सगळ्या मर्यादा, बंधन तिच्यासाठीच का?
तिच्या हसण्यावर, तिच्या बोलण्यावर, तिच्या उठण्यावर, तिच्या बसण्यावर, तिच्या चालण्यावर, तिच्या खाण्यावर, तिच्या पेहराव्यावर इत्यादी या सगळ्या मर्यादा, बंधन तिच्यासाठीच का? आज आपण बोलतो स्त्री - पुरुष समानता मग ही अशी समानतेची वागणूक तिच्यासाठीच का? त्याच्यासाठी का नाही? मग आज ‘ही’ हे बोलण्या इतकेच आहे.तिच्या वयानुसार तिच्या कपड्यांची परिभाषा बदलते. पण का आपण एखाद्याच्या कपड्याहून त्या व्यक्तीबद्दलच मत देतो ते देखील चुकीचंच. मला सांगा तिने जर पंजाबी सूट किंवा साडी घातली तर ती सुसंस्कारी आणि तेच जर तिने जीन्स आणि टॉप किंवा वन - पीस घातला तर तिला संस्कार नाहीत म्हणून आपण मत देऊन बसतो. पण कोणी दिला तुम्हाला हा अधिकार? तिच्या आयुष्यात तिने काय करावं, काय नाही हा सर्वस्वी तिचा आणि तिचाच प्रश्न आहे.
[next] रोज उठल्यावर बातम्यात किंवा वृत्तपत्रात आपण बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषण इ. घटना ऐकतो, बघतो किंवा वाचतो. पण हे कोणी विचार करत नाही कि ह्या घटना ज्या होतात त्याचा वयोगट जर बघता ८ महिन्यापासून ते ७० वर्षाच्या आजी पर्यंतचा आहे. पण मग मी बोलते ८ महिन्याची चिमुकली तिच्या आयुष्यतल्या खूपच पहिल्या पडावात आहे आणि तिची निरागसता हेच तिचं सर्वकाही आणि ७० वर्षाच्या आजी या तर आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या पडावात आहे, त्यांना काही केलात तरी कोणी काहीच बोलणार नाही आणि आता काय राहिलं आहे त्यांच्या आयुष्यात, असं म्हणून गृहीत धरलं जातं. या दोन्ही वयोगटामध्यला स्त्रीयांबद्दल तर मी बोलताच नाही कारण या वयोगटामधला आकडा आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आहे. बरं या सगळ्या बातम्या तुम्हीच जगासमोर आणता आणि त्याच्यावर चर्चा, वादविवाद होतात आणि त्याचा बाजार केला जातो पण कोणी या गोष्टींचा विचार करता का कि आज तिची काय अवस्था आहे किंवा जे काही झालं त्यात तिची काय चुक होती. पण आपण विचार फक्त हाच करतो तिनेच काही केलं असेल म्हणून तिच्या सोबत असं झालं म्हणून गृहीत धरतो आणि आपला वेळ घालवण्यासाठी या अशा नाजूक विषयाचा बाजार करतो. असा बाजार करणारे तुम्ही - आम्ही कोण?
[next] आज तिने साडी घातली किंवा पंजाबी सूट तरी तिच्या बरोबर अश्या घटना होतातच आणि जीन्स आणि टॉप किंवा वन - पीस घातला तरी हेच होतं, यामध्ये तिची किंवा तिच्या कपड्यांची चुकी नाही त्याची चुकी आहे. मी म्हणत नाही तो चुकीचा आहे पूर्णपणे. यामध्ये त्याच्या विचारांचा, आजुबाजुंच्या लोकांचा, त्याच्या वर्तनाचा प्रभाव आहे. तर त्याने थोडा विचार केला पाहिजे कि आई, आजी, बहीण, काकी, मामी, वहिनी, मैत्रीण, बायको, मुलगी , सून इतकी सुंदर प्रेमळ नात्यांची गुंफण आहे तर ती नाती तशीच राहोत आणि यामध्ये आणखीन मी कशी भर घालून या गुंफणाची माळ होईल. तर आणि तरच ह्या अशा घटनांना आळा बसेल.
“मला इथे कोणाच्या हि भावना दुखवायच्या नाही आहेत फक्त विचार करा आणि गोष्टी समजून घ्या. जर कोणाच्या भावना मी दुखावल्या असतील तर त्यासाठी मी क्षमा मागते.”