आयुष्यातली नाती अन् नात्यांचं आयुष्य

आयुष्यातली नाती अन् नात्यांचं आयुष्य - [Ayushyatali Nati an Natyacha Ayushya] माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात.
आयुष्यातली नाती अन् नात्यांचं आयुष्य | Ayushyatali Nati an Natyacha Ayushya

माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात


'We ignore those who want us... Want those who ignore us... Love those who hurt us and hurt those who love us.' किती खरंय हे...! सगळ्यांचंच थोड्याफार प्रमाणात असंच होतंय. नात्यातला गुंता वाढतोय... की आपण वाढवतोय? नाती वाढवतोय आणि गुंताही. नात्याची संकल्पनाच स्पष्ट नाहीये तर ती जपणं, जोपासणं, टिकवणं कसं जमणार?व. पु. म्हणतात, “माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतूपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात.” पटतं हे. एका काहीतरी निमित्ताने आपण एकत्र येतो. त्यामागे नियतीचा काहीतरी उद्देश असतो. तो साध्य झाला की आपण निघून जाणंच अपेक्षित असतं. हा स्वार्थ नसतो. माणसांकडून आपण अपेक्षा ठेववायच्याच नसतात. त्या नियतीनं ठेवायच्या. त्यांच्या पूर्तीनंतर माणूस माणसाला केवळ ओळखीपुरता ओळखतो.

मला तर असं वाटतं प्रत्येक गोष्टीचं ठराविक असं आयुष्य असतं. माणसाचं असतं, औषधांचं असतं. तसंच नात्यांचं असतं. पण मन किंवा मेंदू या नात्यांच्या आयुष्याला ठिगळं लावत बसतात अन् मग गुंता वाढत जातो. नाती टिकवण्याच्या शक्यता पडताळल्या जातात आणि माणसं भरडली जातात.

आयुष्याचे संदर्भ बदलत जातात तशी आयुष्यातली माणसं पण. नवीन दिवस, नवीन विचार, नवीन व्यक्ती, नवी नाती. पुन्हा नवीन दिवस येणारच असतो. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवी नाती तयार होत जातात. तर काही नात्यांचं स्वरुप बदलत जातं.

शाश्वत असं काही नसतंच. नाती तरी त्याला कशी अपवाद असतील? पण पुसली जाणार म्हणून रांगोळी न काढता राहतो का? अडकून राहिलो की गुंता वाढतो अन् गुंत्यात अडकत जातो. तिथला घास संपला की रेंगाळू नये आणि जाणार्‍याला अडवण्याचा अट्टहासही करु नये. माणसं ‘टाळायची’ नाहीत फक्त कोणती नाती ‘कवटाळायची’ हे ओळखायला शिकावं. माणसं आपल्याला घडवतात, शिकवतात, ती जोडण्याइतकंच ती जपणं - जोपासणं महत्वाचं असतं... कारण ती तितक्याच सहजतेनं दुरावतात.

शेवटी कसंय... ‘गोतावळा’ हवासा वाटतो, ‘पसारा’ नकोसा...!

सायली कुलकर्णी | Sayali Kulkarni
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी लेख आणि अनुभव कथन या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.