Loading ...
/* Dont copy */ body{user-select:none;-moz-user-select:none;-ms-user-select:none;-khtml-user-select:none;-webkit-user-select:none;-webkit-touch-callout:none} pre, code, kbd, .cmC i[rel=pre]{user-select:text;-moz-user-select:text;-ms-user-select:text;-khtml-user-select:text;-webkit-user-select:text;-webkit-touch-callout:text}

आजकालचे वाङ्मय - महाराष्ट्र

आजकालचे वाङ्मय, महाराष्ट्र - [Aajkalche Vangmay, Maharashtra] ज्ञानेश्वरी (१२९३) ही सर्वात तेजस्वी साहित्यकृती होय.

आजकालचे वाङ्मय - महाराष्ट्र | Aajkalche Vangmay - Maharashtra
हरी नारायण आपटे, वि. स. खांडेकर, इंदिरा संत (छायाचित्रे: मराठीमाती आर्काईव्ह).

ज्ञानेश्वरी (१२९३) ही सर्वात तेजस्वी साहित्यकृती होय

मराठी साहित्याचा उगम जणू धुक्यात लपेटलेला आहे. तेराव्या शतकाच्या शेवटच्या दोनतीन दशकांत हे धुके निवळू लागते आणि तेजस्वी साहित्यकृती दृश्यमान होऊ लागतात. ज्ञानेश्वरी (१२९३) ही त्यांच्यातील सर्वात तेजस्वी साहित्यकृती होय. मात्र, ज्ञानेश्वरी ही काही सर्वात प्राचीन रचना नव्हे. अद्वैत तत्वज्ञान विस्तृत पद्यमय स्वरूपात प्रतिपादन करणार मुकुंदराजांचा विवेकसिंधू, महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांच्या जीवनातील घटनाप्रसंगाचे कथन करणारा माहिमभट्टाने रचलेला गद्यग्रंथ लीळाचरित्र, विवाहरप्रंसगी गायिलेल्या गाण्यांतून सिद्ध झालेले महानुभवी कवयित्री महदंबा हिचे धवळे यांच्यापैकी एखाद्या रचनेकडे आद्यत्वाचा मान जाऊ शकेल. या रचनांतून दिसणारा ग्रंथकारांचा आत्मविश्वास आणि प्रगल्भपणा असे सुचवतात की या आधीसुद्धा काही ग्रंथरचना झाली असली पाहिजे. या दिशेने शोध घेताना काही प्रयत्नांचा मागोवा लागतो. उदाहरणार्थ, हालाराजाची गाथासप्तशती (तिसरे शतक). दोन दोन चरणांच्या सुमारे हजारभर कवितांच्या या गाथेत महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचे जिवंत दर्शन घडते. मराठीची निकटची पूर्वभाषा असलेल्या महाराष्ट्री प्राकृत भाषेत गाथासप्तशती रचलेली आहे. आपण असे अनुमान करू शकतो की येथील लोकांच्या आत्माविष्कांराच्या प्रेरणेत सातत्य असले पाहिजे, आणि त्यामुळे मराठी भाषेच्या आरंभीच्या दीर्घ आणि अप्रकाशित कालखंडातही साहित्यरचनेचे काही प्रयत्न निश्चितच झाले असले पाहिजेत.

"लाखो लोकांच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ अभिजात साहित्यकृती आहे" बौद्धिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी स्वरूप असणाऱ्या ज्ञानेश्वरी पासूनच चारशे वर्षांच्या उज्ज्वल संतकविता परंपरेचा आरंभ होतो. संतत्व आणि मनुष्यत्व लौकिक आणि पारलौकिक यांचा बव्हंशी समन्वय साधणाऱ्या संतकवितेत पुष्कळ विविधता आहे; आणि ती कोणत्याही संकुचित संप्रदायाशी जखडलेली नाही. या समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संत तुकारामाचे (१६०८ ते१६५०) अभंग. त्यांच्यांत एकाच वेळी, साक्षात्कारी अनुभवाची उत्कटता, अन्याय आणि ढोंगीपणाचा औपरोधिक उच्छेद आढळून येतात. महाराष्ट्रातील हा भक्ती-पंथ म्हणजे त्या काळी सर्व देशभर अवतरलेल्या भक्तीभावनेचे एक संघटित रूप होते. या भागवत-पंथाची काही खास वैशिष्ट्ये होती : त्यात व्यक्तिगत मोक्षाला स्थान नव्हते. हा पंथ खऱ्या अर्थाने विशाल दृष्टीचा आणि सहिष्णू होता. धर्म आणि जातीभेदांना पंथात स्थान नव्हते. ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत आणि अगदी मुस्लिमापर्यंत समाजातील सर्व वर्गांचे प्रतिनिधी या पंथात आढळतात. या आध्यात्मिक लोकशाहीतून सामाजिक लोकशाहीचे प्रवर्तन झाले नाही हे खरे; तरीसुद्धा सामाजिक जीवनाच्या काही क्षेत्रांत तिचा थोडाबहुत शिरकाव झाला असला पाहिजे.

सतराव्या आणि अठराव्या शतकांत उत्कर्षाला पोहोचल्या पंडिती काव्याचे येथील समाजजीवनाशी काही अर्थपूर्ण नातेच नव्हते. पंडिती काव्याला आधार होता पुराणांचा, आणि त्यात वृतरचनेच्या आणि अलंकार योजनेच्या इतक्या करामती होत्या की त्यामुळे त्या काव्याचे आवाहन मर्यादित झाले : ते केवळ प्रतिष्टितांच्या करमणुकीचे साधन होऊन बसले. शृंगाररसात्मक लावणी आणि वीररसात्मक पोवाडा हे लोककलाप्रकार जनसामान्यांची करमणूक करत होते. पोवाड्यातील वीररस बहुधा ढोबळ तर लावणीतील शृंगाररस सहसा भडक होता. दोन्ही काव्यप्रकारात एक खुला जोरकसपणा होता; तो बंदिस्त काव्यप्रकारात सामावण्यासारखा नव्हता काव्यातील हा भेद समाजातील भेदाशी समांतर होता या दोघांच्याही आरोग्याला सारखाच बाधक होता. या काळात गद्य एकूण कमीच होते. जे होते ते विशिष्ट मर्यादित हेतूंसाठी लिहिले जात होते. पण त्यामुळे त्यात साहित्यिक डौलीपणा नव्हता. त्यातील सर्वोत्कृष्ट गद्य, बखरीत आणि दरबारी पत्रव्यवहारात हरवून गेले आहे.

