मास्तर

मास्तर - [Master] PMPML मधील वादाचे प्रसंग काही नवीन नाहीत. पण.
मास्तर | Master

PMPML मधील वादाचे प्रसंग काही नवीन नाहीत. पण..


काल बस जरा रिकामी होती. रिकामी म्हणजे कुणी उभं नव्हतं इतकंच. PMPML मधील वादाचे प्रसंग काही नवीन नाहीत. पण आज कंडक्टरचा आवाज जरा वाढलेला वाटला म्हणून मान वळवून मागे बघितलं तर एका प्रवासाशी वाद सुरु होता.कंडक्टर: नोट दुसरी द्या

प्रवासी: न चालायला काय?

कंडक्टर: अहो माझी पहिली ट्रिप आहे. ४ होईपर्यंत फाटून जाईल ती.

प्रवासी: नाहीये दुसरी नोट. आयला रिक्षावाले घेत नाहीत आता तुम्ही पण घेत नाही. मला कंडक्टरनेच दिलीये.

कंडक्टर: कंडक्टर लोकं काय घरातून आणतात का? तुमच्यातलंच कोणतरी देतं.

प्रवासी: "साले सरकारीत नोटा द्यायला काय problem आहे. उगाच माज!"
त्याचे शब्द जिव्हारी लागले असावेत.

कंडक्टर: (शक्य तितक्या सौम्य शब्दात पण चढ्या आवाजात) दुसरी नोट नसेल तर दादा पुढच्या स्टॉपला उतर.
तोही आणखी एक शिवी देऊन उतरला.

कंडक्टर जरा बारीकच आवाजात म्हणाले, ‘चला वाकडेवाडीवाले’.

मी कंडक्टर सीटच्या बाजूलाच बसले होते. तिथे येऊन तो उभा राहिला. बसू कि नको? विचार करत दोनदा बघितलं. मीच म्हटलं, बसा तुम्हाला बसायचं असेल तर. तो मास्कमधल्या चेहर्‍यावरुन खजील वाटला. मी हेडफोन्स काढून ठेऊन विचारलं, “काय झालं मास्तर?”

“काय नाय ओऽऽ मॅडम, असली जीर्ण नोट होती ना. कुणीच घेत नाही. दुसरी नसेल का बरं त्याकडं? पण देत नाहीत.” त्याचा गळा दाटलेला जाणवत होता.

“हऽऽम्म.. द्यायला हवी होती.”

“३ दिवसाखाली एक नोट आली होती त्यावर पेनानं लिहिलेलं होतं. आफिसात घेतली नाही. मला खिशातून द्यावी लागणार होती. पण माझ्याकडे पैसेच नव्हते. १ किलोमीटर चालत गेलो. ATM मधून काढले. आणून देईपर्यंत कॅशियरची वेळ संपली. त्यो ओरडाय लागला. घरी जायला पार दिड तास उशीर झाला.”

कंडक्टरने मास्क खाली घेतला. डोळे पुसले.

“मास्तर एवढं नाही tension घ्यायचं”

“मॅडम कशाच टेन्शन घ्यायचं नाही. रोजचंय हे. परवा एक लेडीज फोनवर बोलत बसली आणि चेकर आला तर तिकिटच दिलं नाही बोल्ली. आजूबाजूच्या सगळ्यांची तिकिटं होती. फोनवर बोलणार हे आणि चूक आमची! आता ती पण आमची जिम्मेदारीये का?” कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या.

बोलता बोलता असे २-३ मनस्ताप झालेले प्रसंग त्यांनी सांगितले.

मास्क वर घेत ओरडला “मास्क लावा रे मास्क. तिसरी लाट याय लागलीय. तुमच्यासाठीच सांगतोय.”

“तुम्ही contract basis वर आहात?”

“छ्याऽऽ! contract basis वर असतो तर एवढा ताप सहनच केलाच नसता. दुसरी नोकरी पाहिली असती. बारका दिसतो म्हणून तुम्हाला वाटलं असेल. पण १ महिन्यात ३ किलो वजन कमी झालंय. कोरोनामुळं पब्लिक कमीये पण आम्हाला तर ताप लैच आहे! ३ वर्षं झाली इथं. मी ग्रॅज्युएट आहे. डि. एड्. झालंय.”

“ओह्‌. मग दुसरीकडे पण try करु शकता.”

“हा मंग करतो ना. आरोग्यखात्याची परिक्षा दिली. बँकची दिली. क्लार्कची दिली. एकात score ३०० पैकी २५२ आलाय.”

“भाऽऽरी! अभ्यास कधी करता मग?”
तिकिट देता देता तो बोलत होता.

“जाताना एक तास, येताना एक तास. जमल तसं घरी! आता परवा MPSC ची pre देणारे. चपरासी, झाडूवाला म्हणून बी घेतलं तर चालंल.”

“_____________”

“तुम्ही विचारलं तरी! नाय तर कुणाला काय सांगून उपयोगे?”

तो पुढची तिकिटं काढायला निघून गेला. मी विचार करत होते. गेल्या आठवड्यात नादुरुस्त बसची तक्रार केली होती. त्याच दिवशी त्याविषयी कार्यवाही झाल्याचा मेसेज आला. आपण किती पटकन आपल्या तक्रारी मांडतो. यांचं ऐकणारं कोण असेल? प्रत्येक वेळी चूक यांचीच असते असं नाहीये.

माझा स्टॉप आला होता. उतरताना कंडक्टरला म्हणाले, “चला मास्तर, all the best तुम्हाला exam साठी!”

कपाळावरच्या आठ्या मावळल्या. हसून “थँक्यु मॅडम, थँक्यु!” म्हणाला. डोळ्यात आशा दिसत होती.

आता या ‘मास्तर’चा कुठेतरी ‘सर’ व्हावा एवढंच वाटून गेलं!

सायली कुलकर्णी | Sayali Kulkarni
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी लेख आणि अनुभव कथन या विभागात लेखन.

1 टिप्पणी

  1. Mast
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.