नाणी - महाराष्ट्र

नाणी, महाराष्ट्र - [Nani, Maharashtra] १८७६ साली सापडलेली चांदीची शिक्क्यांची नाणी ही महाराष्ट्रात सर्वात अगोदर सापडलेली नाणी

१८७६ साली सापडलेली चांदीची शिक्क्यांची नाणी ही महाराष्ट्रात सर्वात अगोदर सापडलेली नाणी

कोल्हापूरनजीक सिंही येथे १९७१ साली आणि सातारा जिल्ह्यात सुलतानपूर येथे १८७६ साली सापडलेली चांदीची शिक्क्यांची नाणी ही महाराष्ट्रात सर्वात अगोदर सापडलेली नाणी. पुढे १९४३ साली खानदेशात बहल येथे नाण्यांचा एक मोठा साठा सापडला. या तिन्ही साठ्यातील नाण्यांची अजून व्यवस्थित वर्गवारी झालेली नसल्यामुळे त्या नाण्यांचा काल निश्चितपणे ठरवता येत नाही. येथील नाण्यांवर बैल, हत्ती, हरीण, बेडूक, मासा व त्याचप्रमाणे झुडपे आणि मानवी आकृत्या अशी तऱ्हेतऱ्हची चित्रे आहेत. क्वचित काही नाण्यांवर वास्तुशिल्पकलेतील कमान किंवा वृषभसदृश प्रतीकांची चित्रे आढळतात. सुलतानपूरची चौकोनी व गोल नाण्यावरील चित्रे वृषभ आणि वर्तुळाच्या मध्यभागी दिलेल्या टिंबाने दर्शविले जाणारे चतुर्दल यासारखी आहेत.

या साठ्यात मिळालेल्या नाण्यांसारखीच नाणी महाराष्ट्रातील पुराणवस्तू उत्खननात सापडली आहेत. पैठणला सापडलेली नाणी अप्रसिद्ध आहेत व वृषभ आणि सूर्यप्रतीके असलेल्या अवघ्या दोन नाण्यांपुरता नेवासे येथील नाण्यांचा पुरावा मर्यादित आहे. दोन्ही नाणी तांब्याची असून एकाला चांदीचा मुलामा आहे व ते मौर्यकालीन असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात विपुलतेने सापडणाऱ्या नाण्यांपेक्षा महाराष्ट्रातील ही शिक्क्याची नाणी फारशी वेगळी नाहीत.

तांब्याची, साच्यातून काढलेली आदिवासी जमातींची नाणी तर याहूनही क्वचित सापडली आहेत. नेवाशाला चौकोनी आदिवासी नाणी मिळाल्याचे वृत्त आहे. ही नाणी दोन प्रकारची आहेत. एकावर उज्जैनचे प्रतीक वर्तुळामध्ये लहान लहान टिंबानी तयार केलेल्या गोलाकृती राजचिन्हासह फुली व दुसऱ्यावर उभ्या मानवी आकृती, तिहेरी टोके असलेले स्वास्तिक, सूर्याचे षडांगयुक्त चक्राकृती प्रतीक म्हणजेच सदरचक्र आणि वृषभसदृश आकृती चितारलेल्या आहेत. नेवाशाचे उत्खनन सन १९५४ व १९५६ या दरम्यान झालेले आहे.

