घर एक इवलसं, प्रेमाने थाटलेलं, सुख - दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं
घर एक इवलसं, प्रेमाने थाटलेलंसुख-दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं
घर एक इवलसं, प्रीती फुलांनी नटलेलं
नागमोडी वाटेवर एका वळणावर भेटलेलं
घर एक इवलसं, सुगरणीनं विणलेलं
विहिरीच्या संथ पाण्यावर टांगलेलं
घर एक इवलसं, मायेची ऊब दाटवलेलं
काडी-काडी एकमेकांसवे आधाराने साठवलेलं
घर एक इवलसं, अखंड तेज तेवलेलं
चिवचिवणार्या चोचीत रोज एक दाणा ठेवलेलं
घर एक इवलसं, विळख्यात काळाच्या हरवलेलं
पुन्हा पुन्हा मनाच्या वाळूत आठवणीनं गिरवलेलं