८ वर्षापूर्वीच्या अगडबम ची नाजुका परतली आहे
गेल्या ८ वर्षापूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘अगडबम’ मराठी सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.अगडबम या मराठी सिनेमातील सर्वांची लाडकी ‘नाजुका’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, ‘माझा अगडबम’ या सिनेमाद्वारे झळकणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने गाजवलेल्या या पात्राचे आजही विशेष कौतुक केले जात असून, ‘माझा अगडबम’ मध्ये ती यापेक्षाही आणखी वेगळ्या दमदार भूमिकेतून लोकांसमोर येत आहे.
कारण, या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेबरोबरच लेखिका. दिग्दर्शिका, निर्माती अशा त्रिसुत्री भूमिकेत ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात, नाजुकाचा पती म्हणजेच रायबाच्या भूमिकेत, मराठीचा सुपरस्टार अभिनेता ‘सुबोध भावे’ दिसणार आहे. त्यामुळे,अभिनयात वैविध्यपण जपणाऱ्या सुबोधचा एक नवा अंदाज आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे.
मनोरंजनाची वजनदार मेजवानी देणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल माध्यमांवर टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझर पोस्टरवर पाठमोरी उभी असलेली एक लढवय्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र हि व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून येत नसल्यामुळे, हा टीझर पोस्टर प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
सुपरहिट ‘अगडबम’ च्या या दमदार सिक्वेलच्या सादरीकरणाची फळीदेखील तितकीच दमदार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चित्रपटनिर्माते आणि वितरक ‘जयंतीलाल गडा’ यांची ‘पेन इंडिया लिमिटेड’ कंपनी प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. शिवाय, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली असून, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.