आधुनिक मराठी साहित्याचा आरंभ:

१८१८ साली सुरू झालेल्या ब्रिटिश अंमलाबरोबर एका व्यापक परिवर्तनालाही सुरुवात झाली. सर्वांसाठी उपलब्ध असलेली नवी शिक्षणपद्धती हे या परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन ठरले. पिढ्या न्‌ पिढ्यांच्या जाचक निर्बंधाची जाणीव आणि नवकल्पनांचा ओघ यांतुन वातावरणात एक खळबळ उदभवली. व्यक्तीला आपल्या अस्मितेची ओढ लागली. यासाठी जुनी व्यवस्था झुगारणे आवश्यक झाले. राजकीय स्वातंत्र्याचे आवाहन अत्यंत व्यापक होते. जीर्ण झालेल्या समाजव्यवस्थेचा पुनर्बांधणीच्या प्रयत्नांविरुद्ध उभे ठाकणाऱ्यांनी या आवाहनाचा लाभ उठवला. सुधारक आणि परंपराभिमाने यांच्यातील अटीतटीच्या संघर्षामुळे वाङ्‍मयीन वातावरणात अभूतपूर्व चैतन्य उसळून आले.

१८८५ साली, काव्याचा क्षेत्रात क्रांती करणाऱ्या केशवसुतांचे पहिली कविता आणि उदारमतवादी कादंबरीकार हरी नारायण आपटे यांची पहिली साहित्यकृती या प्रसिद्ध झाल्या. आधुनिक मराठी साहित्याची ही सुरुवात. युक्तिवादी वा वादविवादी गद्याचा, विशेषतः पत्रकारितच्या क्षेत्रात, उपयोग करण्यात परंपरभिमानी अधिक क्रियाशील आणि प्रभावी होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपले राजकीय वजनच नव्हे तर समर्थ लेखणीसुद्धा या कामी राबवली. परंपराभिमान्यांना युक्तिवादात कदाचित सुधारकांवर मात करता आली नसेल; परंतु लोकमतांचा पाठिंबा त्यांनाच अधिक मिळाला. या दोहोंतील भेदरेषा नेहमीच स्पष्ट आणि ठळक होती असे नाही. कितीतरी लेखकांचा थोडा येथे, थोडा तेथे, असा वावर असे. राम गणेश गडकरी ज्यांची जन्मशताब्दी या वर्षी साजरी होत आहे त्यांनी कवी आणि नाटककार म्हणून असीम लोकप्रियता मिळवली इतिहासाने कादंबरीकाराला सोयिस्कर पळवाटा उपलब्ध करून दिली होती. नाटककाराला तर इतिहासाच्या जोडीला दंतकथाही होत्या. : पुनरुज्जीवनवादी चित्रणासाठी या दोन्ही गोष्टी सोयिस्करपणे धूसर होत्या. हळूहळू सुधारणावादी चळवळ मावळत गेली. तिचा वाङ्‍मयीन आविष्कारासुद्धा, साखरी स्वप्नरंजनामुळे आणि चिल्लर गोष्टींनाच बंडखोरी कृत्य मानणाऱ्या प्रयत्नामुळे, क्षीण होत गेला. वैविध्यासाठी मधूनच योजलेले नखरेल ग्रामीण प्रसाधन सोडले तर या वाङ्‍मयीन घडामोडी शहरी मध्यम वर्गाच्या वर्तुळातच घडत होत्या. वाचकांचे समाधान होत होते; करमणुक होत होती; आणि थोडे उन्नयनसुद्धा. या सर्वसामान्य सुमारपणापलीकडे असलेले काही लेखक होते; परंतु लक्षणीय प्रभाव करण्याच्या दृष्टीने ते फार मोजके होते.

स्वातंत्र्यत्तर काळातील परिवर्तन

१९४०-४५ पर्यंत अशी स्थिती राहिली. १९४७ हे वर्ष मात्र वेगळे मानले पाहिजे. या साली प्रसिध्द झालेल्या बा. सी. मर्ढेकर यांच्या काही कविता या छोट्याशा कवितासंग्रहाने मराठी वाङ्‍मयात क्रांती केली. प्रस्थापित निर्जीव काव्यसंकेतांना झुगारून या कवितांनी, आशय आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत, नवा मार्ग शोधला. गंगाधर गाडगीळ, पु.भा. भावे, अरंविद गोखले, व्यंकटेश माडगूळकर यांच्या शोधक प्रयत्नांमुळे कथेच्या क्षेत्रात कवितेला पूरक चलनवलन चालू झाले. या परिवर्तनामुळे स्वातंत्र्याच्या आणखी शक्यता खुल्या झाल्या. नवतेला सुरुवातीला झालेला विरोध हळुहळू क्षीण झाला,आणि अल्पावधितच, अधीचा वाचक पिढ्यांना रिझवणाऱ्या कितीतरी गोष्टी शिळ्या होऊन गेल्या. मात्र नवसाहित्याची चळवळ आणि राजकीय स्वातंत्र्य यांचा काळ एकच असावा, हा निव्वळ योगायोग होता. प्रस्थापित साहित्यिक विधिनिषेधांबद्दलचे असमाधान काही वर्षांपासून आतल्या आत खद्खद्त होत. त्यातूनच बंडखोर लेखन उसळले. दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामांमुळे या लेखानाची जणू निकड उत्पन्न झाली होती. जुन्या ठाम समजुती ढासळल्या; इतकेच नव्हे तर काही नव्या तोडग्यांचासुद्धा भरवसा वाटेना. केवळ तंत्राच्याच बाबतीत नव्हे तरे स्वभाव , दृष्टिकोन आणि हेतू यांच्या बाबतीतसुद्धा या नव्या लेखकात मोठी विविधता होती. तरीसुद्धा या सगळ्यांनी नव्या, न मळलेल्या वाटांचा शोध घेतला आणि निकोप आणि संपन्न जाणिवेची जोपासना केली.

उदाहरणार्थ, मर्ढेकरांची कविता भोवतालच्या जगाबद्दलच्या प्रतिक्रियांतून उद्‍भवली होती, तर पु. शि. रेग्यांची कविता स्वतःच्या वैयक्तिक संवेदनाविश्वातच गढून गेली होती. वैचारिकता हा मर्ढेकरांच्या कवितेतील महत्त्वाचा घटक. रेग्यांची कविता त्याला आपला मानत नाही, या दोघांनी कमी अधिक प्रमाणात, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, व सदानंद रेगे या कवींना प्रभावित आणि प्रेरित केले, आणि बा. भ. बोरकर , इंदिरा संत यांच्यासारख्या जुन्या कवींना नवचेतना दिली.

