मंगळागौरीची कहाणी (Mangalagaurichi Kahani): श्रावणी व्रतकथेचे शुद्ध रूप, अर्थ, प्रतीकात्मकता आणि सखोल संपादकीय विश्लेषण.
मराठी लोकसंस्कृतीतील श्रावण महिन्यातील पारंपरिक कथाबंध आणि स्त्री-निष्ठेचे प्रतीक असणारी ‘मंगळागौरीची कहाणी’ ही दैव, कर्तव्य व पतिव्रता धर्माचा महिमा सांगणारी एक महत्त्वपूर्ण लोककथा आहे…
मंगळागौरीची कहाणी
मराठी लोकसाहित्याच्या समृद्ध परंपरेत ‘श्रावणातल्या कहाण्या’ या केवळ धार्मिक व्रतकथा नसून त्या लोकजीवनातील कौटुंबिक मूल्ये, सामाजिक नातेसंबंध आणि स्त्री-जीवनाच्या भावविश्वाचा अस्सल दस्तावेज आहेत.
ऋतुचक्रातील चैतन्यमयी श्रावण महिन्यात पाळायच्या व्रतांपैकी ‘मंगळागौरीचे व्रत’ हे विशेषतः नवविवाहितांच्या अखंड सौभाग्यासाठी, पतिजीवनाच्या रक्षणासाठी आणि कुलवर्धनासाठी अत्यंत श्रद्धेने केले जाते. ‘आटपाट नगर होते’ या पारंपरिक लोककथेच्या नांदीने सुरू होणारी ही कहाणी मानवी आयुष्यातील अपत्यप्राप्तीची आस, नियतीचा अटळ नियम, शाप-उःशापाचे चक्र आणि अंतिमतः स्त्रीशक्तीच्या व्रताचरणातून होणारा नियतीवरील विजय अत्यंत सोप्या, प्रवाही व नाट्यमय भाषेत रेखाटते. लोककथेचे मूळ सौंदर्य, तिची लय आणि मौखिक परंपरेचा गोडवा अबाधित ठेवून केलेले भाषिक शुद्धीकरण या कहाणीचे साहित्यमूल्य अधिक उजागर करते.
आटपाट नगर होते. तिथे एक वाणी होता. त्याला मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. ‘अलख’ म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याने तिला युक्ती सांगितली, “दाराच्या आड लपून बस, अलख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल.” तशी भिक्षा झोळीत घातली. बुवांचा नेम मोडला. ते बाईवर फार रागावले. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्यांचे पाय धरले. बुवांनी उःशाप दिला. बुवा म्हणाले, “आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बैस, निळी वस्त्रे परिधान कर, रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण. देवीचे देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर; ती तुला पुत्र देईल.” असे बोलून बुवा चालते झाले.
तिने आपल्या पतीला सांगितले. वाणी रानात गेला. घोडा अडला, तिथे खणले. देवीचे देऊळ लागले. सुवर्णाचे देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरदार आहे, गुरेढोरे आहेत, धन-द्रव्य आहे; पोटी पुत्र नाही, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचे सुख नाही; मी प्रसन्न झाले आहे, तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल; इच्छा असेल ते मागून घे.” त्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने सांगितले, “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचे झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे आणि घरी जाऊन बायकोला खाऊ घाल; म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” नंतर देवी अदृश्य झाली.
वाणी देवळामागे गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्यासाठी घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच! असे चार-पाच वेळा झाले. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितले, “तुझ्या नशिबी एकच फळ आहे.” फळ घेऊन तो घरी आला, बायकोला खाऊ घातले. ती गरोदर राहिली. दिवसेंदिवस गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसागणिक तो वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी ‘लग्न करा’ म्हणाली. “काशीयात्रेवाचून लग्न करणे नाही, असा माझा नवस आहे,” असा त्याने जबाब दिला.
काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले. मामा-भाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झाले? वाटेने एक नगर लागले. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकींचे भांडण लागले. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे!” तेव्हा ती मुलगी म्हणाली, “माझी आई मंगळागौरीचे व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही; मग मी तर तिची मुलगी आहे!” हे भाषण मामाने ऐकले. त्याच्या मनात आले, ‘हिच्याशी भाच्याचे लग्न करावे, म्हणजे हा दीर्घायुषी होईल.’ परंतु हे घडणार कसे? त्याच दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला.
इकडे काय झाले? त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते. लग्नाच्या वेळी नवरा मुलगा आजारी पडला. मुलाच्या आई-बापांना पंचाईत पडली. ‘पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरे होईल, त्याला पुढे करून वेळ साजरी करू,’ म्हणून ते धर्मशाळा पाहू लागले. मामा-भाचे दृष्टीस पडले. मामाकडून भाच्याला नेले, गोरज मुहूर्तावर लग्न लावले. उभयतांना गौरीहरापाशी निजवले. दोघे झोपी गेली. मुलीला देवीने दृष्टांत दिला, “अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्यासाठी दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल; अंगातल्या चोळीने तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे.” तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला, भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामा-भाचे मार्गस्थ झाले.
दुसऱ्या दिवशी काय झाले? हिने सकाळी उठून स्नान केले, आपल्या आईला वाण दिले. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला! आईने कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिला वर मंडपात आला. मुलीला खेळायला आणले; ती म्हणाली, “हा माझा नवरा नाही, मी याच्याबरोबर खेळत नाही.” रात्रीच्या लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आई-बापाला पंचाईत पडली, ‘हिचा नवरा कसा सापडतो?’ नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावेत, आईने पाणी घालावे, भावाने गंध लावावे आणि बापाने विडा द्यावा; असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले.
इकडे मामा-भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली, यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचे युद्ध झाले, यमदूत पळून गेले. गौर तिथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगू लागला, “मला असे असे स्वप्न पडले.” मामा म्हणाला, “ठीक झाले, तुझ्यावरचे विघ्न टळले; उद्या आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले, तळ्यावर स्वयंपाक करू लागले.
दासींनी येऊन सांगितले, “इथे अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही.” दासींनी यजमाणीस सांगितले. त्यांनी पालखी पाठवली, आदरातिथ्याने घरी नेले. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखले, नवऱ्याने अंगठी ओळखली. आई-बापांनी विचारले, “तुझ्याजवळ खूण काय आहे?” उसने लाडवांचे ताट दाखवले. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामा-भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले, “तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला,” असे म्हणाली. तिने सांगितले, “मला मंगळागौरीचे व्रत असते, ही सगळी तिची कृपा.” सासर-माहेरची, घरची-दारची माणसे सर्व एकत्र झाली आणि त्यांनी त्या व्रताचे उद्यापन केले.
तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हा-आम्हा सर्वांना होवो आणि आपले सौभाग्य अखंड राहो; इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठां उत्तराची कहाणी, पाचां उत्तरी (मंगळागौरीची कहाणी) सुफळ संपूर्ण.























Khupch Chaan Mahiti Ahe ��
उत्तर द्याहटवाआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
हटवा