आध्यात्मात जसे ‘पंढरपूर’ला महत्व आहे तसे अभ्यासविश्वात ‘संगणक’ क्षेत्राला महत्व आहे. तंत्रयुगातील वारीच्या निमित्ताने संगणक क्षेत्रातील एका माऊलीची थोडक्यात ओळख
क्षेत्र पंढरपूरला असंख्य वारकरी आषाढी एकादशी निमित्त माऊलींच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. मनःशांती आणि आध्यात्मिक जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे घेऊन जाणारा हा प्रवास कष्टाचा असला तरी सुखद वाटतो कारण मन पांडुरंगात रमलेलं असतं. याचप्रमाणे तुमच्या ध्येयावर जर तुमची भक्ति जडली असेल तर तुमच्या आवडत्या क्षेत्रात प्रवास कष्टदायी असला तरी आनंदमयी असेल यात शंका नाही. खरं तर अभ्यासविश्वात अनेक क्षेत्रं आहेत आणि प्रत्येक क्षेत्राचं स्वतःचं असं वेगळेपण आणि महत्व आहे. परंतु २१ व्या शतकाच्या उंबरठा ओलांडत असताना आणि आधुनिकीकरणाच्या जागतिक बाजारपेठेचा जर वेग पकडायचा असेल तर संगणकाची मदत गरजेची आहे. प्रत्येक क्षेत्राच्या माहिती, विकास आणि संशोधन कार्यात संगणकाची मदत मोलाची आहे आणि म्हणूनच आध्यात्मिक जगात जसं क्षेत्र ‘पंढरपूर’ला महत्व आहे तसं अभ्यासविश्वात क्षेत्र ‘संगणका’ला आहे असं मला वाटतं. तेव्हा या वारीच्या निमित्ताने याच संगणक क्षेत्रातील एका माऊलीची थोडक्यात ओळख करून देत आहे.संगणक म्हटलं की प्रोग्रामर हा शब्द जणू जोडगोळीच वाटतो. मग मनात कुतुहल तयार होतं की, ‘कोण असेल बरं पहिला प्रोग्रामर ?’ आणि मला लिहिताना अत्यंत अभिमान वाटतो की, ही पहिली प्रोग्रामर आहे एक माऊली जिचं नाव आहे ‘ऑगस्टा एडा किंग’ जी ‘एडा लवलेस’ या नावाने देखिल ओळखले जाते.
‘एडा लवलेस’ यांचा जन्म १० डिसेंबर १८१५ रोजी झाला. लंडनमधील सुप्रसिद्ध कवी ‘जॉर्ज गॉर्डन बायरन’ यांची ती कन्या परंतू तिच्या जन्माच्या काही आठवडे आधीच तिच्या आईने म्हणजेच ‘अॅनी इस्बाला मिल्बॉक बायरन’ यांनी तिच्या वडिलांशी घटस्फोट घेतला होता. काही महिन्यांनीच ‘लॉर्ड बायरन’ यांनी इंग्लंड सोडले. त्यानंतर एडाने तिच्या वडिलांना कधीच पाहिले नाही. ‘जॉर्ज गॉर्डन बायरन’ यांचा एडा ८ वर्षांची असतानाच ग्रीसमध्ये मृत्यू झाला. एडाचे संपूर्ण संगोपन तिच्या आईनेच केले आणि तिच्या आईच्या आग्रहाखातर तिला गणित आणि विज्ञान शिकविण्यात आले. त्या काळात अशा आव्हानात्मक विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात होते. परंतू एडाच्या आईचा असा समज होता की, कठीण विषयाच्या अभ्यासात गुंतून राहिल्यामुळे का होईना पण तिच्यामध्ये तिच्या वडिलांचे उपजत गुण तरी विकसित होणार नाहीत.