ही विविधता कथेतही आढळते. नवकथेच्या प्रवर्तकांनी, दि, बा. मोकाशी, के. ज. पुरोहित (शांताराम), वसुंधरा पटवर्धन यांच्यासारख्या कितीतरी लेखकांचे सुप्त सामर्थ्य जागे केले. या बदलत्या साहित्यिक वातावरणाला, इतर वाङ्‍मयप्रकारांकडून प्रतिसाद मिळायला काही काळ जावा लागला. हळूहळू प्रगल्भ होत गेलेले कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांनी मानवी नातेसंबंधांतील वास्तव्याचा ‘नव्या’ जाणीवेने शोध घेतला. गो. नी. दांडेकरसुद्धा एरवी तसे जुन्या वळणाचे; पण त्यांनी सुद्धा, अधूनमधून जीवनदर्शनाची जाण प्रगट केली. दैवयोगाने एका प्रवासात जवळ आलेली जर्मन-ज्यू तरुणी आणि भारतीय तरुण यांच्या संबंधांची कथा बेडेकरांनी १९३९ साली प्रसिद्ध झालेल्या रणागंणमध्ये सांगितली होती. त्यातील त्या अपवादात्मक आणि चमत्कारीक आधुनिकतेकडे १९५० पर्यंत, कसे कुणास ठाऊक, दुर्लक्षच झाले होते.

नव्या जाणीवेची पहिली चाहूल नाट्याच्या क्षेत्रात, १९५० ते१९६० या दशकाच्या मध्यास, विजय तेंडुलकरांच्या आरंभीच्या लेखनातून, नाना जोगांच्या एकदोननाटकांतून, पु. ल. देशपांड्यांच्या तुझे आहे तुजपाशी या चमकदार उपहासप्रधान नाटकातून लागली. विजय तेंडुलकरांना पुढे नाटककार म्हणून कोठी मान्यता मिळाली. अकाली मृत्यूमुळे नाना जोग त्यांच्याविषयीच्या अपेक्षा पुऱ्या करू शकले नाहीत. नट, नाटककार, दिग्दर्शक म्हणून पु. ल. देशपांड्यांनी पुढे महत्त्वाची कामगिरी केली. या मंडळीच्या प्रयत्नामुळे निःसत्व झालेल्या मराठी रंगभूमीला नवे अवसान आले, आणि ती नवे नवे प्रयोग करायला उद्युक्त झाली.

आधुनिकतेला पुनर्जीवन आणि सद्यःकालीन मराठी साहित्य

काव्य

आधुनिकतेच्या चळवळीला नवी प्रेरणा आणि नवी चेतना १९६० च्या सुमारास लाभली हा एक भाग्ययोग मानला पाहिजे; कारण याच साली मराठी भाषिक महाराष्ट्राची स्थापना झाली. याच साली प्रसिद्ध झालेल्या कविता या दिलिप पुरुर्षोत्तम चित्रे यांच्या पहिल्याच कवितासंग्रहात हे नवे वळण दिसते. या वळणावर, त्या आधीच्या काळापेक्षा अधिक वाङ्‍मयप्रकारांतून परिवर्तनाच्या खुणा स्पष्ट दिसू लागल्या. या नव्या उन्मेषांत अधिक धिटाई होती, अधिक विविधता होती.

या आधीपासून कविता लिहिणाऱ्या पु. शि. रेग्यांच्या कवितेने आपली वैयक्तिकता जपण्याचा स्वभाव सोडला नाही. या कवितेत काळ जणू ठप्प झालेला भासतो. मात्र, बदलत्या वातारणाला चपळ प्रतिसाद देणाऱ्या विदा करंदीकारांच्या कवितेने, गझलसारख्या तरल किंवा विरूपिकेसारखा कणखर रुपबंध नव्याने समर्थपणे आविष्कृत केला. परंपरेने सुंदर आणि शिव मानलेल्या गोष्टींतील भेसूरपण औपहासिकपणे दाखविणाऱ्या करंदीकरांच्या विरूपिकांनी हळव्या वाचकांना चांगलेच अस्वस्थ केले. या काळात मंगेश पाडगावकरांनी उपहासाचा नवा सूर आपल्या कवितेवर चढवला. मग ती कविता, सामजिक आणि राजकीय भ्रष्टाचारावर उघड आणि भेदक टीका करू लागली. नारायण सुर्व्यांच्या उपहासप्रधान कवितांना डाव्या विचारसरणीची गडद डूब आहे. परंतु तिच्या लोकप्रियतेशी राजकीय रंगाचा काही संबंध नाही. नारायण कुळकर्णी, कवठेकरांसारख्या काही तरूण कवींनीसुद्धा या काळात उपहासप्रधान कविता लिहिली. उपहास सहसा उघड असतो. उपरोध हा आधुनिकतेचा एक प्राणविशेष मानला जातो. मर्ढेकर आणि गंगाधर गाडगीळ यांच्या लेखनात तो दिसतो. परंतु त्यांचा पिढीतील पुष्कळ लेखकांच्या साहित्यात लक्षणीय स्वरूपात तो आढळत नाही. साठनंतरच्या काळात मात्र. कधी अस्पष्टपणे कधी स्पष्टपणे , उपरोधाचा अवलंब सातत्याने केलेला आढळतो. दिखाऊपणाबद्दल अधिक संशय बाळगाणाऱ्या, भोळ्या स्वप्नरंजनाला पार विटलेल्या आणि भाषणबाजीने बिथरलेल्या, अशा कालस्वभावाचाच तो उपरोध द्योतक आहे असे वाटते.

आधीच्या पिढीतील (१९४७ ते १९६५ आसपासच्या) बा. भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत यांच्या कवितेवर कालगतीने बदललेल्या भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव पडला नाही. मात्र, त्यांची भावविभोर कविता नव्या काळात अधिक गहिरी जरूर झाली. आत्मनिष्ठा आणि तत्वनिष्ठा यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या कवितेबद्दल हे खरे आहे. कवी वसंत बापटांबद्दल मात्र असे म्हणता येत नाही. त्यांची कविता अधून मधून भावकवितेची वाटा सोडून औपरोधिक टीकेकडे किंवा वेगळ्या विषयांकडे वळते. सदानंद रेग्यांच्या कवितेला नवा युगधर्म आधीच दिसला होता. विक्षिप्त कल्पनांचा आधार घेणारी आणि शाब्दिक आणि भावनिक प्रसाधन झुगारून कमालीचा साधेपणा अंगिकारणारी सदानंद रेग्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म तरल आणि अननुकरणीय होत गेली, कविता आणि कथा या दोन वाङ्‍मयप्रकारात रेग्यांनी खास ठसा उमटवला.

दिलिप चित्रे नेहमीच बंडखोर राहिले. त्यांची सर्वाधिक बांधिलकी स्वतःशी होती. त्यांची कविता सरळथेट टीकेच्या अवलंब करत नाही. पण तिच्यातील बौद्धिक-वैचारिक आशयातून भोवतालच्या जगाबद्दलच्या कवीच्या जहाल प्रतिक्रिया समजून येतात. उपरोध आणि अंतर्विरोध यांचे फार चांगले भान चित्र्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेला वेगळे वजन येते. त्यांच्या कथांमध्येही हे वैशिष्ट्य आढळते.

प्रतिभेचा दिव्य स्पर्श लाभलेल्या आणखी एकलेखक म्हणजे चि. त्र्यं. खानोलकर. परंतु त्यांच्या प्रतिभेत लहरीपणाचा दोष होताच. बेभान कल्पना आणि अत्युक्तट भावना म्हणजे खानोलकर. या गोष्टींचा, सुनियंत्रित म्हणून सुंदरही, आविष्कार त्यांच्या भावकवितांत आढळतो. (खानोलकरांनी कविता ‘आरती प्रभू’ या टोपणनावाने लिहिल्या.) नियंत्रण सुटले म्हणजे या गोष्टी निरर्थ व्हायच्या. त्यांच्यामुळे काही नाटके आणि कांदबऱ्या यांचा पोत बिघडून जायचा. मात्र लेखक त्यांच्यावर स्वार झालेला असला म्हणजे कोंडुरा सारखी देखणी कादंबरी किंवा कालाय तस्मै नमः सारखे नाटक सिद्ध व्हायचे. खानोलकरांची आरंभीची काही वर्षे दक्षिण कोकणात गेली. आणि ते जेव्हा मुंबईला आले तेव्हा त्यांनी कोकणचा एक तुकडा आपल्या हृदयात जपून आणला होता. त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यातून मोहक प्रतिमांची निपज व्हायची; आणि तेथील आख्यायिका-दंतकथांतून तर्कशून्यतेची लहर आणि नियतीची जाणीव, यांचे पोषण व्हायचे. तर्कशून्यतेच्या लहरीमुळेच खानोलकरांना विलक्षण व्यक्तिमत्वांचा हव्यास होता असे वाटते. मात्र या व्यक्तिमत्वांना असलेले स्थानिकपन मर्यादितच होते. दक्षिण कोकणचे खानोलकरांनी एका अद्‍भुतरम्य प्रदेशात रूपांतर केले.

ग्रामीण आणि प्रादेशिक जीवन

या शतकाच्या चौथ्या दशकात मराठीतील काही लेखक ग्रामीण साहित्यलेखनात रमले. त्या काळात ग्रामीण जीवन आदर्श मानले जायचे. तेथील नैसर्गिक आणि नैतिक सौंदर्याची चर्चा व्हायची; बेसुमार कौतुक व्हायचे. कष्टकरी, देवभोळ्या, सीध्यासाध्या खेडुताचे चित्रण पुन्हा पुन्हा केले जायचे. या प्रकारच्या स्वप्नरंजनाला, आणि शिकवणुकीला, कवितेत आधीपासूनच सुरुवात झाली होती. त्यातील खोटेपणा नवसाहित्याने उघडा पाडला. त्या प्रयत्नात, विशेषतः कथा या वाङ्‍मयप्रकाराने, ग्रामीण जीवनाचे खरेखुरे आणि बिनबेगडी दर्शन घडवले. व्यंकटेश माडगूळकरांनी जणू याचा वस्तुपाठ घालून दिला. विस्तृत पसरलेल्या आणि विविधतासंपन्न महाराष्ट्रातील ग्रामीण लोकजीवनाचे सरधोपट, गोलमाल चित्रण करणे हा सुध्दा एक प्रकारचा खोटेपणाच होय, याची जाणीव झाली. तिच्यातूनच ग्रामीण चित्रणाला खास स्थानिकपण देण्याचे आवर्जून प्रयत्न झाले. कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांनी उत्तर कोकणातील एका परिसरावर लक्ष केंद्रित केले. गो. नी. दांडेकरांनी पुण्याजवळचा मावळप्रदेश आणि विदर्भातील पूर्णा नदीचे खोरे यांची निवड केली. दक्षिण कोकणाने खानोलकरांप्रमाणे मधु मंगेश कर्णिक, जयवंत दळवी, आ. ना. पेडणेकर यांच्या सारख्या हुन्नरी लेखकांना वेगवेगळ्या वाङ्‍मय प्रकारांत लेखन करायला प्रवृत्त केले. गोव्याच्या जीवनाचे खास रंगगंध महादेवशास्त्री जोशी, लक्ष्मराव सरदेसाई यांच्या कथांनी आणि बा. भ. बोरकरांच्या कवितेने टिपले. उद्धव शेळकेंच्या कथाकांदबऱ्यांतून विदर्भाचे, तर रा. रं. बोराडेंच्या कथा-कादंबऱ्यातून मराठवाड्याचे चित्रण झाले. देशावर लेखक मंडळी खूप. व्यंकटेश माडगूळकर, रणजित देसाई, शंकर पाटील, द, मा, मिरासदार, आनंद यादव या देशी कथाकारांनी देशी जीवनाचे अस्सल दर्शन घडवणाऱ्या कित्येक कथा लिहिल्या. देश आणि कोकण-सीमेवरच्या प्रदेशाचे उत्कट सहनुभूतीने चित्रण करणारे पाणकळा (१९३९) कर्ते र. वा. दिघे हे देशी कथाकारांचे, काही बाबतीत, पूर्व मानले पाहिजेत.

या विशिष्ट परिसरनिष्ठ आणि इतरही कथात्मक ग्रामीण साहित्याने काही प्रश्न उभे केले. पूर्वीच्या साहित्यात गाववाल्याचे चित्रण भावुकपणे झाले होते. जणू त्याची भरपाई करण्याकरता नव्या ग्रामीण साहित्यात काही लेखक एकतर तो चलाख आणि बनचुका किंवा हास्यास्पद आणि आचरट, असा दाखवू लागले होते. विरूपके म्हणे करमणुकीच्या हेतूपूर्तीसाठी केली जायची. नाटकासारखे कथाकथनांचे आता प्रयोग होतात. दुसरी गोष्ट अशी की दळणवळणाच्या सोयीसुविधांमुळे आणि शिक्षणाच्या प्रसारामुळे ग्रामीण जीवन आता पूर्वीइतके दूरचे राहिलेले नाही. त्यशिवाय आता तर दृक-श्राव्य माध्यमांचा फार झपाट्याने फैलाव होतो आहे. अशा परिस्थितीत, ग्रामीण जीवन हे खरोखरीचे पूर्णपणे वेगळे आहे का? आणि त्या जीवनाचे चित्रन करणारे साहित्य ही एक स्वतंत्र आणि स्वयंसिद्ध साहित्यवस्तू आहे का? असे विचारावेसे वाटते. ग्रामीण साहित्यात ग्रामीण बोलीचा वापर किती प्रमाणात करावा, हा असाच एक प्रश्न. व्यंकटेश माडगूळकरांप्रमाणे जवळजवळ करूच नये, की थोडा चवीपुरता करावा (आणि वास्तव चित्रणाचा किंवा हास्यकारी परिणाम साधावा) की ( ती बोली बोलणारे सोडता बाकी कोणाला कळणारच नाही असा) सरसहा सर्व लेखनभर करावा? यातूनएक अधिक व्यापक आणि अधिक मूलगामी प्रश्न उपस्थित होतो : अस्मितेची अशी जाणीव अतिरेकी वाढीला लागली तर अलगतेला, फुटिरतेला उत्तेजन मिळणार नाही का?

