फळांची बासुंदी - पाककृती

फळांची बासुंदी, पाककला - [Fruit Basundi, Recipe] सर्व प्रकारची फळे, सुका मेवा आणि दुधाची मिळून गोड व पौष्टिक अशी ‘फळांची बासुंदी’ सर्वांना नक्कीच आवडेल.
फळांची बासुंदी - पाककला | Fruit Basundi - Recipe

गोड व पौष्टिक अशी फळांची बासुंदी

‘फळांची बासुंदी’साठी लागणारा जिन्नस

 • २ लिटर दूध
 • २ केळी
 • २ संत्री
 • १ मोठे सफरचंद
 • १०० ग्रॅम बिनबियांची द्राक्षे
 • २ वाट्या अननसाचे तुकडे (कमी चालतील)
 • १ मोठा चमचा साजूक तूप
 • २५ ग्रॅम काजू
 • २५ ग्रॅम बेदाणा
 • २५ ग्रॅम बदाम
 • सव्वा वाटी साखर
 • ४ वेलदोडे पूड

‘फळांची बासुंदी’ची पाककृती

 • दूध निम्मे होईपर्यंत आटवावे. त्यात साखर घालून पाच मिनिटे गॅसवर ढवळावे. खाली उतरवून गार होऊ द्यावे.
 • द्राक्षे पाण्यात भिजत ठेवावी. बेदाणा वेगळ्या भांड्यात तासभर भिजत ठेवावा. काजू साफ करून ठेवावे. बदामाचे जाड तुकडे करावे.
 • तयार बासुंदीत वेलचीपूड मिसळावी व फ्रीजमध्ये ठेवावी.
 • छोट्या कढईत साजूक तुपात काजू व बदामाचे तुकडे परतावे. त्यात भिजवून धुतलेला बेदाणा अलगद परतावा. गार बासुंदीत हा मेवा घालावा.
 • संत्री सोलून त्याच्या फोडी सुट्या कराव्या. वरचा पापुद्रा काढून फोडीचे दोन किंवा तीन लहान तुकडे करावे. सफरचंदाची साल व बिया काढून बारीक तुकडे करावे.
 • केळ्याच्या छोट्या अर्धचंद्राकृती चकत्या कराव्या. सर्व फळे बासुंदीत मिसळावी. दूध जास्त हवे असल्यास थोडे कंडेन्स्ड मिल्क घालावे.
 • थोडावेळ फ्रिझमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावे.

घाईगडबड असल्यास कंडेन्स्ड फळे व मेवा घालावा. मात्र साखर वगळावी व दाटसर वाटल्यास थोडे साईसकट दूध किंवा क्रीम घालून मिश्रण सरबरीत करावे.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.