आई तू - मराठी कविता

आई तू, मराठी कविता - [Aai Tu, Marathi Kavita] आत्मा आणि ईश्वराचे पावित्र्य तू, सत्य व्यापक परब्रम्ह तू.

आत्मा आणि ईश्वराचे पावित्र्य तू, सत्य व्यापक परब्रम्ह तू

आत्मा आणि ईश्वराचे पावित्र्य तू
सत्य व्यापक परब्रम्ह तू
जगदव्यापक परमेश्वर तू
विश्वाचे वाणी स्वरूप तू

सुवर्णरौप्य धारी लक्ष्मी तू
ब्रम्हज्ञानी सरस्वती तू
आकाशाची निर्लेप मुर्ती तू
असत्याकडून सत्याचा मार्ग तू

तेजस्वी सुर्याचे तेज तू
चंद्राची शीतल छाया तू
ग्रीष्माची गरम झुळूक तू
मायेचा अथांग समुद्र तू

फुलांचा स्वच्छंद गंध तू
अश्वस्थ वृक्षाची सावली तू
निश्वस्त आकाशी चांदणे तू
सुखदूःखाचा चिरस्थंभ तू

जीवनातला पहिला स्पर्श तू
ध्येय जिंकण्याची जिद्द तू
जन्मांतरीच्या ऋणांचे फळ तू
काटेरी झूडूपाचे गोंडस फूल तू

तेजस्वी प्रकाशी मातृत्व तू
हृदय स्पंदनी श्वास तू
ओजस्वी दातृत्वाची जननी तू
आयुष्याचा प्रगाढ विश्वास तू

काळजाची अतूट तळमळ तू
स्वप्नांची ओढ तू
उडत्या पंखाचे बळ तू
हातावरील निरागस फोड तू

- मोहिनी उत्तर्डे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.