काव्याचा क्षेत्रात, एका छोट्याशाच परिसराचे चित्रण सातत्याने क्वचितच झालेले आहे. ना. धों. महानोर हे आजचे एक उत्कृष्ट कवी. ते व्यवसायाने शेतकरी आहेत. म्हणजे अजिंठा डोंगराच्या छायेत असलेल्या स्वतःच्या शेतावर ते चक्क राबतात. त्यांची कविता त्यांचे गाव. तेथील झाडे, पशुपक्षी यांच्याबद्दलच बोलते त्यांनी थोडेसे केलेले गद्यलेखनसुद्धा त्यांचाच गोष्टी सांगते. परंतु तरीसुद्धा ग्रामीण साहित्यलेखकात त्यांची जमा सर्वसाधारपणे केले जात नाही. या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांत होऊन गेलेल्या बहिणाई चौधरी यांच्यावरसुद्धा तसा शिक्का मारला जात नाही. शेतात काम करता करता बहिणाईच्या ओठावर गाणे उमलाचे. आपल्या ग्रामीण वातावरणाशी एकरूप झालेल्या पुष्कळ कवींच्या बाबतीत असेच म्हणता येईल. त्यांच्या साहित्यात ते ग्रामीण वातावरण शालीनतेने आणि सहजपणाने मिसळले आहे.

आणखी काही खास परिसर

प्रतिष्ठित, शहरी, मध्यम वर्गीय जीवनापासून सुटका शोधू पाहणाऱ्या, कंटाळलेल्या वाचकाला काही वर्षापूर्वी ‘सुंदर गाव’ ती संधी देत असे आज या दोन्हीपासून त्याला ही सुटका ‘असुंदर’ झोपडपट्टी देऊ शकते. आज कित्येक वर्षे झोपडापट्टी हा मुंबई शहराच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. परंतु १९६२ साली जयवंत दळवींच्या चक्र या कांदबरीतून जेव्हा ती प्रथम मराठी साहित्यात अवतरली तेव्हा सोवळ्या मंडळीला मोठाच धक्का बसला. मुंबई बंदर भागातील एका रहदारीच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झोपडपट्टीत चक्रचे कथानक घडते. गलिच्छपणा, बेकायदा दारू गाळण्यासारखी आणि इतरही गुन्हेगारी, स्त्री-पुरुष संबंध आणि हिंसाचार यांच्याबद्दलचा रोखठोकपणा, आणि या सगळ्याखाली लपलेली माणुसकीची ऊब- हे नेहमीचे घटक त्या कादंबरीत होते. याच सुमारास आलेल्या, प्रसंगमालिकेच्या धर्तीच्या, भाऊ पाद्ये यांच्या वासूकाका या कादंबरीने अधिकच खळबळ उडवून दिली. वासूनाका हे तसे झोपडपट्टीचे ठिकाण नव्हे. मुंबईतील बकाल मध्यम वर्गीय वस्तीतील हे ठिकाण. या कांदबरीत जे घडते त्याहीपेक्षा टीकाकारांच्या मते आक्षेपार्ह होती ती त्यातील भडक, अनिर्बंध, शिव्याळ, अश्लील भाषा, सर्वसामान्य लोकांनी आणि नंतरच्या साहित्याने ती भाषा किती प्रमाणात आपलीशी केली, याचे संशोधन करण्यासारखे आहे. यानंतर काही वर्षांनी आलेली माहिमची खाडी ही कादंबरी मुंबईच्या एका अस्सल झोपडपट्टीबद्दल आहे. तडीपार गुंड, नाडलेले लोक, मवाली, समाजकंटक ही त्या कादंबरीतील पात्रे. आणि जोडीला थोडी लैंगिकता आणि हिंसाचार. यापैकी कोणताही कादंबरीकार या जीवनासंबंधीचा नैतिक निवाडा उद्‍घोषित करत नाही. ते जीवन समजावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो; त्याचा गैरफायदा घेण्याचा नव्हे. त्या जीवनाचा निषेध करण्याचाही सूर त्यांच्या लेखनात नाही; किंवा सामाजिक-आर्थिक अथवा राजकीय भूमिका मांडण्यासाठी आधार म्हणून त्या जीवनाचा हे कादंबरीकार वापर करत नाहीत.

एखाद्याच भौगोलिक किंवा आशयवर्ती परिघात रमलेल्या कथालेखाकाच्या बाबतीत, व्यापक जीवनाच्या संदर्भाला तो पारखा होण्याचा धोका संभवतो. उत्तर कोकणाचा परिसर आपल्याला जखडून ठेवणार नाही याचे दक्षता श्री. ना. पेंडशांनी घेतली. तो परिसर सोडून ते मुंबईकडे वळले; आणि हा परिसरसुद्धा त्यांनी सहज आपलासा केला. बहुतेक समीक्षकांच्या मते जी.ए. कुळकर्णी हे मराठीतील आजचे सर्वोत्कृष्ट कथालेखक आहेत. उत्तर कर्नाटक आणि विशेषतः बेळगाव या परिसरात त्यांच्या कथा घडतात. सूक्ष्म तपशीलांनी हा परिसर ते जिवंत करतात; आणि समर्पक प्रतिमांनी त्याला अर्थवत्ता देतात. त्यांच्या कथांतील स्त्रीपुरुष गोंधळलेले आणि निराधार; आपल्या विटक्या परिस्थितीशी जखडलेले; आणि तरीही तिच्यापासून तुटलेले; त्यांचा अटळ शोकात्म, हाच जी. ए. कुळकर्णी यांच्या आशय : सार्वत्रिक आणि सर्वकालिक.

