Loading ...

ज्येष्ठागौरीची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

ज्येष्ठागौरीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Jyeshtha Gaurichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक ज्येष्ठागौरीची कहाणी.

ज्येष्ठागौरीची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Jyeshtha Gaurichi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - ज्येष्ठागौरीची कहाणी


ज्येष्ठागौरीची कहाणी - आटपाट नगर होते, तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीला पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली.


आईला सांगितलं, “आई, आई, आपल्या घरी गौरी आण.” आई म्हणाली, “बाळांनो गौर आणून काय करू? तिची पुजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.” मुले तिथून उठली, बापाकडे आली “बाबा, बाबा, बाजारात जा.

घावनघाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील.” बाबानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवत नाही. गरिबीपुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं, म्हणून उठला, देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला, अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.

बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आंबिलीकरिता कण्या पाहू लागली, तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली.

त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली, सगळीजणं आनंदानं निजली. सकाळ झाली, तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली, “मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग.” म्हणून म्हणाली, “घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको. बायकोला हाक मारली, “अगं अगं ऐकलसं का? आजीबाईला न्हाऊ घाल” असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपातून गूळ मिळाला. सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.

म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. “उद्या जेवायला खीर कर” म्हणून सांगितलं, ब्राह्मण म्हणाला, “आजी, आजी, दूध कोठून आणू?” तशी म्हातारी म्हणाली, “तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितल्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नावं घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ.” ब्राह्मणानं तसं केलं.

गाईम्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसह धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं, दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली, तशी म्हातारी म्हणाली,“ मुला मुला, मला आता पोचती कर.” ब्राह्मण म्हणू लागला, “आजी आजी, तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसं होईल.” म्हातारी म्हणाली. “तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही.

ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच. आज मला पोचती कर.” ब्राह्मण म्हणाला, “हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा.” गौरीनं सांगितले, “तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, फडताळात टाक, गोठ्यात टाक. असं केलं म्हणजे कधी कमी होणार नाही.” ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे.

ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदकुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत संपत मिळेल.

ही साठा उत्तराची ज्येष्ठागौरीची कहाणी, पाचा उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची