मज दिसत नाही चांदणे - मराठी कविता

मज दिसत नाही चांदणे, मराठी कविता - [Maj Disat Nahi Chandane, Marathi Kavita] घनघोर कोसळती या वसुंधरेवर, पर्जन्याचे झरे.

घनघोर कोसळती या वसुंधरेवर, पर्जन्याचे झरे

घनघोर कोसळती या वसुंधरेवर
पर्जन्याचे झरे
मज दिसत नाही चांदणे
मज दिसत नाही चांदणे

या वेलीवरती कोणी फेकले हिरे
हा वारा कसा स्वच्छंद होऊन फिरे
मज दिसत नाही चांदणे

आल्या धावत बघ या सरी
हसल्या त्या मंजिरी
नेसली धरेने हिरवी पैठणी
वासरू कसे हे बागडे
मज दिसत नाही चांदणे

अंबरी हे नृत्य ढगांचे
पायी लेवूनी पैजण विजांचे
नभी सजल्या मैफिलीतले
निसर्ग गातो अद्‍भूत गाणे
मज दिसत नाही चांदणे

काळोख असा हा थरारणारा
वार्‍यासंगे देइ शहारा
लपुनी पाहते हे नजराणे
मज दिसत नाही चांदणे
मज दिसत नाही चांदणे


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.