तुटलेपण आणि विचकट

तुटलेपणाचा सर्वात प्रभावी चित्रणकर्ता म्हणजे भालचंद्र नेमाडे. कोसला ही त्यांची पहिली, आणि बहुधा सर्वोत्कृष्ट कादंबरी, या कादंबरीचा नायक एक तरूण मुलगा आहे. एक सामाजिक परिपाठ म्हणून महाविद्यालयीन शिक्षण आणि घरची उलढाल या चाकोरीतील गोष्टी त्याला कराव्या लागतात. मात्र त्यांच्याशी त्याचे काहीच नाते जुळू शकत नाही. त्यामुळे त्याची जी फरफट होते तिची हकीकत त्याने कमालीच्या सरल प्रामाणिकपणाने सांगितली आहे. तो वाहवत जातो. आपण वाहवतो आहोत हे त्याला समजत असते. पण तो काहीच करू शकत नाही. हे कळणे हा सुद्धा शापच. भूतकाळ म्हणजे शून्यच; तो बाहेर फेकला जातो; ‘outside’ होतो. व्यर्थपण आणि वांझोटपन यांचे अत्यंत प्रभावी चित्रण नेमाड्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी प्रस्थापित प्रतिष्ठित भाषिक साचे आणि वाक्प्रयोग वाकवले, त्यांची मोडतोड केली; त्यांचे विडंबन केले. भाऊ पाध्ये, किरण नगरकर आणि इतर अनेक लेखकांनी भाषेची अशी नवी जडणघडण केला आहे. (भाषेच्या आरोग्याच्या दृष्टीने ही खरोखर मोठी उपकारक गोष्ट होय. कारण अनेक साकळलेल्या, सुजलेल्या, झिजलेल्या साच्यांमुळे तिची दुर्दशा झालेली असते.) आपल्या सात सक्कं त्रेचाळीस या कादंबरीत किरण नगरकर निव्वळ भाषिक प्रयोगशीलतेच्या खूप पलीकडे गेले आहेत. मराठीतील ही पहिली ‘अ‍ॅब्सर्ड’- विचकट कादंबरी, नगरकरांची ही पहिलीच आणि एकुलती एक कादंबरे. ही कादंबरी भावनिक आणि बौद्धिक ठामपणाची खिल्ली उडवते. विलास सारंग आणि श्याम मनोहर यांनासुद्धा हे जग विस्कटल्यासारखे वाटते. प्रस्थापित निबर भाषा हे सांगायला समर्थ नाही, असे या लेखकांना वाटते; आणि म्हणून ते तिची नवी मांडणी करू पाहतात.

कादंबरीपेक्षा नाटकातून विचकटाना व्यापक वेधक अविष्कार झालेला आढळतो. कदाचित दृश्यात्मकतेमुळे त्याला एक जादा परिणाम लाभत असेल. परंतु हे विचकट, नाटक सर्वसाधपण प्रेक्षकसाठी नाही त्यामुळे ते बहुशः प्रायोगिक रंगभूमीपूरतेच मर्यादित राहिले. चि.ं त्र्य. खानोलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर हे विचकट लिहिणारे ठळक नाटककार होत. विचकटाच्या अनेक छटा विजय तेंडुलकरांच्या नाटकांतूनही आढळतात. विविध प्रकृतीचे इतके प्रभावी, प्रतिभावंत नाटककार या प्रकाराकडे आकृष्ट झालेले दिसतात की त्यावरून आजच्या सर्जनशील लेखकाच्या भावावस्थेशी त्यांची काही विशेष जवळीक असावी असे वाटते. व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा आगळ्या वेगळ्या, विलक्षण, विक्षिप्त, शोक-हास्यात्मक पात्रांत आणि घटनांना आता वाव मिळू लागला आहे हे जयवंत दळवी आणि विजय तेंडुलकारांच्या नाटकांवरून लक्षात येते. ही चांगली गोष्ट आहे. जीवनाबद्दलच्या ढोबळ आणि गुळगुळीत समजुतींवर दीर्घ काळ पोसल्या गेलेल्या आपल्या जाणीवा आता प्रगल्भ होत आहेत, याची ते आशादायक चिन्ह आहे. चाळीस वर्षांपूर्वी या प्रकारची नाटके हास्यास्पद ठरली असती. त्यांना कदाचित उधळून लावण्यात आले असते. ‘सर्वसाधारण’ म्हणजे काय याबद्दलच्या अधिकाधिक लोकांच्या मनांतील सांकतिक समजुती दूर करून, त्यांची दृष्टी फाकवण्याचे पुष्कळ श्रेय गंगाधर गाडगीळ ज्या नवकथेचे प्रतिनिधी आहेत त्या नवकथेला द्यायला हवे.

कथालेखानातील अन्य आशयाकृती

कथा-कादंबरीक्षेत्रातील काही प्रयोगवंतांना प्रस्थापित ढाचाच ठीक वाटला. त्यांची मुख्य बांधिलकी आशयाची होती. कवी शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी लिहिलेल्या तीन राजकीय कादंबऱ्याच्या मालिकेमध्ये ही गोष्ट जाणवते. स्वातंत्र्यसंग्रामातील एका अवस्थेचे चित्रण ही कादंबरीमालिक करते. अलीकडच्या काळात अरुण साधूंनी आपल्या काही कादंबऱ्यातून सत्तेसाठी हपापलेल्या आणि तिच्यासाठी उलाढाली करणाऱ्या राजकारण्यांच्या जगाचे दर्शन घडवले. इतरही अनेक लेखकांच्या काही कादंबऱ्या व्यापक अर्थाने राजकीय आहेत. विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांची काही नाटकेसुद्धा राजकारणांचे चित्रण करणारी आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील लेखकांना काही राजकीय लिहिताना सावधगिरी बाळगावी लागे; त्यामुळे त्यासाठी त्यांना आडवळणाचा, तिरकसपणाचा आडोसा घ्यावा लागे. ते एक आव्हानच होते. त्यामागे, समता, समृद्धी, प्रगती आणणाऱ्या स्वतंत्र राष्ट्राचे एक स्थिर स्वप्न तरळत होते. हे स्वप्न भंगले त्यामुळे चीड, वैफल्य, नकारबाजी यांच्या विविध छटा असलेला स्वप्नभंग- हे आशयरूप लेखकांना प्रस्तुत वाटते. जुन्या भ्रमांची मोडतोड करण्यात एक विकृत आनंद वाटतांना दिसतो. नवी स्वप्ने फारशी अस्तित्वातच नाहीत.

मात्र अशी काही स्वप्ने असतात की त्यांना काळ स्पर्श करत नाही. हे स्वप्ने भविष्यकाळाबद्दलची नसतात; भूतकाळातील असतात. मराठीपुरते बोलायचे तर हा भूतकाळ म्हणजे महाराष्ट्राचा सतराव्या-अठराव्या शतकांतील इतिहासकाळ, साहित्यातील नव्या जाणिवांशी विसदृश असणारी ही लोकप्रिय स्वप्ने मावळण्याच्या मार्गावर आहेत. असे एक काळ वाटू लागले होते. परंतु पुढे त्यांना एकदम उजळा मिळाला आणि त्यांनी ना, स. इनामदार, रणजित देसाई यांच्यासारख्या ऐतिहासिक कादंबरीकारांना आणि बाबासाहेब पुरंदऱ्यासारख्या इतिहासनिष्ठाला स्फूर्ती दिली. बाबासाहेब पुरंदरे इतिहासातील घटनाप्रसंगाचे, विशेषतः छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चरित्रांचे, जाहीर कथन करतात. त्यांची कथनशैली ओघवती आणि नाट्यपूर्ण आहे. या ऐतिहासिक कथा ऐकण्यात हजारोंच्या श्रोतृसभा दंग होऊन जातात.

