एके दिवशी - मराठी कविता

एके दिवशी, मराठी कविता - [Eke Divashi, Marathi Kavita] एके दिवशी माझ्यापाशी असेल एक गाडी, खोली फ्लॅट नको आता हवी एक वाडी.
एके दिवशी - मराठी कविता | Eke Divashi - Marathi Kavita
एके दिवशी माझ्यापाशी असेल एक गाडी
खोली फ्लॅट नको आता हवी एक वाडी

चालून तरी किती चालू असतं डोक्यावर ऊन
पाणीसुद्धा म्हणतंय आता जरा जपून
काम करायची आशा रहाते खूपच थोडी

बसचा कसला ठाव ठिकाणा लांबच लांब रांग
रिक्षाचाही माज असह्य नाही मनःशांतीचा थांग
भलेभलेही थकलेत कोण लागेल लोकलच्या नादी

ट्रॅफिक काय लागणारच ते कसली आहे भिती
पेट्रोल दर वाढणारच ते वाढतील तरी किती
प्रवासाचं सुख मिळो एवढीच आशा वेडी

आईचा गुडघा चालत होता आता जरा रडतोय
खड्डा आला की कण्हत होता आता ओरडतोय
रिक्षावाला भैय्या वेग त्याचा ना सोडी

नाटक बघणं थांबलय आता
वर्ष सरलं लग्नाला जाता
शरीरसुद्धा मोठं दुखणं अंगावरच काढी

पाणी सोडणं कौतुक झालय
सोसायटी मिटींगचं फॅड आलय
मेन्टेनन्सचा बाऊ दर महिना वाढी

कॉम्प्लेक्स टाऊनशीप नुसतं नाव
आपलेपणाचा नसतो भाव
सणासुदीचा धिंगाणा मन पिळवटून काढी

झाडं फुलं हरवून बसलोय
निसर्गाला फसवून बसलोय
आणि होतय अ‍ॅमेनिटीज्‌चं लाडी लाडी

काही स्क्वेअर फिट मध्ये जग बनलं
कृत्रिम वार्‍याला घरी आणलं
शेजारी गुड मॉर्निंग पुरता शेजार धर्म पाळी

आम्हालाही जरा सुख कळू दे
चैनेचं वारं इकडं वळू दे
सुखालाही सापडेल कधी आमच्या नशीबाची नाडी

एके दिवशी माझ्यापाशी असेल एक गाडी
खोली फ्लॅट नको आता हवी एक वाडी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.