[next] दक्षिणेचेपहिले सम्राट सातवाहन यांची नाणी महाराष्ट्रात नाशिक, नेवासे , कोल्हापूर, तेर, कऱ्हाड, पैठण, चांदा व तऱ्हाळे इ. अनेक ठिकाणी सापडली आहेत. सातवाहनानी मुख्यत्वे तांब, जस्त इत्यादी धातूंचा उपयोग केला असून, चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी (इ. स. १३० ते १५९), वसिष्ठीपुत्र शतकर्णी (इ. स. १५९ ते१६६) व गौतमीपुत्र श्री यज्ञ चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत. सातवाहन नाण्यांवर बैल, हत्ती व सिंह यासारख्या प्राण्यांच्या कोरलेल्या अक्षरांसहित आकृती एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला साधारणतः पार बांधलेले झाडा, मासा, वृषभ, नदी, नंदीपाडा व उज्जैन पद्धतीचे स्वस्तिक या प्रकारची चित्रे आहेत. सातवाहनकालीन नाण्यांच्या बाबतीत असे वाटते की शिक्का मारण्यासाठी वापरलेला साच्याचा आकार नाण्यांपेक्षा मोठा असावा. परिणामी चित्रे व अक्षरे अपुरी उमटली आहेत. चित्रे ठराविक ठशाची असली तरी मुद्दाम उल्लेख करण्याइतकी स्पष्ट आहेत. काही सातवाहन नाण्यांवर दोन डोलकाठींचे जहाज असून त्यावेळी समुद्रमार्गे व्यापार चालत होता त्याचा ती पुरावाच देतात.

वर जाड अक्षरे आहेत अशा साच्यातून काढलेल्या शिशाच्या अनेक जड कुरा नाण्यांवर (दुसरे शतक) एका बाजूला धनुष्यबाण व दुसऱ्या बाजूला पार बांधलेले झाड दर्शविले आहे. ही नाणी कोल्हापूर येथे व सातारा जिल्हयात नेर्ले येथे सापडली, वसिष्ठीपुत्र, गौतमीपुत्र व मदारीपुत्र (दुसरे शतक) या तीन राजांची ही नाणी असल्याचे उघड‍उघड दिसते. विलिवय्कुर हे उपपद लावून मातृवंशीय नांवे ते वापरतात. काही विद्वान त्यांना सातवाहनांचे मांडलिक मानतात तर इतर विद्वान त्यांना कुरा दिंवा अंकुरा राजघराण्याचे समजतात. कोल्हापूरला उत्खननात मिळालेल्या नाण्यांच्या अलीकडील अभ्यासावरून असे दिसते की कुरा हे प्रारंभीच्या सातवाहनाना समकालीन होते. ब्रह्मपुरी (कोल्हापूर) येथील साठ्यात अर्था, एक तृतीयांश व एक चतुर्थांश कापलेले अनेक कुरा नाणी मिळाली आहेत. चिल्लर नाणी म्हणून त्यांचा उपयोग होत असावा हे उघड आहे.

महाराष्ट्राच्या काही भागावर चुटु राजघराण्याने राज्य केले असावे (दुसरे शतक). त्यांची नाणी शिशाची असून त्यावर एक बाजूला एकामागे एक असे तीन डोंगर व दुसऱ्या बाजूवर पार बांधलेले झाड आहे. ही नाणी बहुतांशी महाराष्ट्राचा सीमेजवळच्या प्रदेशाअ सापडली आहेत. कोल्हापुरला मिळालेली शिशाची नाणी कुरा नाण्यांशी मिळतीजुळती आहेत. कारन त्यांच्यावरली चित्रे तीच आहेत.

[next] महाराष्ट्रात फारच क्वचित क्षत्रप आणि क्षहराट नाणी सापडली आहेत. क्षहराट कुळातील व शक राजघराण्यातील नहपना (इ.स. ११०-१२४) या राजाची, जोगळथंबी येतील साठ्यात १९०५ साली मिळलेली १३,२७० चांदीची नाणी सोडता इतर काहीही साठे सापडलेले नाहीत. गौतमीपुत्र शतकर्णी (इ.स.१०६-१३०) या सातवाहनाच्या सुप्रसिद्ध राजान नहपना या समकालीन शक राजकर्त्याला ठार मारून त्याचा मुलुख काबीज केल्यावर त्याची चांदीची नाणी पुन्हा पाडली असावी हे याचे एक कारण असू शकेल.

इसवी सनाच्या पहिल्या तीन शतकात दक्षिणेच्या बंदरांतून रोमबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित झाले आणि कदाचित त्यांचा दागिने म्हणूनही उपयोग करण्यात आला. कोल्हापूर, नेवासे, तेर, पैठण व कोंडापूर येथेही अशी नकललेली नाणी सापडली आहेत, ही नाणी भोके पाडालेली व गोल आकाराची असुन त्यांच्यावर ठिपक्यांच्या किनारीमध्ये राजाचे मस्तक व त्याचप्रमाणे रोमन देवता चित्रीत केलेल्या असत. टायसेरिय्सच्या काही नण्यांची नक्कल करणारी खूप नाणी सापडली आहेत.