दलित साहित्य

नवसाहित्य चळवळीसकट मराठीतील कोणत्याही साहित्यिक चळवळीने उडाली नसेल इतकी वादाची खळबळ दलित साहित्याने उडाली. नवसाहित्याच्या चळवळीची धार लौकरच सौम्य झाली आणि ती स्थिरावून गेली. परंतु आरंभीच्या काळात दलित साहित्यामुळे उठणारी तीव्र आक्रमक प्रतिक्रिया आता उठत नसली तरी त्याला अजूनही व्यापक प्रमाणात मान्यता मिळालेली नाही. मात्र त्या साहित्याची गंभीर चर्चाचिकित्सा करणारे प्रवक्ते आता पुष्कळ आहेत; आणि चळवळीच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी कितीतरीजण स्वतः दलित नाहीत.

वादविषय झालेल्या दलित साहित्याच्या मुळाशी दलितांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती आहे. त्याला राजकीय परिमाण प्राप्त होणे अपेक्षितच होते. पिढ्यानपिढ्या, किंबहुना शतकानुशतके, पशूंसारखे लाजिरवाणे जीवन जगावे लागल्याबद्दलच्या साचलेल्या क्रोधाचा उद्रेक म्हणजे हे साहित्य. हा क्रोध कधी कधी बेभान असतो; अविवेकी असतो; पण तो सच्या आणि ऊत्स्फूर्त असतो. या क्रोधाने कविता, कादंबरी आणि आत्मचरित्र या साहित्य प्रकारांतील काही उत्कृष्ट कलाकृतींना जन्म दिला आहे. दलिताचे आत्मचरित्र इतर साहित्यप्रकारांतून सहज ओसंडते. कवितेत, आत्मचरित्र कधीकधी उघड दिसते; परंतु बव्हंशी ते काव्यनिर्माणक रसायनात विरघळलेले असते. दलित कवींनी लिहिलेले सगळे काव्य विद्रोही नाही. अनेक दलित कवितांतील उत्कटतेचे मूळ कवीच्या आत्मनिष्ठेतच आहे. ती उत्कटता सामाजिक ध्येयनिष्ठेतूनच आलेली. आणलेली नाही. या बाबतीत केशव मेश्रामांची कविता उदाहरण म्हणून सांगता येईल. दया पवार, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे आणि यशवंत मनोहर हे आणखी काही प्रमुख दलित कवी, दलित कादंबरीकार म्हणूनसुद्धा केशव मेश्राम वेगळे आहेत. म्हणजे असे की आपल्या दलितपणाच्या वैयक्तिक अनुभवातून ते कादंबरी निर्माण करत नाहीत. बाबूराव बागूल मात्र तसे म्हणतात. आत्मचत्रित हा दलित साहित्यातील सर्वात अधिक परिचित साहित्य प्रकार, त्यांतील केवळ दारिद्रयाच्याच नव्हे तर अत्याचाराच्या आणि मानहानीच्या सत्यघटना इतक्या विलक्षण आहेत की बहुसंख्य कथाकादंबऱ्यानी त्यांच्यापुढे ओशाळे व्हावे. दारिद्रयातूनसुद्धा आनंदाच्या भावनेचा अर्क काढणे हा साहित्यिक संकेत. परंतु हे दारिद्रय म्हणजे मध्यमवर्गाचे दारिद्रय. दलितांच्या दारिद्रायाच्या जवळपास ते येऊ शकत नाही. त्यातील काही घटना थोड्या भडकपणे रंगवलेल्या वाटल्या तरी एक संवेदनाशून्य सोडला तर बाकीच्या वाचकांना त्या घटना निःसंशय आत्मशोधन करायला प्रवृत्त करतील. दया पवार, शंकराव खरात, लक्ष्मण माने, माधव कोंडविलकर आणि प्र. ई. कोनकांबळे यांची आत्मचरित्रे विशेष प्रत्ययकारी आहेत.

या लेखनाच्या प्रभावामुळे एकुण साहित्यिक वातावरणातही काही बदल झाला आहे. केवळ दलितांच्या संमेलनांतून नव्हे तर इतर साहित्यमेळाव्यांतूनसुद्धा दलित साहित्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली जाते. नियतकालिकेसुद्धा दलित साहित्याची दखल घेतात. एक महत्त्वाचे मासिक दलितांकडून चालवले जाते दलित साहित्याला आता शैक्षणिक आणि अभ्यासक्रमिक मान्यताही मिळाली आहे. काही विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात विशेष अभ्यासाठी दलित साहित्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहावर दलित साहित्य चळवळीचे विविध परिणाम झाले आहेत. सूत्ररूपाने सांगायचे तर या चळवळीमुळे मराठी साहित्य काही प्रमाणात मुक्त होऊ शकले. आशय, अनुभवाची मांडणी, भाषा यांच्या संबंधातील भिडस्तपणा बाजूला पडला. जिवंत भाषेच्या जवळ जाण्याची, थेट परिणाम साधण्याची जी धडपड चालली होती तिला नवे बळ मिळाले. झोपडपट्टीच्या चित्रणात योजली जाते अशी शिव्याळ-शिवराळ भाषा एकूण भाषिक व्यवहारात सळसळ निर्माण करते. दलित साहित्य लौकरच मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाला मिळून जाईल, असा विश्वास वाटतो.

आत्मचरित्र

आधीच्या वर्षापेक्षा गेल्या चाळीस वर्षात आत्मचरित्रपर लेखन विपुल लिहिले गेले. त्यातील काही लेखन मोठ्या दर्जाचे आहे. स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात लिहिलेल्या आत्मचरित्रांतील काही उत्कृष्ट आहेत. गेल्या काही वर्षात स्त्रीजीवनात झालेल्या बदलाची कल्पना या आत्मचरित्रांवरून येते.

स्त्रियांचे लेखन

लेखन करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचा वेगळा वर्ग करण्याची आता जरूर नाही. आधुनिक मराठी साहित्यातील पहिल्या काही दशकात असा वेगळा वर्ग केला जायचा, कारण लेखन करणाऱ्या स्त्रिया संख्येने फारच थोड्या होत्या. गेली चाळीस-पन्नास वर्षे इंदिरा संत आणि शांता शेळके यांनी सातत्याने उत्कृष्ट काव्यलेखन केले आहे. काव्यविषयक नव्या नव्या नखऱ्यांनी भुलून त्यांच्या कवितेने आपली मूलप्रवृत्ती कधीही बिघडू दिली नाही. कविता लिहिणाऱ्या तरूण स्त्रिया संख्येने इतक्या आहेत की त्यांचा येथे निर्देश करणे शक्य नाही. परंतु उदाहरणादाखल प्रभा गणोरकर आणि मल्लिका अमरशेख या दोघींचा उल्लेख पुरेसा व्हावा. कथेच्या क्षेत्रात अनेक स्त्रियांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आजच्या स्त्रीला घरीदारी अनेक प्रकारचे ताणतणाव सोसावे लागतात. अनेक कथातून अशा स्त्रीचे चित्रण झालेले आहे. ते संवेदनशील सहानुभूतीने करणाऱ्या काही प्रमुख लेखिका म्हणजे कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, अंबिका सरकार, सानिया. कमी शहरी आणि अधिक सनातनी अशा वेगळ्या चित्रण-पार्श्वभूमीमुळे, सुबकपणे लिहिलेल्या आशा बगे यांच्या कथा विशेष स्वारस्यपूर्ण झाल्या आहेत. धंदेवाईक करमणूकप्रधान कादंबऱ्या लिहिणाऱ्या स्त्रियांची संख्या मोठी आहे. ज्या स्त्रिया वेगळे काही लिहू पाहतात त्यांच्यात गौरी देशपांडे सर्वांत लक्षणीय आहेत. धाडसी कथाकल्पना आणि त्यांची धाडसी मांडणी, हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. पन्नास वर्षांपूर्वी ज्यांच्या पहिल्याच कादंबरीने वादाची धुमाळी उठवली होती त्या मालतीबाई बेडेकर आव्हानास्पद कथाकल्पनांचा शोध अजूनही घेत असतात. परंतु आता त्या फार थोडेच लिहितात.

