आता मला कुठेतरी - मराठी कविता

आता मला कुठेतरी, मराठी कविता - [Aata Mala Kuthetari, Marathi Kavita] कुणासाठी जगायचे कुणासाठी भोगायचे, यातनांच्या झऱ्याखाली कशासाठी भिजायचे.
आता मला कुठेतरी - मराठी कविता | Aata Mala Kuthetari - Marathi Kavita

यातनांच्या झऱ्याखाली कशासाठी भिजायचे

आता मला कुठेतरी लपावेसे वाटते
दिसुनये कुणी तीथे लपावेसे वाटते

अंधारलेल्या विचारांना वातीचा हो प्रकाश
एका मुठित माती थोडी एका हाती आकाश
क्षितीजाच्या पलिकडे धावावेसे वाटते
आता मला कुठेतरी लपावेसे वाटते

माणसांच्या गर्दी मधे स्वतःचा शोध
खरे खोटे हसणे आणि खरा खोटा क्रोध
आनंदाना एकदा तरी फसावेसे वाटते
आता मला कुठेतरी लपावेसे वाटते

डोंगरांना नद्यांना काही सुद्धा कळत नाही
वर्षों वर्ष जगत रहातात त्यांचे काहीच अडत नाही
त्यांच्या या वागण्याशी भांडावेसे वाटते
आता मला कुठेतरी लपावेसे वाटते

आयुष्याचा आशीर्वाद मागत नाही खरच
केले खुप काही तरी रहीले मागे बरच
जीवाला या ओवाळून टाकावेसे वाटते
आता मला कुठेतरी लपावेसे वाटते

कुणासाठी जगायचे कुणासाठी भोगायचे
यातनांच्या झऱ्याखाली कशासाठी भिजायचे
समुद्राच्या लाटानं मधे बुडावेसे वाटते
आता मला कुठेतरी लपावेसे वाटते

किंचाळून घसा आता चिर चिर चिरलाय
थोडा थोडा श्वास माझा उरामधे उरलाय
बोलायचे नाही फक्त ऐकावेसे वाटते
आता मला कुठेतरी लपावेसे वाटते

माझे तुझे, तुझे माझे, आपलेच हे जगणे
माझे गेले सारे असे वाटे तुझे वागणे
तुझे तुला सारे नीट मीळावेसे वाटते
आता मला कुठेतरी लपावेसे वाटते

- समर्पण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.