कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति करूं तुजला
कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करू तुजला ।
नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ श्रु० ॥
त्रिशूळ डमरू शोभत हस्ती कंठि रुंडमाळा ।
उग्रविषाते पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळा ॥
तृतीय नेत्री निघती क्रोधे प्रळयाग्नीज्वाळा ।
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तू शंकर भोळा ॥ १ ॥
ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगी गौरी ।
जटा मुकुटी वासकरितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारी ।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरी ॥ २ ॥