गोपद्मांची कहाणी

गोपद्मांची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Gopadmachi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - गोपद्मांची कहाणी.
गोपद्मांची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Gopadmachi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - गोपद्मांची कहाणी

ऐका गोपद्मांनो, तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी पाची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजाताहेत, रंभा नाचताहेत, तो तुंबुऱ्याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या मेऱ्या फुटल्या. असे झाल्यावर सभेचा हुकूम झाला. "करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. गावात कोणी वाणवशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबुऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा." असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाही. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. " सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीपासून तीस तीन गोपद्म देवाच्या द्वारी काढावीत, तितकीच ब्राह्मणाचे द्वारी, पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणं पाच वर्ष करावं. उद्यापनाचे वेळी कुवारणीस जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, पाचव्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं." असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणं केलं. पुढं सभेत कळलं. सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात, तो तिनं वसा वसला आहे. पुढं येता येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या. तशाच रंभा नाचत्या केल्या.

जसं ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: प्रत्यकाने नेमधर्माने वागावे म्हणजे सुख मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.