मी नाव शोधतो आहे - अनुभव कथन

मी नाव शोधतो आहे, अनुभव कथन [Me Naav Shodhato Aahe, Anubhav Kathan] पुलावरून घरी परत येताना नदीच्या तीराच्या एका वळणावर ने-आण करणारी ती नाव मातीमध्ये रुतून बसलेली दिसते.
मी नाव शोधतो आहे - अनुभव कथन | Me Naav Shodhato Aahe - Anubhav Kathan

कृत्रिम वॉटर पार्कला नदीच्या अथांग आनंदाची सर येणार नाही

मी कुणी चित्रकार नाही; मी कधीच चित्रकलेत रस दाखवला नाही, लहानपणापासूनचं माझं आणि सगळ्यांचं एक आवडतं कॉमन चित्र...

एक नदी वाहते आहे.
एक छोटसं मंदिर आणि पिंपळाचा पार.
एक नावाडी नदीच्या पात्राच्या मधोमध नाव वल्हवत आहे.
घाटावर बायका धुणं धूत आहे.
जनावरं नदीत पोहत आहेत.
निळ्या आकाशात चिटपाखरं गगन भरारी घेत आहेत.

हे असं चित्र पाहिलं कि मला माझे गावाकडचे दिवस आठवतात. मुरगुडचा ‘मंगळवारचा आठवडी बाजार’ माझ्या गावापासून म्हणजे ‘वाघापुर’ पासून दोन कोस दूर.

हातातली नायलॉनची पिशवी हलवत बिनधास्त आईच्या मागोमाग शेतातल्या पायवाटेनं चाललोय. सूर्य डोक्यावर आहे. उन्हाच्या झळा खूप त्रास देताहेत त्यामुळं हातातली नायलॉनची पिशवी डोक्यावर घेतलीये. तरीही उन्हाच्या झळा लागत आहेतच पण मनातलं जिवंत चित्र बघण्याच्या ओढीनं त्या फिक्या पडत आहेत. शेतातल्या पायवाटेनं ऊस बाजूला सारून माझी स्वारी आईच्या पावलो पावली चाललीये. घरापासून दहा पंधरा मिनिटं चालल्यानंतर शत पावलांच्या अंतरावर वेदगंगा नदीच्या पात्राची चाहूल लागतीये आणि हळूहळू माझ्या मनातलं चित्र सत्यात अवतरलयं.

[next] तेच चित्र; तुमचं आमचं कॉमन.
एक नावाडी नदीच्या पात्राच्या मधोमध नाव वल्हवत आहे. घाटावर बायका धुणे धूत आहेत. जनावरं नदीत पोहत आहेत. निळ्या आकाशात चिटपाखरं गगन भरारी घेत आहेत.

नदीच्या दरडेवरून आईचा हात धरून खाली नदीपात्रात उतरतोय. नावेमध्ये चढण्यासाठी कुणीतरी मदतीचा हात पुढे केलाय. नावेमध्ये चढल्या नंतर नावेच्या मध्ये उभे राहून नावाड्याला ‘चलो’ असं म्हणत दिमाखात कोलंबस असल्यासारखं स्वतःला फील करतोय. नाव पुढे पुढे जातीये आणि नदीचं पाणी आपसूकचं बाजूला होतंय.

गावामध्ये दहावीपर्यंतच शाळा असल्यानं अकरावीला मुरगूड मधेच प्रवेश घेतला. मग त्या नावेचं आणि माझं दररोजचच भेटणं. हिंवाळ्याच्या सकाळी सातच्या आसपास आम्ही मित्र धुक्यातून पायवाट शोधत कॉलेजला जायला निघायचो. इतकं धुकं पडलेलं असायचं कि समोरचं सुद्धा काही दिसत नसायचं. अशा वेळी नदीच्या तीरावर पोहाचल्यानंतर नाव पलीकडे असली तरी सुद्धा दिसायची नाही. मग मुसाफिरांना सोडून नावाडी परत येतोय असं पुसटसं चित्र दिसायचं.

[next] नाव तशी खूप मोठी होती. एका वेळी वीस-पंचवीस प्रवासी आरामात प्रवास करू शकतील एवढी; त्यावेळी कॉलेजला जाणाऱ्या मुलीही असायच्या. अशावेळी ऐन तारुण्यात आलेल्या आमच्यासारख्यांचा कोणी कोलंबस झाला नसेल तर नवलच. नाव चालू झाली की मुली बावरून नावेच्या मधोमध उभ्या रहायच्या, आणि आमच्यासारखे तटरक्षक नावेच्या कडेला. एकंदरीत ते आल्हाददायक वातावरण आठवून माझ्यासाठी आजकालचे मी फिरलेले पिकनिक स्पॉट सुद्धा फिके पडतील. अशी ती आमची नाव.