सातवाहनाच्या अस्तानंतर लवकरच त्रैकूटक ( इ.स. तिसरे शतक ) प्रसिद्धीस आलेले दिसतात. महाराज इंद्रदत्त हा माहित असलेला पहिला त्रैकूट राजा असून त्याच्या नावाचा उल्लेख त्याचा मुलगा महाराज धरसेन याच्या नाण्यावरील अक्षरात आहे. त्रैकूटक नाण्यांचे पश्चिम क्षत्रप नाण्यांशी पुष्कळ साम्य आहे.

[next] इ. स. ६०० ते १५०० या मध्ययुगीन काळातील अस्थिरता व या भागातील राजकीय उलथापालथ यामुळे पाचव्या शतकानंतरचा फारच थोडा नाणेविषयक पुरावा मोळतो असे मानण्यास जागा आहे. अलीकडेच कलचुरी राजा कृष्णराज( सहावे शतक ) याची काही नाणी घारापुरीला सापडली आहेत. या प्रदेशावर राज्य केलेल्या श्रेष्ठ राष्ट्रकूटानीसुद्धा नाणी मागे ठेवलेली नाहीत. देवगिरीच्या यादवांनी ( बारावे व तेरावे शतक ) भावी पिढ्यांकरता काही शिक्क्यांची सुवर्ण पद्मांतके मागे ठेवली आहेत. शिक्क्यांवरची चित्रे सिंह, देवता, श्री, शंख, कमळ अशी प्रतीके असून शिवाय देवनागरी अक्षरे आहेत.

नवव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत दख्खन व उत्तर राज्य केलेल्या शिलाहारांची नाणी कोल्हापूर व जवळपासच्या प्रदेशात सापडतात. सोन्याप्रमाणे त्यांनी चांदीचाही नाणी चालू केली होती. परंतु एवढी माहिती संपूर्ण अभ्यासात पुरेशी नाही.

देवगिरी (दौलताबाद) जिंकल्यावर खिलजी घराण्याच्या उल्लाउद्दिन महम्मद शहा (इ.स. १२९६-१३१६) याने त्या शहरात नाणी पाडली. महम्मद बिन तुघ्लक (इ.स. १३२५-१३५१) याने कुतुबाबादच्या नावाने देवगिरी येथून इ.स. १३२५-१३२७ मध्ये नाणी सुरू केली. पुढे इ.स. १३२७ मध्ये देवगिरी हे नाव काही काळ नाण्यांवर दिसू लागले, इ,स. १३२८ मध्ये त्याचे पुन्हा दौलताबाद करण्यात आले. नंतरच्या राज्यकर्त्यानी सुरू केलेल्या अनेक नाण्यांवर दौलताबाद टाकसाळ अनेकदा दिसते.

[next] औरंगजेबानंतरच्या (इ.स. १६५८ते१७०७) नाणेविषक तिहास फार गोंधळाचा आहे. अनेक नाण्यांवर मोगल राज्यकर्त्यांची नावे असली तरी ती नाणी त्यांनी सुरू केलेली नाहीत. मोगल टाकसाळी मिळून जवळपास २०० टाकसाळीत मोगल राज्यकर्त्यांच्या नावे नाणी पाडली जात होती.

या नाण्यांवरून लक्षात येणाऱ्या महाराष्ट्रातील काही टाकसाळि म्हणजे औरंगाबाद, बालनगर, बलवनतनगर, चांदोर, चिंचवड, दौलताबाद, दिलशदाबाद, काल्पी, कंकोर्ती, कोल्हापूर, खुजिस्ता बुनयाद (औरंगाबाद), मुहियाबाद (पुणे), मुंबई, संगमनेर, सातारा, आणि सोलापूर येथील होत.

