पसायदान - मराठी अर्थासह

पसायदान - मराठी अर्थासह - [Pasaydan - With Marathi meaning] संत ज्ञानेश्वर रचित संपूर्ण मराठी अर्थासह पसायदान.
पसायदान - मराठी अर्थासह | Pasaydan - With Marathi meaning

संत ज्ञानेश्वर रचित संपूर्ण मराठी अर्थासहित पसायदान

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥

येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

- संत ज्ञानेश्वर


पसायदानाचा मराठीत अर्थ
  1. आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान (प्रसाद) द्यावे.
  2. दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांचे सत्कर्मे करण्यामध्ये स्वारस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो.
  3. पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.
  4. सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत.
  5. जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत.
  6. जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत.
  7. तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी.
  8. हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे.
  9. यावर विश्वेश्वर गूरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले.

लता मंगेशकर यांनी गायलेले पसायदान

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.