एकविसाव्या शतकातील स्त्री (मराठी लेख) - [Ekvisavya Shatakatil Stri,Marathi Article] खरे पाहिले तर या जगाच्या रथाची दोन चाके म्हणजे स्त्री आणि पुरुष.

कशी आहे एकविसाव्या शतकातील स्त्री?
एकविसाव्या शतकातील स्त्री (मराठी लेख)
स्त्री ही व्यक्तीत्व नव्हे, ती एक वस्तू खेळणी आहे याची जणू ही पहिली शिकवणच असते.
धार्मिक, दहशतवादी मग ते कोणत्याही धर्माचे असोत. इराणचा खोमेनी असो, अफगाणिस्ताना ओसामाबिन लादेन असो, बाबरी मशिद उद्ध्वस्त करणारा हिंदू अतिरेकी संघटन अथवा अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवून देणारे अतिरेकी, हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत. या सर्व दहशतवाद्यांनी स्त्रिला वेठीस धरण्याचाच पवित्रा घेतला आहे.
आई, बाबा मला मारु नका. मला जगायचंय. मी तुमचीच मुलगी आहे. मग, मला असे दूर का लोटता? हे हृदयाला पाझर फोडणारे उद्गार आहेत स्त्री पिंडाचे (स्त्री भ्रूणाचे). आपण २१ व्या शतकात पदार्पण केले. चंद्रावर जाण्यासाठी म्हणे, बुकींगसुद्धा सुरु आहे. विज्ञान-तंत्रज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात प्रगती केली, पण आजही आपले विचार नीच दर्जाचे आहेत. मुलगा न झाल्यास मुलगी झाल्यास आई-वडील शोक करतांना दिसतात. ज्याच्या पदरी पाप त्याला मुली आपोआप हिच भावना लोकांच्या मनात आहे.
म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्यातर असे पाहण्यात येत आहे की, दुसरे अपत्य असलेल्या (?) मुलींची संख्या १००० मुलांच्या मागे ७५९ आहे. तर प्रत्येक हजार पुरुषांमागे १९९१ मध्ये ९४५ तर २००१ मध्ये ९२७ स्त्रियांची संख्या आहे.
बालपणीपासून असा भेदभाव केला जातो. मुलांना दिली जाणारी खेळणीसुद्धा न्यूनगंडाची भावना निर्माण करतात. मुलांना मोटार, विमान अशी खेळणी दिली जातात, तर मुलींना बाहुली दिली जाते. स्त्री ही व्यक्तीत्व नव्हे, ती एक वस्तू खेळणी आहे याची जणू ही पहिली शिकवणच असते. लहानपणी घरात सती सावित्री, पार्वती, सीता यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. पार्वती पतिव्रता होती, हे नेहमी मनावर बिंबवले जाते, पण तिचा कणखरपणा, तिची जिद्द याची वाखाणणी कोणीच करीत नाही.
बाजारतही वस्तूची खरेदी-विक्री होते. त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा एक बाजारातील वस्तू समजून तिची बिनधास्तपणे खरेदी-विक्री चालू आहे. खरे पाहिले तर या जगाच्या रथाची दोन चाके म्हणजे स्त्री आणि पुरुष. हा रथ व्यवस्थितपणे चालवायचा असेल तर दोन्ही चाके सारख्याच गतीने चालण्यासाठी स्त्री रुपी चालाका सक्षम बनविणे अत्यावश्यक आहे. स्त्री स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ असली पाहिजे. खेड्यातच काय पण अगदी शहरात सुद्धा संध्याकाळी साडेसहा - सात वाजता बाजूच्या दुकानात जायचे तरी १८ वर्षाच्या बहिणीबरोबर ९-१० वर्षाच्या भावाला पाठविले जाते. जोपर्यंत स्त्री अशी रक्षणीय मानली जाईल, तोपर्यंत तिला स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणता येणार नाही.
लेकीचा ग जलम । भाड्याचा बईल
कधी इसावा हुईल । देवा ठावं
लेकीचा ग जलम । देव देऊनी चुकला
बैल घाण्याला उपला । जलमभरी
या ओळीतूनच भारतीय स्त्रीची, विशेषतः ग्रामीण स्त्रीची किती दुरवस्था झाली आहे हे स्पष्ट होते.
स्त्रीवर होणाऱ्या या सर्व अत्याचाराचे तिच्या दुःस्थितीचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी मुलींच्या शिक्षणाइतके परिणमकारक दुसरे साधन नाही. एका मुलीला शिकवणे म्हणजे अख्या कुटुंबाला शिकविण्यासारखे आहे. स्त्रियांपुढे गंभीर समस्या आहेत, पण शिक्षण या जादूच्या कांडीने सोडविली जाणार नाही. अशी एकही समस्या नाही. त्यासाठी समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्री ही त्याग नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही. पारंपारिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे आता महिला काबीज करीत आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून किरण बेदी, मीरा बोरवणकर, अंजू जॉर्ज, सानिया मिर्झा आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबरच रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोल पंपावर काम करणे, पत्रकारिता ही कामे एकविसाव्या शतकातील स्त्रीया / महिला करु लागल्या आहेत.
स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यास आहे. त्यासाठी आपणा सर्वांना सांगू इच्छिते, मुलींनो... हे शतक तुमचे आहे.
संधी गमावू नका. पुढे या आणि तुमची सकारात्मता, मौलिकता जगाला दाखवा, स्वतःला सिद्ध करावे जगाला पटवून द्या.
हमसे है जमाना सारा
हम जमाने से कम नही,
Girls the best जानलो बात यह मानलो.
- सिमा लिंगायत-कुलकर्णी
अभिप्राय