मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे नोंदणीकृत सभासद लेखक ‘इंद्रजित नाझरे’ यांच्या ‘रक्तरंजित तो वाडा’ या मराठी भयकथेचा भाग १.
दानोळी गावातील एका प्रामाणिक, सुशिक्षित तरुणाने आपल्याच गरोदर पत्नीची निर्घृण हत्या का केली, याच्या थरारक आणि रहस्यमयी प्रवासाची सुरुवात करणारी एक भयकथा...
रक्तरंजित तो वाडा भाग १
सकाळची वेळ होती. महादेव मंदिरात आरतीचे सूर घुमत होते. विहिरीवर कपडे धुणाऱ्या बायकांची लगबग सुरू होती, तर शेजारीच लहान मुले गोट्या आणि विटी-दांडू खेळण्यात दंग होती. गावातील प्रत्येक जण आपापल्या रोजच्या कामात व्यस्त होता. अशा शांत, प्रसन्न वातावरणात अचानक एक भयंकर घटना घडली आणि अख्खे गाव हादरले. दानोळी गावात खून झाला होता...! पश्या जीवाच्या आकांताने ओरडत गावचे सरपंच वसंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी धावला. सरपंच घरात सकाळची न्याहारी करत होते. पश्या इतक्या घाईत होता की, धावत येऊन पायातील चप्पल काढताना त्याचा पाय अडकला आणि तो सरपंचांच्या उंबरठ्यातच कोसळला. त्याला अशा अवस्थेत पाहून सरपंच चमकले. “अरे पश्या, लैका काय झालं असं?” सरपंचांनी विचारले. “सरपंच, त्या देसाई मास्तरांची सून...” पश्याचा श्वास भरून आला होता. “कोण मोनिका...?” सरपंचांच्या पत्नी मालतीबाईंनी उत्सुकतेने आणि चिंतेने प्रश्न विचारला. “व्हय वैणीसाहेब! तिचा तिच्या नवऱ्याने खून केला...!” पश्याने कसाबसा शब्द फोडला. “काय...?” सरपंच ताडकन ताटावरून उठले. मालतीबाईही भीतीने पुढे सरसावल्या. घरातील वातावरण एका क्षणात सुन्न झाले. सरपंचांनी कसलाही विचार न करता ताबडतोब गावचे पोलीस पाटील जाधव यांना फोन लावला. काही वेळातच पोलीस पाटील, सरपंच आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिक देसाई मास्तरांच्या वाड्यावर पोहोचले. तिथे आधीच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. समोरील भयानक दृश्य पाहून जो तो हळहळत होता आणि भीतीने कुजबुजत होता. सरपंच आणि पोलीस पाटलांनी वाड्यात पाऊल टाकले, तेव्हा समोरील दृश्याने त्यांच्याही काळजाचा ठोका चुकवला. अमोल गुडघ्यावर बसला होता. समोर त्याची प्रिय पत्नी मोनिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचे मोकळे केस रक्ताने माखले होते, गळा निर्घृणपणे चिरलेला होता आणि डाव्या हातापर्यंत रक्ताचे पाट वाहिले होते. झटापटीत तिची साडी अर्धवट सुटली होती. अत्यंत दुर्दैवी गोष्ट म्हणजे मोनिका सहा महिन्यांची गरोदर होती. अमोलच्या हातात रक्ताने माखलेला धारदार चाकू होता. तो मान खाली घालून सुन्न अवस्थेत बसला होता आणि एकटक मोनिकाच्या मृतदेहाकडे पाहत होता. “अमोल... ए अमोल!” सरपंचांनी त्याला दोन-तीन वेळा मोठ्याने आवाज दिला. पण अमोलचे कसलेच लक्ष नव्हते. आपण काय केले आहे, समोर कोण उभे आहे, याचे त्याला जराही भान नव्हते. त्याची ती शून्यात हरवलेली नजर पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पाटलांनी ताबडतोब शहराचे पोलीस निरीक्षक राणे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच शहर पोलीस प्रमुख राणे आपल्या दोन-तीन सहकाऱ्यांसह तातडीने दानोळी गावात दाखल झाले. “अगं यमे, मास्तर आणि वहिनी तर चारधाम यात्रेला गेलेत ना गं? आणि या अमल्याने हे काय अघोरी कृत्य केलं? सोन्यासारख्या बायकोला आणि पोटातील त्या सहा महिन्यांच्या निष्पाप जिवाला एका झटक्यात संपवून टाकलं!” वाड्याच्या आवारात गावकऱ्यांची कुजबूज सुरू होती. पोलिसांनी देसाई वाड्यात प्रवेश करून अमोलला चहुबाजूंनी वेढले आणि त्याला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा रीतसर पंचनामा सुरू झाला. मोनिकाच्या मृतदेहाभोवती पांढऱ्या खडूने रेषा आखण्यात आली. घटनास्थळावरील पुरावे गोळा केल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तालुक्याच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. पोलिसांनी सरपंच आणि गावकऱ्यांकडून प्राथमिक माहिती नोंदवून घेतली