एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या १११व्या वर्धापन दिनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या १११व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’चे उत्साहात उद्घाटन झाले...
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह
- एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या १११व्या वर्धापन दिन सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महर्षी कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व राष्ट्रीय नवोपक्रम संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
- या प्रसंगी राज्यपालांनी विकसित भारतासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विद्यापीठाच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला.
- विद्यापीठातर्फे यंदाचा पहिला ‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कार’ सेवा सहयोग फाउंडेशनला प्रदान करण्यात आला असून, विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्राध्यापक, कर्मचारी व महाविद्यालयांचा गौरव करण्यात आला.
- कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेत ६०० हून अधिक विद्यार्थिनींना दिलेल्या आर्थिक सहाय्याची माहिती दिली, तसेच कार्यक्रमात ८ पीएच.डी. मोनोग्राफचे व ‘स्वयंसिद्धा’ पोर्टलचे सादरीकरण करण्यात आले.
भारतातील पहिले महिला विद्यापीठ असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर्से (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठाचा १११ वा वर्धापन दिन आज विद्यापीठाच्या ऐतिहासिक पुणे परिसरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ या राष्ट्रीय नवोपक्रम व उद्योजकता संमेलनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास...
- केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
- राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
- राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.)
- विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव तसेच
- कुलसचिव प्रा. डॉ. विलास नांदवडेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
वर्धापन दिनानिमित्त भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश पाठविले. विकसित भारतासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित संशोधनाची गरज: राज्यपाल अध्यक्षीय भाषणात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महर्षी कर्वे यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव केला. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी ज्ञाननिर्मितीसोबतच संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेवर भर देणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञानाधिष्ठित संशोधनाच्या माध्यमातून विकसित भारताच्या उभारणीत विद्यापीठांनी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणात महिला शिक्षणाचा ऐतिहासिक प्रवास मांडला. “महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची संकल्पना मांडली, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ती प्रत्यक्षात आणली आणि महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणाला संस्थात्मक स्वरूप दिले. महिला शिक्षणाचा इतिहास एस.एन.डी.टी. विद्यापीठाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही,” असे सांगत त्यांनी विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनीही कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. ४१ विद्यार्थिनींना भाऊबीज निधी, तर ६०० हून अधिक जणींना आर्थिक सहाय्य प्रास्ताविकात कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेतला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘भाऊबीज निधी’ अंतर्गत ४१ विद्यार्थिनींना ४ लाख ६२ हजार ६९४ रुपयांचे, तर ‘SUUTI निधी’ अंतर्गत अनुदानित अभ्यासक्रमांतील ४६२ विद्यार्थिनींना १ कोटी ३७ लाख ४८ हजार ८७१ रुपये आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांतील ११९ विद्यार्थिनींना २७ लाख ७८ हजार ३६८ रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महर्षी कर्वे पुरस्कार आणि विविध पुरस्कारांचे वितरण यंदापासून विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात आलेला पहिला ‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कार’ सेवा सहयोग फाउंडेशन संचलित 'विद्यार्थी विकास योजना' यांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुतळ्याचे शिल्पकार अभिजित ढोंडफळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उत्कृष्ट माजी विद्यार्थी, महर्षी कर्वे क्रीडा रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुंबईतील ‘उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (जुहू) या महाविद्यालयास ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना जादवपूर अल्युमनी असोसिएशन ट्रस्टतर्फे गौरविण्यात आले. ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ आणि ‘स्वयंसिद्धा’ पोर्टल मान्यवरांनी कर्वे कुटीर येथे भेट देऊन ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ मधील स्टॉल्सची पाहणी केली. महर्षी कर्वे विद्याविहार येथे आयोजित या महाकुंभात देशभरातील नवोपक्रम आणि संशोधनाशी संबंधित १११ स्टॉल्स उभारण्यात आले असून, हा उपक्रम ६ जुलै रोजीही सुरू राहणार आहे. याच वेळी प्रा. अनुराधा पोतदार यांनी ‘स्वयंसिद्धा’ पोर्टलची माहिती दिली, ज्याद्वारे महाराष्ट्रातील २८ विद्यापीठे आणि दोन लाखांहून अधिक विद्यार्थिनींना जोडण्यात आले आहे. ८ पी.एच.डी. मोनोग्राफचे प्रकाशन संशोधक विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट कार्यक्षेत्राला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत संशोधिकांच्या पीएच.डी. प्रबंधांचे विद्यापीठाच्या वतीने ISBN क्रमांकासह मोनोग्राफ स्वरूपात प्रकाशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या सोहळ्यात विविध विद्याशाखांतील एकूण आठ पीएच.डी. मोनोग्राफचे यशस्वी प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुनील भिरूड, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा, वैभव वाघमारे (भा.प्र.से.), फिक्की फ्लो (मुंबई) च्या अध्यक्षा डॉ. सीमा सरोज, पीएम-उषा प्रकल्पाचे नोडल अधिकारी विकास देसाई यांच्यासह अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कुलसचिव प्रा. डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
महर्षी कर्वे कुटीर, पुणे (Maharshi Karve Kutir, Pune)
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात १११व्या वर्धापन दिनाचा उत्साह















अभिप्राय