साबुदाणा भगर व बटाटा चकल्या - पाककृती
साबुदाणा भगर व बटाटा चकल्या, पाककला - [Sabudana Bhagar Batata Chaklya, Recipe] साबुदाणा, भगर, बटाटे घालून तयार केलेल्या चकल्या उन्हात वाळवून तळून उपवासालाही खाता येतील.
उपवासाला चालणारा चटकदार पदार्थ साबुदाणा भगर व बटाटा चकल्या
‘साबुदाणा भगर व बटाटा चकल्या’साठी लागणारा जिन्नस
- दोन वाट्या भगर
- चार वाट्या साबुदाणा
- आठ मध्यम आकाराचे बटाटे
- चवीप्रमाणे तिखट
- मीठ
- जिरे
- साखर
- तीन चमचे लोणी
‘साबुदाणा भगर व बटाटा चकल्या’ची पाककृती
- रात्री साबुदाणा कोमट पाण्यात भिजवून ठेवावा. सकाळी बटाटे उकडून घ्यावे. थंड झाल्यावर सोलावे.
- साधारणपणे तीन लिटर पाणी उकळत ठेवावे. त्यातील थोडे पाणी काढून बाजूला ठेवावे.
- भगर स्वच्छ धुवून रोळून उकळत्या पाण्यात टाकावी. भगर थोडी शिजली म्हणजे त्यात साबुदाणा टाकावा.
- भगर व साबुदाणा शिजत आल्यावर त्यात बटाटे किसून पसरत घालावे. हे मिश्रण सारखे ढवळून त्यात शिजत असतानाच तिखट, मीठ, जिरे, साखर व लोणी टाकावे.
- जर मिश्रण घट्ट वाटते तर काढून ठेवलेले पाणी हबका मारून पातेल्यावर झाकण ठेवावे.
- गॅस मध्यम ठेवून पाच-सहा वाफा काढाव्या. चकलीच्या पिठासारखे घट्ट मिश्रण झाले की खाली उतरून ठेवावे.
- चकलीच्या साच्यात आतून पाणी व तुपाचा हात लावून पाण्याच्या हाताने थोडे थोडे मिश्रण मळून घेऊन साच्यातून चकल्या काढाव्यात.
- प्लास्टिकवर त्या उन्हात वाळवाव्यात. तीन/चार उन्हे दाखवून हवाबंद डब्यात भराव्यात.
- तेल किंवा तुपात तळल्यास खूप खुसखुशीत व चविष्ट होतात.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.