[next] एडाच्या आईचा निर्णय कदाचित योग्य असावा अगदी सुरूवातीपासूनच एडा तिची गणित आणि भाषेविषयीची प्रतिभा दाखवित होती. वयाच्या १७ व्या वर्षी एडाची गणितज्ञ आणि संशोधक ‘चार्ल्स बॅबेज’ यांनी तिला त्यांची मदतनीस व मार्गदर्शक म्हणुन काम पाहण्याची परवानगी दिली. बॅबेज यांच्या सहाय्याने एडाने लंडनचे प्राध्यापक ‘अगस्तस डी मॉर्गन’ यांच्यासोबत प्रगत गणिताचा अभ्यास सुरू केला.
संगणकाचे जनक मानले जाणारे ‘चार्ल्स बॅबेज’ यांच्या विचारांनी एडा अत्यंत प्रभावित झाली होती. बॅबेज यांनी गणिती आकडेमोड करण्यासाठी फरक इंजिनाचा शोध लावला. ही मशीन पूर्ण होण्याआधी एडाला ती पाहण्याची संधी मिळाली आणि ती भारावून गेली. नंतर बॅबेज यांनी आणखी एक अॅनालिटिकल (विश्लेषणात्मक) इंजिन तयार केले जे जटिल आकडेमोडीसाठी उपयुक्त होते. कालांतराने एडा यांना इटालियन इंजिनिअर ‘लुइजी फेडरीको मिनब्रा’ यांनी बॅबेज यांच्या अॅनालिटीकल इंजिन या विषयावर लिहिलेला लेख अनुवाद करण्यासाठी विचारण्यात आले आणि त्यांनी मुळ फ्रेंच भाषेतील हा लेख इंग्रजी भाषेत फक्त अनुवादितच केला नाही तर त्या यंत्राविषयी स्वतःचे विचार व संकल्पनाही मांडल्या.
एडा ही पहिली व्यक्ती होती जिने ओळखले होते की, मशीनचा वापर हा आकडेमोड करण्याव्यतिरीक्तही केला जाऊ शकतो आणि मग याच मशीनद्वारे चालविण्याच्या उद्देशाने तिने तिचा पहिला अल्गोरिदम प्रसिद्ध केला. एडा यांनी त्यांच्या अभ्यासात अक्षरे व चिन्हे हाताळण्यासाठी कोड कसा तयार करावा याची नोंद करून ठेवली आहे तसेच आजच्या कॉम्पुटर प्रोग्रामिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या लुपिंग (Looping) पद्धतीचे म्हणजेच ठराविक सूचनांचा सम्च जर वारंवार लागत असेल तर त्याची पुनरावृत्ती कशी करावी याबद्दलही लिहून ठेवले आहे. तिच्या या सर्व मोलाच्या योगदानाबद्दल ती संगणक क्षेत्रातील पहिली प्रोग्रामर म्हणुन ओळखली जाते. दुर्दैवाने एडा यांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे २७ नोव्हेंबर १८५२ रोजी मृत्यू झाला. एडा यांना आणखी थोडे आयुष्य मिळाले असते तर नक्कीच गणित आणि संगणक क्षेत्रात भरीव कामगिरी पाहायला मिळाली असती.
जाता जाता या लेखातुन एकच सम्देश द्यावासा वाटतो की, ‘एडा यांचा जीवनप्रवास हा केवळ ३६ वर्षांचा होता. आपण जर जगाचा आणि भारताचा इतिहास पाहिला तर एडा यांच्या सारखेच अनेक प्रज्ञावंत आहेत ज्यांचे आयुर्मान कमी आहे. परंतु त्यांच्या कार्य आणि कर्तुत्वाने त्यांचे आयुष्यमान अमर झाले आहे. त्यामुळे आयुर्मानाच्या या दृष्टचक्रात न अडकता कर्तुत्वाच्या प्रतिभेचं आयुष्य कसं उंचाविता आणि वाढविता येईल यासाठी तरूण पिढीने प्रयत्न करावा असं मला मनापासून वाटतं.’
‘वारीच्या निमित्ताने संत तुकाराम यांच्या तुकाराम गाथेतील माझ्या आवडीचा एक अभंग’
अवगुणांचे हातीं ।
आहे अवघी फजिती ॥१॥
नाहीं पात्रासवें चाड ।
प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु॥
विष तांब्या वाटी ।
भरली लावूं नये होटीं ॥२॥
तुका म्हणे भाव ।
शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