दुसरा महम्मद शहा (इ.स.१६५६-१६७२) याने दक्षिणेत प्रचलित असणाऱ्या चलनापेक्षा अगदी वेगळे चांदीचे चलन सुरू केले. ते मूळचे परदेशी नाणे. त्याला लारिन असे म्हणत. पर्शियाच्या आखाताच्या वरच्या बाजूत असलेल्या लार परगण्यात हे चलन प्रथम प्रचलित झाले आणि दर्यावर्दी अरब व्यापाऱ्यांमध्ये ते फार लोकप्रिय होते. प्रत्येक लारिन केसातील पिनेप्रमाणे मध्यभागी वाकवलेला केवळ एक चांदीचा तुकडा किंवा तार असे. अक्षरांसाठी लारिनवर फारच थोडा पृष्ठभाग असे. तरीसुद्ध, त्यापैकी बहुतेकांवर एका बाजूला सुलतान आदिल शहा आणि दुसऱ्या बाजूवर झर्ब लारि डांगि (किंवा दाबूल) सान हा मजकूर असे. कदाचित किनारपट्टीची पैशांची मागणी पुरवण्यासाठी ही नाणी पाडली गेली असावीत. १९१९ साली रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथे ३५९ चांदीच्या लारिनचा साठा सापडला.

[next] छत्रपती शिवाजी (इ.स. १६२७-१६८०) आणि त्यांचे वंशज यांनी सोन्याची व तांब्याची नाणी सुरू केली. त्याचप्रमाणे दक्षिणेत तंजोर येथे स्थापित झालेल्या व्यंकोजीच्या-शिवाजीच्या भावाच्या- वंशाचे ही नाणी सुरू केली. शिवाजीच्या नाण्यांवर एका बाजूला नागरी लिपीत छत्रपती व दुसऱ्या बाजूला श्री राजा शिव असे शब्द आहेत. होन म्हणून ओळख्ली जाणारी हीनाणी दुर्मिळ आहेत. सभासदाच्या बखरीमध्ये शिवजीच्या खजिन्याचा घेताना ३२ प्रकारच्या सोन्याच्या नाण्यांचा आणि ६ प्रकारच्या चांदीच्य नाण्यांचा उल्लेख आहे भरपूर प्रमाणात सापडणाऱ्या तांब्याच्या नाण्यांवरही तीच अक्षरे आहेत. शिवाजीच्या वंशजांच्या नाण्यांवर एका बाजूला ‘छत्रपती’ हे बिरुद कायम ठेवलेले असून दुसऱ्या बाजूला श्री राजा शाहू किंवा श्री सरभराजा असे शब्द आहेत.

इ.स. १७१३-१८१८ मध्ये महाराष्ट्राचा कारभार चालवणारे पेशवे त्या भागाचे प्रत्यक्षतः राज्यकर्तेच होते. मोगल नाण्यांच्या धर्तीवर त्यांनी चांदीची नाणी सुरू केली आणि त्यावरील मोगल राज्यकर्त्यांची नावे मोगल व पेशव्यांच्या प्रतीका समवेत कायम ठेवली. ही नाणी मुख्यतः मुहियाबाद (पुणे) इथली आहेत. इतर अनेक टाकसाळीतही मराठ्यांनी नाणी पाडली. पेशव्यानी सुरू केलेल्या तांब्याच्या नाण्यांची छाननी पूर्ण व्हायची आहे. पेशव्यांच्या काळात सोनाराना नाणी पाडण्यासाठी परवाने देण्यात आले. पखान्याचे शुल्क म्हणून प्राप्तीतला काही भाग सरकारत भरायचा असे. नाणिइ पाडण्याचा नेहमीचा मोबदला दर हजारी सात नाणी. सरकारला सहा व टाकसाळीच्या व्यवस्थापकाला एक असा असे. पेशव्यांच्या अमदानीत काही इलाख्यातील जमीनदारानी स्वतःच्या टाकसाळी सुरू करून बनावट नाणी पाडली.

इंग्लंडचा दुसरा चार्ल्स याच्याबरोबर पोर्तुगालची राजकन्या ब्रॅगन्झाची कॅथरिन काळात (इ.स. १५३९-१५४५) सुरू केलेल्या मोगल धर्तीच्या रुपयाला सदृश अशी व दुसरा जेम्स आणि विल्यम आणि मेरी यांच्या राज्यारोहण सालांची नाणी प्रयोग म्हणून सुरू करण्यात आली. पण ती लोकप्रिय न ठरल्याने मागे घेण्यात आली. युरोपीय धर्तीची नाणी मुंबईत १७१७ सालापर्यंत पाडली जात होती. १७१७ ते १७७८ पर्यंत मोगल तऱ्हेचा मुंबईचा रुपया हे पश्चिम भारतीय व्यापाराने मुख्य चलन होते. १८१५ साली ईस्ट इंडिया कंपनीने सर्व टाकसाळ काम सुरतेहून मुंबईला हलवले. चवथ्या विल्यमच्या कारकीर्दीपासून (१८३५) ते सहाव्या जॉर्जच्या कारकीर्दीपर्यंतच्या अव्वल इंग्रजी अम्मलातील नाण्यांची विभागणी दोन भागात करता येईल. इ,स, १८३५ ते १८५८ (१८६२) पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली पाडलेली नाणी, आणि १८६२ ते १९४७ पर्यंत बादशहाच्या आधिपत्याखाली पाडलेली नाणी.

[next] चवथ्या विल्यमच्य रुपयाची चलनी किंमत इंग्रजी, बंगाली, फारशी व देवनागरी अक्षरात मागल्या बाजूला लिहिलेली असे. १८३५ ते १८४० या काळातल्या रुपयांवर १८३५ हेच साल होते, व्हिक्टोरिया राणीची प्रतिमा असलेल्या नाण्यावर मस्तकाचे दोन प्रकारचे रेखाटन एका बाजूवर असणारी नाणी होती व त्यांना टाईप १ व टाईप २ म्हणते. पहिल्या प्रकारच्या नाण्यांवर त्य बाजूवर एकसंध अक्षरे होती. ही नाणी १८४० ते १८५१ या काळात सुरू केली होती तर १८५० ते १८६२ या काळात सुरू केलेल्या नाण्यांवर त्याच बाजूवर विभागलेली अक्षरे होती. १८६२ साली पाडलेले रुपये त्यावरील साल न बदलता १८७४ पर्यंत पाडले जात होते. १८८३ साली टाकसाळीत नाणे पाडल्याचे अचूक वर्ष दाखवण्यासाठी साच्यावर टिंबे किंवा मणी भरीला घालण्याची पद्धत मुंबई टाकसाळीने अवलंबिली.

ईस्ट इंडिया कंपनीने काही काळ मोगल नाण्यांच्या नकला केल्या. त्याल कायदेशीर स्वरूप देण्याकरता १६८६ साली दुसऱ्या जेम्सकडून तद्देशीय नाण्यांच्या नकला करण्याची त्यंनी परवानगी मिळवली. फार आग्रहांनतर फरुखसियार या मोगल राजाने (इ.स. १७१३ ते १७१९) १७१७१ साली आपली नाणी मुंबईत पाडण्याला कंपनीला सम्मती दिली. देव्हापासून १७७४ पर्यंत मोगल राजांच्य़ा नावाची मुंबईच्या टाकसाळीचे नाव धारण करून बाहेर पडत होती.

१८३५ सालच्या चलनविषयक सुधारणेप्रमाणे ठराविक वजनाचा, आकाराचा व शुद्धतेचा रुपया हे ब्रिटिश सत्तेखालील सबंध भारताचे एकमेव चलन झाले. एकूण १८० ग्रेनपैकी १६५ गेन शुद्ध चांदी असणारा असा हा कंपनीचा रुपया होता. या वेळेपासून तीस रुपये किमतीची दुप्पट मोहोर, १५ रुपये किमतीची मोहोर, दहा व पाच रुपये किमतीची सोन्याची नाणी व रुपया, अधेली (अर्धा रुपया) व पावली (पाच रुपया) या चांदीचा नाण्यावर एका बाजूला चौथ्या विल्यम राजाची ( इ.स.१८३०-१८३७) प्रतिमा व नाव दिसू लागले. सोन्याच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सिंह, नारळाचे झाड व चलनी इमत इंग्रजी व फारशी लोपीत कोरलेली असे. चांदीच्या नाण्यांची चलनी किंमत पुष्पमालेच्या आत दर्शवणारा जात असून ईस्ट इंडिया कंपनीचे नाव व तारीखही असे.

[next] चौथ्या विल्यमनंतर त्याची भाची व्हिक्टोरिया १८३७ साली राणी व्हिक्टोरिया (इ.स. १८३७-१९०१) म्हणून गादीवर आली इंग्लंडहून नवे साचे आणण्यात विलंब झाल्यामुळे तिच्यानावाची नाणी १८४० पासून प्रचारात आली. व्हिक्टोरिया राणीचे रुपये दोन प्रकारचे होते. मुकटविरहित मस्तक दर्शवणारा रुपया१८४० पासून सुरू झाला, व वक्षापासून मस्तकापर्यंत मुकुटधारी प्रतिमा असणारा, १८६२ पासून सुरू झाला. १ जानेवारी १८७७ रोजी राणीने एम्प्रेस ऑफ इंडिया किंवा ‘भारताची सम्राज्ञी’ हा किताब धारण केला.

तिचा मुलगा सातवा एडवर्ड (इ.स. १९०१ ते१९१०), नातू पाचवा जॉर्ज (१९१०-१९३६) , पणतू आठवा एडवर्ड (१९३६) आणि सहावा जॉर्ज (१९३७-१९५३) हे सर्व तिचे वारस होते. आठव्या एडवर्डच्या नावाचा रुपया सुरू झाला नाही.

पैसा, ढबू पैसा आणि पै ही तांब्याची नाणी या नाण्यांबरोबर सुरू करण्यात आली. तांब्याच्या नाण्यांच्या एका बाजूवर तारखेबरोबर कंपनीची मुद्रा आणि तारिख असे. नण्यांची चलनी किंमत फारशी व इंग्रजी मोपीत पुष्पमालेच्या आतमध्ये कोरलेली असे व नाण्यांच्या कडेने ईस्ट इंडिया कंपनीचे बोधचिन्ह असे. सन १८४१ साली दोन आण्याचे (चवली) नवे चांदीचे नाणि सुरू करण्यात आले. १९०६ किंवा १९०९ साली षटकोनी आकाराचे निकलचे नवे एक आण्याचे नाणे सुरू करण्यात आले.

[next] चांदीची अधेली, पावली व चवली ही नाणी १९१८ साली बंद करण्यात येऊन त्याऐवजी तांबे-निकल मिश्र धातूची नाणी सुरू झाली. पण तांबे-निकल मिश्रणाची अधेली १९१९ साली व पावली १९२१ साली बंद झाली व ती नाणी पुन्हा चांदीची पाडण्यात येऊ लागली. तांबे-निकल मिश्रणाची चवली व एक आणा ही नाणी बंद करून त्याऐवजी अ‍ॅल्युमिनियम व ब्रॉन्झ या मिश्रणाची नाणी १९४२ साली सुरू होऊन १९४६ पर्यंत चालली. चांदीच्या तुटवड्यामुळे १९४५ साली चांदीची नाणी बंद करून१९४६ सालापासून तांबे-निकल मिश्रणात सुरू झाली. पितळ-निकल मिश्रणाचि नवे अर्ध्या आण्याचे नाणे १९४२ साली सुरू झाले. मध्यभागी भोक असलेला नवा पातळ नवा पैसा १९४३ साली सुरू झाला. इंग्रजी अमदानीतली रानी व्हिक्टोरियपासून सहाव्या जॉर्जपर्यंतची नाणी १९४७ पर्यंत पाडली गेली आणि भारत स्वतंत्र झाल्यावर ती पाडण्याचे थांबवण्यात आले.

- भा. वें. शेट्टी


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.