अलिकडचे पुरुष लेखक

कथा आणि काव्याच्या क्षेत्रांत दखल घ्यावी अशी कामगिरी करणारे पुष्कळ लेखक आहेत : घुसमटलेपण आणि तुटलेपणाची जाणीव व्यक्त करणारे वसंत आबाजी डहाके. बाहेरच्या वास्तव जगाला दूर ठेवणाऱ्या विलक्षण प्रतिमासृष्टीत ज्यांची आत्यंतिक अंतर्मुखता प्रतिबिंबित होते असे ग्रेस. प्रेम आणि एकाकीपणा यांची गुंफण करणारे गुरुनाथ धुरी आणि या सगळ्यांपेक्षा वेगळे असणारे सुरेश भट, कलंदरपणा, नजाकत, विरोधाभास इत्यादी खास गझल वैशिष्टये झोकात पेलणारे सुरेश भटांची गझल साहजिकच लोकप्रिय झाले.

१९२५ ते १९७० या काळात, कादंबरी, लघुकथा, आणि टीका-निबंध या प्रकारात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, आणि अनंत काणेकर यांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. खांडेकरांच्या ययाति कादंबरीला मिळालेले ज्ञानपीठ पारितोषिक हे मराठी वाङ्‍मय कृतीला मिळालेले एकमेव ज्ञानपीठ पारितोषिक.

महत्त्वाच्या कथालेखकांपैकी अनेकाचा उल्लेख या आढाव्यात वेगळ्या संदर्भात आधीच येऊन गेला आहे. आणखी काही उल्लेखनीय कथाकार म्हणजे विद्याधर पुंडलिक, श्री. दा. पानवलकर, रत्नाकर मतकरी.

विनोद

नवतेचा कमीअधिक प्रभाव इतरही साहित्य प्रकारांतील लेखनात आढळून येतो. परंतु या संक्षिप्त आढाव्यात त्या सगळ्यांचा अंतर्भाव करणे शक्य होणार नाही. मात्र साहित्यातील एक सामर्थ्यशाली घटक असा आहे की तो दीर्घकाळ प्रस्थापित झालेल्या साहित्य प्रकारांच्या सीमांना छेदून जातो. हा घटक म्हणजे विनोद. या शतकात मराठीत विनोदाची विपुलनिर्मिती झाली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी सुरू केलेली विनोदी साहित्याची परंपरा त्यानंतर राम गणेश गडकरी, प्रल्हाद केशव अत्रे. चिं. वि. जोशी यांनी, आणि आजच्या काळात पु. ल. देशपांडे यांनी, समृद्ध केली. विनोदाचा स्पर्श झालेल्या प्रत्येक साहित्य प्रकाराला आगळे चैतन्य लाभले, आणि कधी कधी सखोलपणही. एक चिं. वि. जोशांचा अपवाद वगळता बाकीच्या विनोदकारांनी साहित्यातसुद्धा जीवनाच्या विविध क्षेत्रातील दोषदर्शनासाठी आणि दोषसुधारणेसाठी विनोदाचा उपयोग केला आहे, असे दिसते विनोद म्हणजे नुसती टवाळी आणि फसफस नव्हे; तर त्याला एक गंभीर अंग आहे, होय यावरून ठळकपणे लक्षात येते. पु. ल. देशपांड्याचे उदाहरण या बाबतीत बोलके ठरेल. अनेक कार्यक्षेत्रात त्यांनी कर्तबगारी गाजवली. परंतु त्यांच्या लक्षावधी चाहत्यांनी विनोदकार हीच त्यांची प्रतिमा जपलेली आहे.

गेल्या काही वर्षातील मराठी साहित्यावरील पाश्चात्य प्रभावाबद्दल बोलण्याचा प्रघात पडला आहे. श्रेष्ठ सर्जनशील साहित्यिक आणि फ्रॉईड आणि मार्क्स यांच्यासारखे विचारवंत यांचा काही प्रभाव आधुनिक मराठी साहित्यावर जरूर आहे. त्यातून येथील काही समर्थ लेखकांनी, अंधानुकरण टाळून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळवले आहे. आणि अगदी उघड नसला तरी संतकवींसारख्या पूर्वकालीन मराठी साहित्याकारांचा प्रभाव अर्वाचीन साहित्यिकांवर आहे. असा प्रभाव आधुनिकतेला परका नाही. बा. सी. मर्ढेकरांसारख्या नवकवीवर तुकाराम-रामदासांचे संस्कार आहेतच की नाही?

- मं. वि. राजाध्यक्ष

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1065,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,826,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,17,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,60,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,8,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,69,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,51,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,10,निवडक,2,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,88,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,706,मराठी गझल,19,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,41,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,14,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,36,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,181,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,306,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,2,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,16,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,130,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,20,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: आजकालचे वाङ्मय - महाराष्ट्र
आजकालचे वाङ्मय - महाराष्ट्र
आजकालचे वाङ्मय, महाराष्ट्र - [Aajkalche Vangmay, Maharashtra] ज्ञानेश्वरी (१२९३) ही सर्वात तेजस्वी साहित्यकृती होय.
https://1.bp.blogspot.com/-jkqNV795HLw/XSWJ19TkgLI/AAAAAAAADl4/8FP-6FhxcqU7Qgzk_Nas1KFp8mlylz97QCLcBGAs/s1600/hari-narayan-apte-v-s-khandekar-indira-sant.jpg
https://1.bp.blogspot.com/-jkqNV795HLw/XSWJ19TkgLI/AAAAAAAADl4/8FP-6FhxcqU7Qgzk_Nas1KFp8mlylz97QCLcBGAs/s72-c/hari-narayan-apte-v-s-khandekar-indira-sant.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/aajkalche-vangmay-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/aajkalche-vangmay-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची