माईलस्टोन - मराठी कविता

माईलस्टोन, मराठी कविता - [Milestone, Marathi Kavita] ऊठ रे काळ्या पेंगू नको आता, राहू केतूचे सैनिक नाहीतर धरतील तुमच्याच माना.
माईलस्टोन
ऊठ रे काळ्या पेंगू नको आता
राहू केतूचे सैनिक नाहीतर धरतील तुमच्याच माना

चाल-चाल चालायचंय, राब-राब राबायचंय
क्षितिजाच्या सामोरी जाऊन सूर्योदयही पहायचंय
ओसाड झाल्या जमिनीवर हिरवं छप्पर घालायचंय
मंतरलेल्या नदीतून देव देणं आणायचंय

ऊठ ऊठ काळ्या पेंगू नको आता
काळे गोरे सगळेच नाही तर मारतील तुला लाता

हजार खोलीच्या मालकाला अ, ब, क, ड शिकवायचंय
जमलंच तर हात पकडून जग खरं दाखवायचंय
पाळण्यातल्या बाळाला अजून चालणं शिकवायचंय
चालून पळून थकलेल्याला हात देऊन उठवायचंय

सांभाळ रे काळ्या पेंगू नको आता
डोक्यावरचा भार खाली पडेल मेल्या

गीता, कुराण, बायबल पुन्हा एकदा वाचायचंय
काना, मात्रा, वेलांटीला जग सारं सांगायचंय
उघड्याबंब पेटाऱ्याना छपराखाली ठेवायचंय
गडद-फिकट देखाव्यांचे सूर भारी जुळवायाचेय

चल पटकन काळ्या पेंगू नको आता
वेळ सरतोय आता घाई कर पोरा

अजस्त्र बाहूंनी जग सारं ओढायचंय
न खरचटता दरी न डोंगर ओलांडायाचेय
नारायणाच्या दर्शनाला टपटप जायचंय
पुढच्या माईलस्टोनला पटकन गाठायचंय

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.