाठी स्वतःला तयार करा.
जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि मृत्यू हा तर निसर्गाचा नियमच आहे. आजपर्यंत कोणीही हे टाळू शकले नाही, हे स्वतःला आधी पटवून द्या.
जुन्या मशीनचा मेन्टेनन्स करून अपटुडेट करता येते पण नविन नाही करता येत. आपल्या शरीराचेही तसेच आहे.
ऑरगॅनिक धान्य, एलोविरा, कारले, मेथी, जिरे, ओवा वगैरेचे घरगुती उपाय यावरील व्हिडीओ यु ट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. इन्टरनेट, सोशल मिडीयावर वेगवेगळ्या ऊपदेशांनी नुसता ऊच्छाद मांडलाय.
“अमुक खा, तमुक खा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, गरम खा. थंड पिऊ नका, कपाल भाती करा, सकाळी निंबुपाणी, दुपारी ताक आणि रात्री गाईचं दुध घ्या. दिर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, ऊजव्या कुशीवरून ऊठा, हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प्रोटीन असतात. ज्वारी खा, नाचणी खा, वगैरे वगैरे...”
वरील सारे ऊपदेश वाचले की, डोकं गरगरु लागते. काय योग्य काय अयोग्य तेच कळत नाही. डिप्रेशनची भर पडते ती वेगळी...
पतंजली, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आशीर्वाद, नेस्ले, हिंदुस्तान लिव्हर, आई.टी.सी. अशा अनेक देशी विदेशी कंपन्या जाहिरातींचा भडिमार करून डोक्याचा नुसता भुगा करतात. कोणते उत्पादन चांगले हेच कळत नाही.
आपण सर्वचजण कधितरी मरणार आहोत पण मरण्याआधी खऱ्या अर्थाने जगणंच विसरून चाललो आहोत असं तुम्हाला नाही वाटत का? खरं सांगा.
सर्वात महत्वाचे म्हणजे मजेत रहा. कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप करू नका. चुका सर्वांकडून होतात, तुम्ही काही देव नाही. स्वतःवर प्रेम करा. दोष देण्याचे काम करण्यासाठी आसपास भरपूर लोक आहेत. नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. सकारात्मक विचारसरणीची लोकं जोडा, त्रासदायक लोकांपासून दूर राहा. आवडेल ते खा, पण प्रमाणात. थोडा का होईना पण रोज नियमित व्यायाम करा. आनंदात रहा. शरीराला त्याचं कार्य करू द्या.
मन मारून जगु नका. कामात स्वतःला व्यस्त ठेवा पण लक्षात ठेवा टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊन अडचणी कमी होत नाहीत तर वाढतात. मन शांत ठेवा आणि अडचणींवर मार्ग काढा. समवयस्क, जुन्या बाल मित्रांशी संपर्कात रहा. आयुष्यात चांगले मित्र फार गरजेचे असतात. जवळच्या मित्रांसोबत घालवलेले चांगले क्षण ताण तणाव हलके करायला मदत करतात. आयुष्य फक्त काम करण्यासाठी आणि टॅक्स भरण्यासाठी नाही, त्याचा उपभोग घ्या. वर्षातून एकदा तरी नविन जागी फिरायला जा. मृत्य कधी येईल कोणालाच माहीत नाही. वेळ हातातून वाळूसारखा निसटून चाललाय. जो वेळ शिल्लक आहे त्यात आयुष्य भरभरून जगा. भुतकाळावर पश्चात्ताप आणि भविष्यकाळाची चिंता करण्यापेक्षा वर्तमानकाळात जगा.
आयुष्य तितकही कठीण नाही.
मस्त राहा, स्वस्थ राहा.
- केदार कुबडे
छान
उत्तर द्याहटवाखुपच छान लेख लिहिला आहे केदार साहेब...!!
उत्तर द्याहटवाअप्रतिम...!!
👌👌👌
SUREKH LEKH AHE
उत्तर द्याहटवा