आणि अमोल देसाईला घेऊन ते शहर पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक विष्णू सरनाईक यांना या घटनेची तात्काळ कल्पना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ते स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक वल्लभ दातार यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. वाड्याची बारकाईने पाहणी केल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक राणे यांना तपासाबाबत योग्य त्या कडक सूचना दिल्या. गुन्हा तर घडला होता, पण फिर्याद कोण देणार? अमोल तर संपूर्णपणे मानसिक धक्का बसल्यासारखा शांत होता, तो काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांनी सरपंचांकडून देसाई मास्तरांचा मोबाईल क्रमांक मिळवला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. देसाई मास्तर आदल्याच दिवशी सपत्नीक चारधाम यात्रेसाठी रवाना झाले असल्याने दुर्गम भागात त्यांचा फोन क्षेत्राबाहेर येत होता. अखेर, पोलीस अंमलदार पांढरपट्टे यांनी स्वतः सरकारतर्फे मोनिका देसाई हिच्या खुनाची फिर्याद दाखल केली. घटनास्थळावरील प्रत्यक्ष परिस्थितीवरून संशयित अमोलविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच दिवशी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले गेले. न्यायाधीश सौ. कानिटकर यांनी पोलिसांचे प्राथमिक दोषारोपपत्र आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अमोलला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आल्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने चक्रावून अमोलने खुनासाठी वापरलेला चाकू आणि मोनिकाचा मोबाईल फोन जप्त केला. आपल्या एकुलत्या एक मुलीचा असा निर्घृण खून झाल्याची बातमी ऐकून मोनिकाचे वडील श्रीकांत कोरवी धापा टाकत शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी जेव्हा त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली, तेव्हा ते पूर्णपणे हवालदिल झाले. पोलिसांच्या तोंडून ते भयानक सत्य ऐकताना त्यांचा धीर सुटला आणि ते चक्कर येऊन पोलीस ठाण्याच्या जमिनीवरच कोसळले. पोलिसांनी तातडीने त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. इकडे पोलीस कोठडीत पोलिसांनी अमोलकडून गुन्ह्याचा हेतू व सत्य माहिती काढून घेण्यासाठी थर्ड डिग्रीसह सर्व उपायांचा अवलंब केला. परंतु, अमोलने आपले तोंड उघडले नाही; तो एखाद्या पाषाणासारखा शांत राहिला. पोलीस कोठडीची मुदत संपत आली होती, तरी तपासात काहीच प्रगती नव्हती. शेवटी पोलीस निरीक्षक राणे स्वतः अमोलच्या समोरील खुर्चीवर येऊन बसले. अमोलचे हात पाठीमागे बांधलेले होते. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे त्याच्या ओठांतून आणि तोंडातून रक्ताच्या धारा येत होत्या, पण त्याची नजर अजूनही जमिनीकडे खिळलेली होती. राणे यांनी हवालदाराला सांगून त्याचे हात मोकळे केले. त्याला समोर नीट बसवून पिण्यासाठी पाणी दिले. राणे अत्यंत शांत स्वरात त्याला म्हणाले, “अमोल, अरे तू तर सुशिक्षित आहेस. पुण्यातील एवढी चांगली आय.टी. कंपनीतली नोकरी सोडून तू गावात वडिलांची शेती सांभाळायला आलास. तिथेच तुझ्यासोबत काम करणाऱ्या मोनिका कोरवी हिच्यावर प्रेम करून तिच्याशी थाटामाटात लग्न केलंस... मग लग्नानंतर अवघ्या दीड वर्षातच तू तुझ्या या लाडक्या पत्नीचा असा क्रूर मुडदा का पाडला? काय कारण होतं या मागे?” बोलता बोलता पोलीस अधिकारी राणे यांनी अमोलसमोर एक जुना फोटो ठेवला. त्या फोटोत अमोल आणि मोनिका अत्यंत आनंदी आणि रोमँटिक अंदाजात एकमेकांच्या जवळ बसले होते. तो फोटो पाहताच अमोलच्या त्या शून्य, विखारी नजरेत अचानक पाण्याचे कडे दाटले. त्याचा कंठ फुटला आणि तो ढसाढसा रडू लागला. स्वतःवरचा ताबा सुटलेला अमोल समोरच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे पाहत, त्या भयानक आणि अविश्वसनीय रात्री घडलेल्या घटनेचा थरारक वृत्तांत सांगू लागला...! (क्रमशः)















अभिप्राय