डौली घुबड

डौली घुबड, इसापनीती कथा - [Dauli Gubad, Isapniti Katha] पोकळ डौलाचे प्रायश्चित फजिती.
डौली घुबड - इसापनीती कथा | Dauli Gubad - Isapniti Katha
पाणी पिता पिता सहजगत्या एका तरुण घुबडाने आपली पडछाया पाहिली. स्वतःच्या सौंदर्याबद्दल अभिमान वाटून तो आपल्याशीच म्हणाला, “माझ्या सारखीच सुंदर मुले मला देवाने दिली तर किती चांगले होईल! रात्रीच्या वेळी साऱ्या आमराया निर्जीव झाल्या असता आम्हीच त्यांस शोभा आणतो! मला बायको न मिळाल्यामुळे जर आमची जात जगातून नष्ट झाली तर ती केवढी खेदाची गोष्ट! माझ्याशी जिचे लग्न होईल ती स्त्री खरोखर मोठया भाग्याची म्हटली पाहिजे!” असे मनोराज्य तो करीत आहे इतक्यात एक कावळा त्यास भेटला.

तेव्हा तो त्या कावळयास म्हणाला, “गडया, लग्न करण्याची मला इच्छा आहे तर तू गरुडमहाराजांकडे जाऊन त्यांच्या मुलीला माझ्यातर्फे मागणी घाल.”

कावळा म्हणाला, “अरे वेडया, ही सोयरीक कशी जमेल? ऐन दोनप्रहरी सूर्याकडे टक लावून पाहणारा गरुड तुला दिवाभीताला आपली मुलगी कधी तरी देईल का?” घुबडाला हे कावळ्याचे भाषण पसंत पडले नाही व त्याच्या आग्रहामुळे कावळ्याने वकिली पत्करली.

तो गरुडाकडे गेला व त्याने घुबडाची मागणी त्यास कळवली. घुबडाची विनंती ऐकून गरुडास हसूच कोसळले, परंतु तितक्यात तो कावळ्यास म्हणाला, “अरे तू त्या घुबडास माझा निरोप कळव की, ‘उदया भर दोन प्रहरी उंच आकाशात तू माझी भेट घेऊन मागणी केलीस तर मी तुला आपली मुलगी देईन.’

त्या मूर्ख व डौली घुबडाने ही गोष्ट कबूल केली व दुसरे दिवशी दुपारी तो आकाशात उडाला, परंतु डोळ्यांस एकदम अंधारी आल्यामुळे चक्कर येऊन तो एका खडकावर पडला.

तेथे इतर पक्ष्यांनी त्याचा पाठलाग केला परंतु केला परंतु तो कसाबसा जीव घेऊन एका जुन्या वृक्ष्याच्या ढोलीत शिरला.

तात्पर्य: पोकळ डौलाचे प्रायश्चित फजिती.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.