उन्हाळ्यातल्या दुपारी कॉलेज मधून परत येताना आम्ही मित्र घामेजलेलो आणि भुकेलेलो असायचो. त्यावेळी कारखान्याला जाणारा ऊसाचा ट्रक्टर दिसला कि, ऊसाची पेरं मोडून मनसोक्त खात चालायचो. नावेमध्ये चढल्यानंतर पाठीवरची सॅक खाली ठेऊन उसासा टाकत बसायचो. नावाड्यानं ठेवलेल्या मोग्यातलं पाणी प्यायचो. तो मोगा म्हणजे आमची पाणपोईच आणि नावाडी म्हणजे आमचा किसुदा. आदरानं आम्ही त्याला किश्या म्हणायचो (अजूनही म्हणतोय) मग तो आमच्याकडून एक रुपया मागायचा. पन्नास पैसे जायचे आणि पन्नास पैसे यायचे ‘कालचं पण राहिल्यात’ दोन रुपये पुढे सरकायचे ‘परवाचं पण राहिल्यात.’ असा आमचा व्यवहार आणि आमच्या ‘पॉकेट मनी’ ला पडलेली ठिगळं.

दुपारच्या वक्तास नदीवर सामसूम असायचं. अशावेळी नाव नदीच्या बरोबर मधोमध नेऊन थांबवायची. कपडे काढायचे. सॅक व कपडे नावेच्या आतमध्ये ठेवायचे. मग धावत येऊन नावेच्या कडेवरून पाण्यात सुळकी घ्यायची (सैराटमधील हिरोची सुळकी पहिली कि आजही जुने दिवस समोर येतात). खोलपर्यंत, दूरपर्यंत सुळकी जायची. पाण्यातून डोके बाहेर काढून थोड्या अंतरापर्यंत पोहत जायचं आणि थांबून केस झटकायचे. कित्ती मजा! हे सर्व आता आठवलं तरी केस ओलेच आहेत असं वाटतं (कृत्रिम वॉटर पार्कला नदीच्या अथांग आनंदाची सर येणार नाही). मनसोक्त पोहून झाल्यानंतर पोटामध्ये भुकेने आग व्हायची. नदीतून वाहत आलेले नारळ घेऊन तीरावर यायचं. त्याची शेंडी काढायची, नारळ फोडायचा, त्यातलं अमृतपाणी घटाघट पिऊन घ्यायचं (हेच आमचं Supplementary Drink). खोबऱ्याला भकलातून वेगळं न करताच दातानं कुरतडून खायचं. पोट भरल्यानंतर खोबरं उरलच तर ‘किसुदा, हे घे’ म्हणत; नावेच्या दिशेने आकाशात फेकायचं. ते बरोबर नावेत जाऊन पडायचं; कधीकधी पाण्यातही.

[next] मनसोक्त पोहून, खाऊन झाल्यानंतर नावेमध्ये येऊन उन्हाने अंग सुकवण्यासाठी उघडेच नावेच्या काठावर पाय अलगद खाली नदीच्या पात्रात सोडून बसायचं आणि पायाला पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत पाय हलवायचे.

मंदिराच्या बाजूने येणाऱ्या रस्त्याला मुली नावेकडे येताना दिसल्या कि किसुदा आम्हाला आरोळी द्यायचा ‘आऽऽरं हि आली बघ, तीऽऽ आली बघ’ अशा वेळी सुकलेल्या अंगाचा विचार न करता आमचं अर्धनग्न शरीर पुन्हा पाण्यामध्ये सुळकी घ्यायचं आणि वेगानं पोहत जाऊन दूर पाण्यामध्ये तरंगत रहायचं. मुली गेल्याचा अंदाज घेऊन, हळूहळू चोरट्या नजरेनं नावेमध्ये परत यायचं. पुन्हा असं होऊ नये म्हणून गडबडीमध्येच कपडे घालायचे अन् सॅक खांद्याला अडकवून ‘येतो किसुदा’ असं म्हणत दरड चढायची आणि पाय घराकडे वळायचे

वाघापूरहून मुरगुडला वाहने जाण्यासाठी पुलाची गरज होती. त्यामुळे तिथे लाखो रुपये खर्च करून पूल बांधला. नदीकडे जाणारा कच्चा रस्ता पक्का डांबरी झाला. दळणवळणाची साधने वाढली. गावातून जाणारे हे पक्के रस्ते गावाला विकासाकडे घेऊन चाललेत. छोट्या शहराला गाव जोडल्यामुळे गावाच्या विकासाचा आलेख वरवर जातोय. वेळेची बचत होतीये. एकंदरीत गावाची प्रगती होतीये.

सुट्टीला गावी गेलो कि मी या पुलावर नक्की जातो. पुलवजा नदीचं सौंदर्य अजूनही तसचं टिकून आहे. अजूनही तिथे गेल्यावर पुर्वीसारखच अल्हाददायक वाटतं.

पुलावरून घरी परत येताना नदीच्या तीराच्या एका वळणावर ने-आण करणारी ती ‘नाव’ मातीमध्ये रुतून बसलेली दिसते. बाजूने गवत उगवलय. तिच्या लाकडाच्या फळ्या तुटल्याहेत, कुजल्याहेत. आज तिची अशी अवस्था बघितली कि दुःख वाटतं.

मला चित्र काढायला फारसं आवडत नसलं तरीही मनाच्या कोपऱ्यात निपचित पडलेलं हे तुमचं आमचं कॉमन चित्र आठवणींच्या कॅनव्हास वरून कधीच पुसलं जाणार नाही, कधीच नाही.


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

३ टिप्पण्या

  1. धन्यवाद
  2. खूपच छान
    1. धन्यवाद
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.